रंगले या रंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:35 AM2018-03-07T00:35:53+5:302018-03-07T00:35:53+5:30
रंगाशी नाते सांगणारा एकमेव सण म्हणजे रंगपंचमी़ रंग लावून घ्यायचा आणि इतरांना लावायचाही. माणसांचे चेहरे ओळखता न आले पाहिजेत एवढी रंगाची उधळण. बाहेर रंग खेळायला जाण्यापूर्वी घरच्या देवांवर चिमूटभर रंग टाकून त्याला नमस्कारायचे. एका अर्थाने देवालासुद्धा आपल्यात सहभागी करून घ्यायचे़ केवढा सुंदर विचार.
- डॉ. गोविंद काळे
रंगाशी नाते सांगणारा एकमेव सण म्हणजे रंगपंचमी़ रंग लावून घ्यायचा आणि इतरांना लावायचाही़ माणसांचे चेहरे ओळखता न आले पाहिजेत एवढी रंगाची उधळण़ बाहेर रंग खेळायला जाण्यापूर्वी घरच्या देवांवर चिमूटभर रंग टाकून त्याला नमस्कारायचे़ एका अर्थाने देवालासुद्धा आपल्यात सहभागी करून घ्यायचे़ केवढा सुंदर विचाऱ तसे रंगाबद्दलचे बरेच काही घरात वेळोवेळी कानी पडत आले़ माधव शाळेतून खूप उशिरा घरी आला़ वडील धास्तावलेले़ एकदम ओरडले़ ‘तुझे थोबाड रंगवायला पाहिजे’़ म्हणजे थोबाड रंगवतात तर! सणासुदीला विडा खाण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच़ कोणाची जीभ जास्त रंगते याची स्पर्धा हमखास रंगायची़ शकूला पाहायला मुलाकडची मंडळी आली होती़ सुधीरच्या हातातून चहाचा कप पडला नि फु टला़ पाहुणे गेल्यावर बाबा खूपच रागावले ‘सगळ्या कार्यक्रमाचा बेरंग करून टाकला म्हणूऩ’ रंगाचा बेरंगही होतो तर!
पावसाळ्यात केव्हा तरी इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान दिसते म्हणतात़ खरेच सांगतो त्यात सातरंग मला केव्हाच दिसले नाहीत़ शाळेत असताना सात रंगांची नावे लक्षात राहावी यासाठी विजयने ‘जातानाही पाणी पी’ असे सूत्र सांगितले होते़ जा-जांभळा, ता-तामडा, ना-नारिंगी, हि-हिरवा, पा-पांढरा, नि-निळा, पि-पिवळा़ तर असे हे सूत्र ‘जातानाही पाणी पी’
सुरेश भट नावाचे गजलकार आले नि त्यांनी आपला वेगळा रंग जोपासला़
‘रंगूनी रंगात साºया रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साºया पाय माझा मोकळा’
वेगळ्या रंगाचे गारुड तर काही वर्षे आमच्या मनावर अधिराज्य करून होते़ वेगळ्या रंगाची जपणूक करण्यापेक्षा ‘अवघा रंग एक झाला’ हे अद्वैत तत्त्वज्ञान अधिक जवळचे वाटे़ द्वैत काय नि अद्वैत काय? अंतिम घडीला सारेच रंग सरतात़ अण्णा माडगूळकरांनी संपलेल्या मैफिलीचे केवढे सुंदर वर्णन स्वभावोक्ती अलंकारातून केले आहे
‘कोन्यात झोपली सतार सरला रंग
पसरली पैंजणे सैल सोडूनी अंग’
रंगाच्या दुनियेत किती काळ रमायचे? नि रंगायचे? कोणता रंग जीवनाला आत्मतृप्ती देईल की जो लावल्यानंतर सारे रंग विस्मृतीच्या गर्तेत जातील़ शेवटी शरण तुकोबांनाच जायचे़
‘रंगले या रंगे पालट न धरी़
खेवले अंतरी पालटेना’
श्रीकृष्णाच्या रंगात मन रमले की तो रंग पालटत नाही़ ते रूप अंतरी बिंबले की हलत नाही़