इम्रान आणि संशयाची सुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 09:26 AM2022-11-05T09:26:59+5:302022-11-05T09:27:04+5:30

सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या नेत्याला अनेकदा सहानुभूतीचा मोठा लाभ मिळतो.

Pakistan Former PM Imran Khan and the needle of doubt | इम्रान आणि संशयाची सुई

इम्रान आणि संशयाची सुई

Next

गुजरानवाला हे पाकिस्तानातील शहर अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे भारतीय वंशाचे प्रथम पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मूळ गाव म्हणून गुजरानवालाला जगभर ओळख मिळाली. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यासाठी ते शहर पुन्हा एकदा चर्चेत आले. पाकिस्तानमध्ये सांगायला लोकशाही असली तरी, प्रत्यक्षात तो देश म्हणजे एक 'बनाना रिपब्लिक' आहे, ही बाब वेळोवेळी सिद्ध होत असते. इम्रान खान यांच्यावरील गोळीबाराने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले एवढेच!

इम्रान खान यांनी सध्या सत्ताधारी, लष्करशहा आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आयएसआय ही अत्यंत पाताळयंत्री गुप्तचर संस्था, यांच्याविरुद्ध एकाचवेळी लढा पुकारला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यासाठी संशयाची सुई त्या तिन्ही घटकांकडे वळली आहे. असा हल्ला एखाद्या सुदृढ लोकशाही व्यवस्था असलेल्या देशात झाला असता, तर पोलीस तपासात हल्ल्यासाठी जबाबदार कोण हे निष्पन्न होईलच, असे म्हणता आले असते; परंतु पाकिस्तानसारख्या 'बनाना रिपब्लिक' मध्ये ती सोय नसते. इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर लगेच ज्या वेगवेगळ्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर फिरू लागल्या, तसेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्या, त्या बघू जाता हल्ल्यामागील सत्य उघड होण्याची शक्यता फार दुरापास्त दिसते. कोणत्याही जबाबदार देशात असा हल्ला झाला असता आणि हल्लेखोर ताब्यात आला असता, तर त्याला तातडीने प्रसारमाध्यमांपासून दूर नेण्यात आले असते.

पाकिस्तानचे मात्र सगळेच जगावेगळे आहे! त्यामुळेच पोलिसांच्या ताब्यात असलेला हल्लेखोर चक्क प्रसारमाध्यमांसमोर प्रश्नांची उत्तरे देताना अवघ्या जगाने बघितला. त्यामुळे अवघ्या घटनाक्रमासंदर्भातच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. कोणताही गुन्हा घडतो, तेव्हा त्यामागील उद्देश काय, गुन्हा घडल्याने कुणाला फायदा होऊ शकतो, याचा सर्वप्रथम शोध घेतला जातो. तो शोधच तपास यंत्रणांना गुन्हेगारापर्यंत घेऊन जात असतो. इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात तसा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास, प्रथमदर्शनी सत्ताधारी, लष्कर व आयएसआय ही तीन नावे नजरेसमोर येतात. इम्रान खान यांना काही काळापूर्वी सत्तेतून पायउतार व्हावे लागले असले तरी, त्यांची लोकप्रियता कायम आहे. किंबहुना ती वाढू लागली असल्याचे गेल्याच महिन्यात पार पडलेल्या संसद व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निलांवरून दिसते.

दुसरीकडे पोटनिवडणूक विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मात्र चांगलीच धोबीपछाड़ मिळाली. त्यामुळे स्वाभाविकपणे संशयाची एक सुई सत्ताधाऱ्यांकडे वळली आहे, इम्रान खान सत्तेतून पायउतार झाल्यापासून लष्कर आणि आयएसआयवर सातत्याने हल्ले चढवीत आहेत. जे सोयीचे नाहीत, त्यांचा काटा काढण्याचा पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा इतिहास आहे. सत्ताधारी, तसेच लष्कर व आयएसआयकडे इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यासाठी आवश्यक उद्देश असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी, पंतप्रधान चीनमध्ये आणि लष्करप्रमुख अमेरिकेत असताना, ते अशा हल्ल्याला परवानगी देतील का, हा प्रश्न शिल्लक उरतोच! दुसरीकडे हल्ल्याचा सर्वाधिक लाभ कुणाला होऊ शकतो, या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयास केल्यास, सर्वात समोर येणारे नाव म्हणजे खुद्द इम्रान खान!

सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या नेत्याला अनेकदा सहानुभूतीचा मोठा लाभ मिळतो. त्यामुळे असा लाभ मिळवून घेण्यासाठी इम्रान खान यांनी स्वतःच तर हल्ल्याचा बनाव घडवून आणला नाही ना, अशीही शंका उपस्थित होऊ लागली आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या वेगवेगळ्या ध्वनिचित्रफिती, एकापेक्षा जास्त हल्लेखोर, इम्रान खान यांना गोळी शरीराच्या वरच्या भागात न लागता पायात लागणे, हल्ला इम्रान खान यांच्या पक्षाचे सरकार सत्तेत असलेल्या प्रांतात होणे, हे सर्व बघू जाता तशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. अर्थात, पाकिस्तानसारख्या देशात खरे हल्लेखोर पकडले जाणे, हल्ल्यामागील नेमका उद्देश समोर येणे, ही बाब जवळपास अशक्यप्राय आहे. आगामी काळात पाकिस्तानच्या राजकारणात या हल्ल्याचे पडसाद उमटत राहतील, हे मात्र निश्चित आहे. स्वत: इम्रान खान आणि त्यांचे विरोधक दोघेही हल्ल्याचा लाभ पदरात पाडून घेण्याचे पुरेपूर प्रयत्न करतीलच !

Web Title: Pakistan Former PM Imran Khan and the needle of doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.