युद्ध परवडणार नाही म्हणूनच पाकिस्तानकडून प्रत्युत्तराची घाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 04:36 PM2019-02-27T16:36:23+5:302019-02-27T16:44:07+5:30

भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

pakistan immediately responds to indian air strike to bring international interference | युद्ध परवडणार नाही म्हणूनच पाकिस्तानकडून प्रत्युत्तराची घाई

युद्ध परवडणार नाही म्हणूनच पाकिस्तानकडून प्रत्युत्तराची घाई

Next

- प्रशांत दीक्षित

पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तर देणार यात शंका नव्हती. ही शक्यता लक्षात घेऊनच भारताने सर्व महत्वाच्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला होता. पाकिस्ताननेही काल भारताप्रमाणेच वक्तव्य करून आमच्या सोयीनुसार आम्ही हल्ला करू असे म्हटले होते. याचा अर्थ योग्य संधी व वेळेची वाट पाहून पाकिस्तान प्रतिहल्ला करील असे समजले जात होते.

परंतु, आज सकाळी पाकिस्तानने काश्मीर व पंजाबच्या आकाशात अचानक हालचाली सुरू केल्या. भारताचे विमान पाडल्याचा व दोन भारतीय वैमानिकांना पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला. त्याची चित्रेही व्हायरल केली. ही चित्रे मुळात कर्नाटकमध्ये २०१६मध्ये कोसळलेल्या मिग विमानाची होती असे इंडिया टुडेने दाखवून दिले. पाकिस्तानने व्हायरल केलेल्या व्हिडियोमध्ये कन्नड भाषेत झालेले संभाषण ऐकू येते. मात्र पाकिस्तानच्या दाव्याचा स्पष्ट इन्कार भारताने केलेला नाही.

तरीही पंजाब व काश्मीरच्या आकाशात वातावरण तंग झाले आहे व हवाई हालचाली वाढल्या आहेत. दोन्ही देशांनी त्या प्रदेशातील नागरी हवाई उड्डाणे रद्द केली आहेत व पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय उड्डाणेही काही भागात रद्द केली आहेत.

भारतीय हद्दीत घुसून हल्ला केल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. मात्र नागरी वस्त्यांवर हल्ला केला नाही असेही म्हटले आहे. उलट आपले सर्व पायलट सुरक्षित असल्याचे वायूदलातील सूत्रांनी म्हटले आहे. तसेच बडगाम भागात पडलेल्या हॅलिकॉप्टरमागे तांत्रिक कारण होते, पाकिस्तानचा मारा नव्हे असा खुलासा केला आहे. 'भारताने पाकिस्तानचे एफ-16 विमानं जमीनदोस्त केले. याच कारवाई दरम्यान भारताचे एक विमान कोसळले,' अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

अर्थात पाकिस्तान प्रतिहल्ला करणार हे निश्चित व त्यामध्ये भारताचे नुकसानही होऊ शकते. भारताने हवाई हल्ला केला तेव्हाच ही बाब स्पष्ट झाली होती. परंतु, पाकिस्तान इतक्या लवकर सक्रीय होण्याचे कारण समजून घेतले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तान सरकार व लष्कर यांना आपल्या नागरिकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काहीतरी तातडीने करून दाखविणे गरजेचे आहे. भारताचा हवाई हल्ला ही पाकिस्तान लष्करासाठी फार मोठी नाचक्की होती. पाकिस्तानसाठी चिंतेची बाब म्हणजे भारतीय विमानांना २१ मिनिटांत पाकिस्तानकडून काहीच प्रतिकार झाला नाही. पाकिस्तानी लष्कर व वायूदलातील शैथिल्य त्यातून समोर आले. लष्करासाठी ही बाब अतिशय लाजिरवाणी असल्याने पाकिस्तानी लष्कर व वायूदल काहीतरी चमकदार कृती तातडीने करण्याची धडपड करीत आहे.

याच बरोबर भारताबरोबरचा संघर्ष तातडीने आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा आणि आणखी हल्ले किंवा सर्जिकल स्ट्राईक करण्यापासून भारताला रोखण्यासाठी जगातील महासत्तांनी लगेच हस्तक्षेप करावा ही पाकिस्तानची इच्छा आहे. कारण भारताने खरोखर युद्ध पुकारले तर पाकिस्तानी लष्कर काही काळ कडवा प्रतिकार करील वा भारताचे मोठे नुकसानही करील. परंतु, हे काही दिवसच चालू शकेल. युद्धासाठी केवळ शौर्य उपयोगी नसते. युद्ध चालविण्यासाठी प्रचंड पैसा लागतो व त्यासाठी देशाची अर्थव्यवस्था सक्षम असावी लागते. अनेक दिवस युद्ध चालविण्याची क्षमता भारताकडे आहे व भारताकडे विस्तृत भूभागही आहे. पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. पाकिस्तान लहान तिखट हल्ले करू शकतो वा दहशतवाद्यांना हाताशी धरून आणखी हल्ले करू शकतो. परंतु, सर्वंकष युद्ध करण्यासाठी लागणारा पैसा सध्या पाकिस्तानकडे नाही.

युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप हवा आहे. त्यासाठी वातावरण तापले पाहिजे. भारत व पाकिस्तानच्या वायूदल व लष्करामध्ये मोठ्या चकमकी सुरू झाल्या तर या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्याचे चित्र जगासमोर उभे राहिल. हे केवळ दोन देशांमधील युद्ध नसून दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील युद्ध आहे हे पाकिस्तानला जगाच्या लक्षात आणून द्यायचे आहे. म्हणून भारताने काल हल्ला केल्यानंतर इम्रान खान यांनी तातडीने पाकिस्तान सुप्रिम कमांडची बैठक बोलविली. पाकिस्तानच्या ताब्यातील अण्वस्त्रांची सूत्रे या कमांडकडे असतात. खरे तर एका सर्जिकल स्ट्राईकसाठी सुप्रिम कमांडची बैठक बोलविण्याची गरज नव्हती. सुप्रिम कमांडचा हस्तक्षेप हा युद्ध आवाक्याबाहेर गेल्यावर केला जातो.

तथापि, सुप्रिम कमांडची बैठक घेऊन पाकिस्तानला जगाला इशारा द्यायचा आहे की भारताने हल्ले सुरू ठेवले तर अण्वस्त्राचा पर्याय आम्ही वापरू शकतो. दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास तो जागतिक शांततेला धोका आहे असे समजून युनोच्या सुरक्षा समितीला त्यामध्ये हस्तक्षेप करता येतो. त्याचबरोबर अणुयुद्ध टाळण्यासाठी अमेरिका, चीन, फ्रान्स वा अन्य बडे देश पुढाकार घेऊ शकतात. सध्या अमेरिकेला इथे युद्ध नको आहे. उत्तर कोरियाशी ट्रंप यांच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यावरून जगाचे लक्ष उडविणाऱ्या घटना अमेरिकेला नको आहेत. त्याचबरोबर तालिबानी नेत्यांशी अमेरिकेच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यामध्ये अमेरिकेला पाकिस्तानची मदत हवी आहे. भारत आगळीक करीत असेल तर आम्हाला मदत करता येणार नाही अशी तक्रार पाकिस्तान अमेरिकेकडे करू शकतो. या देशांनी भारतावर दबाव टाकून आणखी हल्ले करण्यापासून भारताला रोखावे हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे.

दुसरा भाग म्हणजे इंटरनॅशनल इस्लामिक कंट्रीची महत्वाची परिषद लवकरच सुरू होत आहे. या परिषदेत प्रथमच भारताला आमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वी कधीही भारताला आमंत्रण नव्हते व आमंत्रण न येण्यामागे पाकिस्तानचाच हस्तक्षेप होता. या परिषदेत दरवेळी पाकिस्तान काश्मीरवरून भारतावर तोंडसुख घेत असे. यावेळी भारताला बोलविल्यामुळे पाकिस्तान खवळला आहे, पण सौदी अरेबियासमोर पाकिस्तान काही बोलू शकत नाही आणि सौदीनेच भारताला आमंत्रित केले आहे. मात्र भारत हे युद्धखोर राष्ट्र आहे व इस्लामला धोका निर्माण करणारे आहे असा कांगावा या परिषदेत करण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे. 

आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप झाला तर पाकिस्तानला युद्धापासून स्वतःला वाचविता येईल आणि भारतालाही चाप बसविता येईल. या उद्देशानेच पाकिस्तान तातडीने हल्ले करीत आहे. त्याला जगाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे आणि इस्मामिक राष्ट्रांमध्येही भारताबद्दल मत कलुषित करायचे आहे. पाकिस्तानने तत्परतेने केलेल्या आजच्या प्रतिहल्ल्यामागे ही योजना आहे.
 

Web Title: pakistan immediately responds to indian air strike to bring international interference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.