पाकिस्तानी बिल्ली हज को चली! दहशतवादी हल्ला भारत कसा बरे विसरू शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 06:53 AM2022-08-23T06:53:29+5:302022-08-23T06:55:08+5:30

पाकिस्तानला म्हणे भारतासोबतच्या शांततामय सहजीवनाची आस लागली आहे! होय..आणि हे विधान दुसऱ्या कुणी नव्हे, तर खुद्द पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले आहे.

pakistan pm shahbaz sharif wants to talk with india and peaceful ties on kashmir | पाकिस्तानी बिल्ली हज को चली! दहशतवादी हल्ला भारत कसा बरे विसरू शकेल?

पाकिस्तानी बिल्ली हज को चली! दहशतवादी हल्ला भारत कसा बरे विसरू शकेल?

Next

पाकिस्तानला म्हणे भारतासोबतच्या शांततामय सहजीवनाची आस लागली आहे! होय..आणि हे विधान दुसऱ्या कुणी नव्हे, तर खुद्द पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले आहे. शनिवारी हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. पाकिस्तानला प्रदेशात दीर्घकालीन शांतता हवी आहे आणि ते साध्य झाल्यास संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांच्या आधारेच काश्मीर प्रश्नावर तोडगा निघू शकतो, युद्ध हा काही त्यासाठीचा पर्याय नव्हे, असे शरीफ म्हणाले. पाकिस्तानी पंतप्रधानांची भूमिका स्वागतार्हच आहे; पण ती कितपत प्रामाणिक आहे, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

मुळात शरीफ यांचे वक्तव्यच पाकिस्तानच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते! पाकिस्तानने काश्मीरमधून आपली फौज मागे घ्यावी, ही संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांमधील सर्वात पहिली अट आहे. पाकिस्तानने फाळणी होताच काश्मीरमध्ये फौज घुसवली आणि तेव्हापासून आजतागायत पाकव्याप्त काश्मीर व गिलगीट बाल्टीस्तानवर अवैध कब्जा केलेला आहे. एवढेच नव्हे तर चीनला अरबी समुद्रात प्रवेश देण्यासाठी, त्या भागातून चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरची निर्मितीही सुरू केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारतासोबतच्या शांततामय सहजीवनाची आस लागली आहे आणि काश्मीर समस्येवर शांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढायचा आहे, या भूमिकेवर कितपत विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे.

भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासात पानोपानी पाकिस्तानने केलेल्या दगाबाजीच्या नोंदी आहेत. पहिली दगाबाजी तर फाळणीनंतर लगेच काश्मिरात फौज घुसवून झाली होती. त्यानंतर १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये पाकिस्ताननेच भारतावर युद्ध लादले होते. युद्धात डाळ शिजत नसल्याने भारतात दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तानने केले. त्यामध्ये पंजाब आणि जम्मू-काश्मीर हे दोन प्रांत तर होरपळून निघालेच; पण उर्वरित भारतानेही पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचे दाहक अनुभव घेतले.

भारताच्या आर्थिक राजधानीने २००८ मध्ये अनुभवलेला आणि २६/११ या नावाने जागतिक पातळीवर कुख्यात झालेला भीषण दहशतवादी हल्ला भारत कसा बरे विसरू शकेल? आज पाकिस्तानी पंतप्रधान भारतासोबत शांततामय सहजीवन हवे असल्याची भूमिका घेत आहेत; परंतु त्या देशाने अंतर्गत शांततामय सहजीवनावर तरी विश्वास ठेवला आहे का? जुल्फिकार भुट्टो या माजी पंतप्रधानांना फाशी, त्यांचीच कन्या असलेल्या अन्य एक माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू, लष्करशहा जनरल झिया उल हक यांचा संशयास्पद विमान अपघातात मृत्यू, अन्य एक लष्करशहा परवेज मुशर्रफ व विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे बंधू असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातून परागंदा होण्याची पाळी येणे, हे काय दर्शवते? एखाद-दुसरा अपवाद वगळता, बहुतांश पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सत्तेतून पायउतार होताच, एक तर अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले, तुरुंगात खितपत पडावे लागले किंवा देशातून पलायन करावे लागले!

आताही माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. त्यामुळे शांततामय सहजीवनाची भाषा आपल्या तोंडी कितपत शोभते, याचा शरीफ यांनीच विचार करायला हवा! याउलट भारताने आधुनिक काळातच नव्हे, तर गत काही सहस्त्रकांमध्येही कोणत्याही देशावर आक्रमण केल्याची नोंद नाही. जे आश्रय मागायला आले, त्यांना तर या देशाने उदारपणे आश्रय दिलाच; पण जे आक्रमक इथेच स्थायिक झाले त्यांनाही सामावून घेतले. त्यामुळे पाकिस्तानने भारताला शांततामय सहजीवनाचे धडे देण्याची गरज नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुरती जर्जर झाली आहे. आज तो देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. मध्य-पूर्व आशियातील अरब देश, अमेरिका, युरोपियन युनियन, तसेच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संघटनांपुढे वारंवार तोंड वेंगाळल्यानंतरही, कुणीही पाकिस्तानला दारात उभे करायला तयार नाही. गत काही काळात एकटा चीन तेवढा पाकिस्तानसोबत दिसला; पण तो मदतीची दामदुप्पट किंमत वसूल करतो! अलीकडे तर चीननेही हात आखडता घेतला आहे.

त्यामुळे आता पाकिस्तानी पंतप्रधानांना भारताची आठवण झाली आहे. भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापार सुरू होणे, हीच पाकिस्तानसाठी शेवटची आशा आहे. त्या अनुषंगानेच शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्याकडे बघायला हवे! सौ चुहे खाकर पाकिस्तानी बिल्ली हज को निकली है, हेच खरे!

Web Title: pakistan pm shahbaz sharif wants to talk with india and peaceful ties on kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.