इसिसचे नाव घेणे पाकिस्तानच्या फायद्याचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 02:01 AM2019-01-05T02:01:18+5:302019-01-05T02:02:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांना खात्री आहे, की इसिस या संघटनेचा वापर करून तरुणांना भारताच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. विशेषत: जम्मू-काश्मीरमधील तरुणांना या पद्धतीने बहकविण्यात येत असल्याने त्याचा समूळ नायनाट करण्याची गरज आहे.

Pakistan's advantage to take isis name | इसिसचे नाव घेणे पाकिस्तानच्या फायद्याचे

इसिसचे नाव घेणे पाकिस्तानच्या फायद्याचे

Next

- आलोक जोशी
(‘रॉ’ संघटनेचे माजी प्रमुख व एनटीआरओचे संचालक)

रा ष्ट्रीय सुरक्षा संघटनेने उत्तर प्रदेश आणि दिल्लीत वेगवेगळ््या ठिकाणी छापे टाकून दहशतवादी गटातील तरुणांना अटक केल्यामुळे अनेकांना हायसे वाटले असेल. त्यांच्याजवळून देशी बनावटीची शस्त्रास्त्रे आणि गावठी बॉम्ब जप्त केल्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंका घेण्याचे कारण उरत नाही. या दहशतवादी गटावर सुरक्षा संघटना चार महिन्यांपासून नजर ठेवून होत्या असे मीडियातील वृत्तावरून समजते. हा दहशतवादी गट दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यास सक्रिय होत आहे, हे बघून सुरक्षा संघटनेने झटपट हालचाल करून त्यांना पकडले, असे दिसते. या गोष्टीमुळे दोन सकारात्मक गोष्टी प्रकाशात आल्या. एक म्हणजे केंद्रीय संस्था अािण पोलीस दलात वाढत असलेला समन्वय आणि दुसरी म्हणजे दहशतवादी गटांना चांगली शस्त्रास्त्रे मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे त्यांना आता गावठी शस्त्रांकडे वळावे लागले आहे. पण हा गट इसिसकडून प्रेरणा घेत होता, अशा तºहेने त्यांच्याबद्दल आलेले वर्णन ही बाब मात्र तितकीच चिंताजनक आहे.
तसे पाहता सततच्या कारवाईमुळे इसिस ही संघटना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पण त्या संघटनेचा विचार अजूनही जिवंत असल्याचे दिसते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इसिसवर ताबा मिळविला असल्याचे घोषित करून सिरियामधून आपले सैन्य मागे घेण्याचे समर्थन केले आहे. पण जागतिक स्तरावर इसिसची विचारधारा अद्याप जिवंत असल्याचे आणि ती तरुणांची मने कलुषित करीत असल्याचे या घटनेतून दिसून येते. हे तरुण त्याच विचारधारेखाली इसिसच्या नाही तर अन्य झेंड्याखाली काम करू लागले आहेत, त्यामुळे इसिस संपली आहे असा कुणी प्रचार करू नये, हा धडाही या घटनेमुळे मिळाला आहे. हायड्रा या प्राण्याचे मस्तक तोडले तरी तेथे नवे मस्तक जन्म घेत असे. त्यासारखेच हे आहे. त्यामुळे भारताने तरी वाट पाहा आणि लक्ष ठेवा हीच भूमिका घ्यायला हवी. भारतातील नव्याने पकडला गेलेला दहशतवादी गट हा इसिसपासून प्रेरणा घेत होता, असे थेट म्हणणे हे अनेक कारणांनी चुकीचे ठरणारे आहे. त्यापेक्षा तो इसिसच्या विचारधारेखाली काम करत होता, असे म्हणणे नेमकेपणाचे ठरेल.
पाकिस्तानची आयएसआय संघटना अनेक दहशतवादी संघटनांना बळ देत असते. इस्लामिक स्टेट आॅफ खोरासान प्रॉव्हिन्स (आयएसकेपी) ही अफगाणिस्तानातील संघटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. मुल्ला ओमर यांच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये सुरू झालेल्या सत्ता संघर्षातून या संघटनेचा जन्म झाला असून तिचे धागेदोरे आयएसआयसी जुळले आहेत. त्यामुळे ही संघटना पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर सक्रिय झाली आहे. त्यामुळे भारतात पकडण्यात आलेले दहशतवादी थेट इसिस नव्हे, तर आयएसआय या संघटनेसाठी काम करीत असल्याची शक्यता अधिक आहे.
इंडियन मुजहिदीन ही संघटना संपुष्टात आल्यावर २०१४ साली आयएसआयने इसिसच्या नावाखाली तरुणांची भरती करणे सुरू केले होते. त्यावेळी इराकमध्ये खालिफत स्थापन करण्यासाठी तरुणांना आवाहन करण्यात आले होते. मोसूल येथे जाण्याचा मार्ग हा कराचीमार्गेच होता. या मार्गाने तरुणांना आणून त्यांना प्रशिक्षण देऊन पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या नेतृत्वाखाली त्यांना सोपविण्यात आले होते. त्यामुळे काही काळ इंडियन मुजाहिदीनमध्येही तणावाचे वातावरण होते. परिणामी काही तरुणांनी ती संघटना सोडूनही दिली होती.
या परिस्थितीत भारतातील सुरक्षा संस्थांनी झटपट कारवाई करून, छापे टाकून आणि काही जणांची धरपकड करून संभाव्य दहशतवादी हल्ले रोखण्याचे काम केले आहे. पण आता त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी मिळून त्याचा फायदा देशाच्या शत्रूंना मिळू नये, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. इसिस ही संघटना जरी संपली असली, तरी त्या नावाखाली त्या संघटनेचे तत्त्वज्ञान जिवंत ठेवून त्याचा वापर तरुणांना शस्त्रसज्ज करण्यासाठी होण्याची भीती संपलेली नाही आणि भविष्यात त्यांचा उपयोग भारताच्या हिताविरोधात होणार आहे, असा प्रचार भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याची गरज आहे. या तरुणांचा वापर भारताच्या शत्रूंच्या हातातील बाहुले म्हणून होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी पावले उचलण्याची खरी गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांना खात्री आहे, की इसिस या संघटनेचा वापर करून तरुणांना भारताच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. विशेषत: जम्मू-काश्मीरमधील तरुणांना या पद्धतीने बहकविण्यात येत असल्याने त्याचा समूळ नायनाट करण्याची गरज आहे. या दहशतवादी गटाला पकडल्यानंतर त्यांच्या पकडण्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ देणे हे देशहितासाठी अपायकारक ठरू शकते याची जाणीव भारताच्या तपास संस्थांनी ठेवायला हवी आणि आपल्या शत्रूचे हात बळकट करणे टाळायला हवे. त्यासाठी या कारवाईपुरते न थांबता पुढील व्यूहरचना तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Pakistan's advantage to take isis name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ISISइसिस