पाकिस्तानची लोकशाही संकटात
By admin | Published: September 10, 2014 08:52 AM2014-09-10T08:52:25+5:302014-09-10T08:52:25+5:30
लोकशाही वाचवण्यासाठी पाकिस्तानची जनता रस्त्यावर उतरली होती. पण आज मामला उलटा आहे. लष्कराच्या विरोधात रस्त्यावर उतरणारी जनताच आज लष्कराला साकडे घालत आहे.
कुलदीप नय्यर ,ज्येष्ठ स्तंभलेखक
पाकिस्तानचे लष्कर विचित्र आहे. देशाचे प्रश्न निकालात काढताना आपल्याला विश्वासात घेतले पाहिजे, असे त्याला वाटते आणि म्हणून वेळोवेळी लष्कर तिथल्या सरकारी कारभारात ढवळाढवळ करते. आजही पाकिस्तानमध्ये तीच परिस्थिती आहे. एक काळ असा होता की, लोकशाही वाचवण्यासाठी पाकिस्तानची जनता रस्त्यावर उतरली होती. पण आज मामला उलटा आहे. लष्कराच्या विरोधात रस्त्यावर उतरणारी जनताच आज लष्कराला साकडे घालत आहे. उरल्यासुरल्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी सैन्याने हस्तक्षेप करावा, अशी पाकिस्तानी लोकांची इच्छा आहे. लोकशाही मार्गाने आलेले पंतप्रधान नवाझ शरीफ मदतीची विनंती घेऊन लष्करप्रमुख राहील शरीफ यांना भेटले तेव्हा हे स्पष्ट दिसले. गुपचूप लष्करप्रमुखांना भेटलो तर गवगवा होणार नाही, असा विचार शरीफ यांनी केला होता. पण लष्कराने एक पत्रक काढले. ‘पंतप्रधानाने आपल्याकडे मदतीची याचना केली होती; पण आम्ही ती स्वीकारली नाही’ असा खुलासा लष्कराने केला. लोकशाहीत सैन्याची भूमिका देशाचे रक्षण करण्याची आहे, देश चालवण्याची नाही, असा लष्कराचा युक्तिवाद होता.
पाकिस्तानातील सध्याच्या संकटासाठी नवाज शरीफच जबाबदार आहेत. त्यांनी स्वत:च हे दुखणे विकत घेतले. गैरकारभारामुळे जनतेपासून शरीफ दूर गेले आहेत. शरीफ आणि त्यांचे बंधू पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी आपापले पद सोडून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, अशी जनतेची मागणी आहे. पण लोकेच्छेला सामोरे जाण्याऐवजी त्यांनी आपल्या पाठिंब्याचा एक ठराव संसदेत संमत करून घेतला. त्याचा काहीही फायदा नाही. तेहरिक-ए-इन्साफचे इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तेहरिकचे कादरी यांनी पंतप्रधानांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे. काही नेत्यांनी मध्यावधी निवडणुकांची मागणी केली आहे. नवाज यांनी जनतेचा विश्वास गमावला असल्याने सरकार कोणी चालवायचे याचा जनतेने नव्याने निर्णय करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणुका झाल्या तर त्याच लष्कराच्या हाती कारभार येईल.
एकेकाळी जनतेला नको होते, तेच घडेल. पण लष्कराशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. नवाज नकोत तर मग कोण? दुसऱ्या कुणाच्या नावावर एकमत होण्याची शक्यता नाही. लष्करच ऐक्याचे सूत्र दिसते. पण लष्कर पुढे यायला कांकू करीत आहे. सैन्याच्या कमांडरांच्या बैठकीत हे चित्र समोर आले. पण पाकिस्तानचे लष्कर साधुसंतांचे नाही. त्या देशात सध्या जे काही घडत आहे त्याच्या मुळाशी लष्करच आहे. सैन्याने देशाचा कारभार हातात घ्यावा, अशी जनतेची मानसिकता आहे. सुटकेचा दुसरा मार्ग दिसत नाही. पाकिस्तानात अशी परिस्थिती याआधीही उद्भवली होती. लोकांची इच्छा असताना किंवा नसतानाही तब्बल ३७ वर्षे लष्कराने पाकिस्तानवर राज्य केले आहे.
लष्कराने सत्ता गाजवावी, असे कोणत्याही लोकशाहीप्रधान देशाला वाटणार नाही. पण इथे काही विरोधी नेत्यांनी देश चालवण्यात लष्कराची भूमिका असली पाहिजे, असा रेटा लावला आहे. प्रमुख राजकीय पक्ष मात्र या मताचे नाहीत. सध्या लष्कर मध्यस्थाची भूमिका निभवत आहे. एका राजकीय पक्षाचे विचार दुसऱ्यापर्यंत पोचवत आहे. एका अर्थाने तिथे लष्कर हे एक तटस्थ पक्षच बनले आहे. पूर्वाश्रमीचे क्रिकेटपटू इम्रान खान यांची सध्या चलती आहे. ‘नवाज राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत राजधानीतील रस्त्यावर बसलेले आपले समर्थक उठणार नाहीत’ असे इम्रान खान यांनी जाहीर करताच पाकिस्तानात मोठे आंदोलन पेटले. अवामी तेहरिकचे कादरी यांनीही या आंदोलनात उडी घेतली; कारण त्यांनाही नवाज नको आहेत.
जनसंपर्क ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. आपण जे काही करीत आहोत ते लोकशाही अबाधित राखण्यासाठी, अशी नवाज यांची भूमिका आहे. नवाज यांच्या तोंडी लोकशाहीची भाषा ऐकून गंमत वाटते. याच नवाज यांना काही वर्षांपूर्वी सैन्याने पंतप्रधानपदावरून हुसकावले होते. आज मात्र ते सैन्याला मदतीला यायला सांगत आहेत. लष्कर मदतीला येईलही; पण गरज वाटेल तेव्हा ते नवाजना घालवूही शकते. नवाज आपल्या वक्तव्यामध्ये सारखा लोकशाहीचा जप करीत आहेत त्यामागचे कारण ही भीती आहे.
नको असतानाही पाकिस्तानात लष्कराची ढवळाढवळ नेहमीची बाब झाली आहे. लोकांना याची सवय झाली आहे. लष्कराच्या सत्तेचा लोक स्थैर्याशी संबंध जोडत आहेत. तसा विचार केला तर ही भावना लोकशाहीविरोधी आहे. लष्कराचे अनुशासन हुकूमशहासारखे असते.
पाकिस्तानातील दृश्य पाहून दु:ख होते. उच्च पातळीवरील भ्रष्टाचाराने लष्कराला याआधी एकदा हस्तक्षेप करायला संधी मिळाली होती. जनरल अयबू खान तेव्हा लष्करप्रमुख होते. परिस्थितीचा फायदा उठवत त्यांनी मार्शल लॉ लागू केला होता. त्यांची सत्ता आठ वर्षे चालली. तेव्हापासून पाकिस्तानात अस्थिरता आहे. पाकिस्तानच्या फाळणीला लष्करच जबाबदार होते. लष्कराच्या कठोर वागण्यातून बांगलादेशचा जन्म झाला. पाकिस्तान किंवा बांगलादेश कितीही लोकशाहीच्या गप्पा मारीत असले तरी लष्कराशी बोलल्याशिवाय त्यांचे पान हालत नाही हे दुर्दैव आहे. निवडणुकीच्या रूपाने का होईना, तिथे नैवेद्याला थोडीफार लोकशाही टिकून आहे.
मध्यावधी निवडणुका झाल्या तर कमी संख्याबळाने का होईना, नवाज शरीफ हेच सत्तेत येतील, अशी भविष्यवाणी एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केली आहे. तरीही शेवट दु:खद असेल. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या एका पंतप्रधानाला अवघ्या ३८ जागा जिंकणाऱ्या राजकीय पक्षाचे प्रमुख इम्रान खान सत्ता सोडायला सांगत आहेत. निवडणुका केव्हा होतील आणि झाल्या तर कसले वळण घेतील याचा अंदाज बांधणे अवघड आहे. तोपर्यंत पाकिस्तानची लोकशाही व्यवस्था संकटात असेल.