पाकिस्तानचं हित जपणं हा शिवसेनेचा वसाच!
By admin | Published: October 14, 2015 10:26 PM2015-10-14T22:26:00+5:302015-10-14T22:26:00+5:30
‘पाकिस्तान’ या चार अक्षरांच्या शब्दाचा वापर करून भारतात गेली ६७ वर्षे राजकीय व सामाजिक वादळं सतत उठवली गेली आहेत. सुधींद्र कुळकर्णी यांच्या तोंडाला काळं फासण्याचा जो प्रकार मुंबईत सोमवारी घडला
प्रकाश बाळ, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
‘पाकिस्तान’ या चार अक्षरांच्या शब्दाचा वापर करून भारतात गेली ६७ वर्षे राजकीय व सामाजिक वादळं सतत उठवली गेली आहेत. सुधींद्र कुळकर्णी यांच्या तोंडाला काळं फासण्याचा जो प्रकार मुंबईत सोमवारी घडला, तो गेली साडेसहा दशकं अखंड चालू असलेल्या या राजकीय-सामाजिक नाटकाचा पुढचा प्रवेश होता आणि या ६७ वर्षांच्या अनुभवातून अजूनही आपण शहाणे झालेलोच नाही, हे सोमवारच्या प्रकारानं पुन्हा एकदा प्रकर्षानं दाखवून दिलं.
भारताची बरोबरी करणं, ही पाकच्या राज्यकर्त्या वर्गाची नैसर्गिक गरज बनली आहे. लष्कर, नोकरशाही व जमीनदार-मालमत्तादार यांच्या मिळून बनलेल्या या राज्यकर्त्या वर्गानं १९४७ साली पाकची सूत्रं हाती घेतली आणि आजही त्याच वर्गाच्या हाती सत्ता आहे. मुस्लिमांसाठीचं पाक अस्तित्वात आलं, पण बहुसंख्य मुस्लीम भारतातच राहिले. त्यामुळं भारताची ‘बरोबरी’ करायची, तर येथील मुस्लीम कायम असंतुष्ट व अस्वस्थ कसे राहतील, यासाठी प्रयत्न करणं, यातच पाकला आपलं हित दिसत आलं आहे.
...आणि गेल्या ६७ वर्षांत भारत कायमच पाकचं हे हित जपत आला आहे! सोमवारची घटना म्हणजे पाकचं हित जपण्याचा आपला वसा सेनेनं टाकून न दिल्याची पावतीच आहे.
खरं तर ‘हिंदुत्व’ हा जसा सेनेसाठी सोईचा ‘जुमला’ आहे, तसाच पाकही वेळ पडेल, तेव्हा वापरण्याचा ‘बागुलबुवा’ आहे. सध्या सेना राजकीय पेचात सापडली आहे. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पुढं गेला. त्यामुळं युतीचं स्वरूप ‘सेना-भाजपा’ऐवजी ‘भाजपा-सेना’ असं बनलं. छोटा भाऊ; मोठा बनला आाण कानामागून येऊन तिखट होऊन दादागिरी करू लागला. त्यातही मोदी-अमित शाह दुकलीला सेनेचं वावडं आहे. त्यामुळं सेनेचं नाक कापणं हा या दुकलीचा महाराष्ट्रातील एक महत्वाचा अजेंडा होता व आजही आहे. साहजिकच राज्यातील सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळावा, यासाठी सेनेला नाकदुऱ्या काढायला लावण्यात आल्या. शिवाय ‘तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणं वागला नाहीत, तर सेना फोडू’, असा गर्भित इशाराही भाजपानं देऊन ठेवला आहे. राज्यातील निवडणुकीच्या आधीची १५ वर्षे सत्तेपासून दूर राहावं लागल्यानं सेनेतील सत्तातुरांचा एक मोठा गट गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेलाच होता. त्याला भाजपा लालूच दाखवत होती. अशा रीतीनं पेचात सापडल्यावरच नेतृत्वाची खरी कसोटी लागते आणि राजकीय धमक दाखवण्याची तीच वेळ असते. भाजपाशी ‘राडा’ करण्याची बहुसंख्य सर्वसामान्य शिवसैनिकांची तयारी होती. पण उद्धव ठाकरे यांनी कच खाल्ली आणि भाजपानं फेकलेला सत्तेचा चतकोर पदरात पाडून घेऊन सेना मंत्रिमंडळात गेली. तेव्हापासून सत्तेच्या चौकटीतील सेनेसाठी ठेवण्यात आलेली वळचणीची जागा या पक्षाला दाखवून देण्यावर भाजपाचा भर राहिला आहे. या ना त्या प्रकारं भाजपाला उत्तर देण्याचा प्रयत्न सेना करीत आली आहे. अर्थात हा नथीतून तीर मारण्याचा प्रकार होता व आहे. मुंबईत सोमवारी घडलेली घटना हा त्याचाच एक भाग होता.
भाजपा व सेनेतील ही खडाखडी अशीच चालू राहणार आहे. मात्र भाजपा सेनेला भीक घालण्याची फारशी शक्यता नाही आणि सत्ता व संपत्ती यांच्या चौकटीतील हितसंबंध उद्धव ठाकरे यांना सोमवारच्या ‘रंगफेकी’पलीकडं जाऊ देतील, असंही दिसत नाही. सेनेची खरी कसोटी दोन वर्षांनी २०१७ साली होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी लागणार आहे. मोदी-शाह दुकलीची मुंबईवर ‘राज्य’ करायची मनिषा आहे. त्यामुळं सेनेला राजकीय किनाऱ्याला लावण्यासाठी भाजपा पक्का बंदोबस्त निश्चितच करणार आहे. मुंबई महापालिकेतील नालेसफाईचं प्रकरण ज्या प्रकारे भाजपा धसास लावत आहे, तो या आगामी मोर्चेबांधणीच्या तयारीचाच एक भाग आहे. साहजिकच सत्ता व संपत्ती यांचे हितसंबंध मोडण्याची राजकीय धमक उद्धव ठाकरे यांनी दाखवली नाही, तर सेनेचं भवितव्य अंध:कारमय बनण्याची शक्यता आहे. मात्र सेना अजून अडखळत असल्यानंच सोमवारच्या ‘रंगफेकी’पर्यंतच तिची मजल गेली.
अर्थात या घटनेमुळं अंतिमत: पाकचंच हित जपलं जाणार आहे, याची सेनेला खंत असण्याचं काहीच कारण नाही. किंबहुना अशा रीतीनं पाकचं हित जपलं जाण्यातच आपलं राजकीय हित आहे, अशीच सेनेची एकूण वाटचाल राहिली आहे.
मात्र शिवसेना हा काही अपवाद नाही. एक डावे पक्ष काही प्रमाणात वगळता, भारतातील इतर साऱ्या पक्षांनी देशातील मुस्लिमांकडं या देशाचे समान नागरिक म्हणून पाहिलेलंच नाही. स्वातंत्र्यानंतरच्या सुरूवातीच्या दोन दशकातील नेहरू पर्वाची अखेर झाल्यावर काँग्रेसनं मुस्लिमांकडं फक्त ‘मतदार’ म्हणूनच पाहिलं. ‘अनुनय व असुरक्षितता’ या दुष्टचक्रात त्यांना अडकवून ठेवलं. हिंदुत्ववाद्यांना तर या देशात मुस्लिम नकोच आहेत. ‘राहणार असाल, तर आम्ही सांगतो तसं वागा, गपगुमान पडून राहा, अन्यथा भोगा आपल्या कर्माची फळं’, असाच हिंदुत्ववाद्यांचा सत्ता नसतानाचा पवित्रा होता. पुढं राज्यातील व आता केंद्रातील सत्ता हाती आल्यावर या पवित्र्यानुसार धोरणं आखली जात आहेत. ‘दादरी’ हे त्याचं ठळक उदाहरण. सर्वच राजकीय पक्षांच्या या अशा पवित्र्यामुळं मुस्लिम समाजातही पुराणमतवादी प्रवृत्ती व शक्ती यांचंच बस्तान बसत गेलं आहे. ही मंडळी व हे राजकीय पक्ष या दोघांच्या दृष्टीनं ही सोईची व्यवस्था तयार झाली आहे. मधल्या मध्ये सर्वसामान्य
मुस्लीम भरडला जात आहे आणि त्यातील काही जण
मग ‘इसीस’ वा इतर दहशतवादी संघटनांकडं ओढले जातात.
...आणि त्यातच पाकला जसं आपलं हित दिसतं, तसंच ते भारतातील सगळ्या पक्षांनाही दिसतं. त्यातूनच गेली ६७ वर्षे चालू असलेल्या नाटकाच्या पुढील प्रवेशाची आखणी सारे जण करायला लागतात.