पंढरीची वारी सुखेनैव होऊद्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:42 PM2018-07-18T23:42:09+5:302018-07-18T23:42:31+5:30
पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सुखसोहळाच आहे.
- बाळासाहेब बोचरे
पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सुखसोहळाच आहे. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाने सर्व चिंता हरल्याचा आनंद वारकऱ्यांना मिळतो. एवढ्या आनंदासाठी तो अनेक सुखदु:खांचे डोंगर पार करत मैलोन्मैलाची पायपीट करत पंढरीला येत असतो. त्यात कुणीच विघ्न आणू नये.
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा।
वारी चुको न दे हरी।
अशी याचना आपल्या विठुरायाच्या चरणी करणाºया वारकºयांना वारी म्हटले की, दुसरे काहीच सुचत नाही. ‘पंढरीसी जारे आल्यानो संसारा’ असं संतांनी सांगितलं आहे. म्हणून पंढरीचा वारकरी हा आषाढी वारी चुकवत नाही. वाटेत येणाºया संकटांची वा ऊन, वारा, पाऊस याची तो तमा बाळगत नाही. किंबहुना संकटांची व गैरसोर्इंची कुणाकडे कुरकुरही करत नाही. सावळ्या विठुरायाची भेट घेऊन त्याला कधी एकदा आलिंगन देतो, अशी अतुरता त्याच्या मनी असते. एकदा का दर्शन झाले की, त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. वारी ही केवळ वारकºयांपुरती मर्यादित न राहता इतरही जण वारकºयांची सेवा करून त्यांच्या आनंदात सहभागी होतात. मुखाने हरिनाम घेत निघालेल्या वारकºयांच्या मुखात दोन घास घालून त्यांचा दुवा मिळवण्यातही अनेकांना आनंद मिळतो. अगदी सरकारी कर्मचारी, एस.टी. कर्मचारी, पोलीस, असे कितीतरी सरकारी सेवेधाºयांनाही वारकºयांच्या सेवेत अपार आनंद मिळतो. वारीमध्ये विविध राजकीय पक्षांचे आमदार, खासदार, मंत्रीही चालत असतात. पण ते प्रचारासाठी नव्हे तर वारीचा निखळ आनंद घेण्यासाठी आलेले असतात. वारी हे राजकारणाचे व्यासपीठ नसून प्रपंच किंवा रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून बाजूला होऊन वेगळे अन् साधे जीवन जगण्याचे व्रत आहे. या व्रतामध्ये प्रपंचाचा विसर पडतो.
काही मंडळींना वारीमध्ये काही संधी दिसतात. वारी आली की वारीत मुख्यमंत्र्यांना रोखणार, महापूजा होऊ देणार नाही, अशा वल्गना केल्या जातात. त्यातले काही जण असे असतात की, त्यांचा अन् पांडुरंगाचा कधी संबंधही आलेला असतो की नाही, हे त्यांनाच माहीत. पण वारी नावाची संधी साधण्याचा मोका अचूक साधतात. यंदाही काही संघटना व राजकीय पक्षांनी निवेदने देऊन मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा दिला आहे. श्री विठ्ठलाची पूजा रोखणे म्हणजे सुमारे १० लाख भाविकांच्या आनंदात विघ्न आणण्यासारखे आहे. ज्या समस्या आणि मागण्या असतात, त्यांच्याशी वारकºयांचा संबंध असतोच पण त्याची कुरकुर करण्यासाठी तो पंढरपूरला आलेला नसतो. त्या तो वारीनंतर सोडवून घेतो. वारीच्या आनंद सोहळ्यात जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे म्हणजे पांडुरंगाच्या पूजेत अन् वारकºयांच्या आनंदात व्यत्यय आणल्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांना नाही तर देवाला वेठीस धरल्यासारखे आहे.
राहुनी पंढरीये जाण। जो नेघे विठ्ठल दर्शन।।
महापातकी चांडाळ। त्यांचा न व्हावा विटाळ।।
वरील अभंगातून संतांनी अशा थोतांडांना चांगलेच झोडपले आहे. पंढरीत राहूनही पांडुरंगाचे दर्शन न घेणारे आहेत. अशांना विठ्ठलाबद्दल श्रद्धा ती कशी असणार?
देवाला वेठीस धरण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरलाच येऊ नये, अशी मागणी केलेली बरी किंवा आंदोलनाचे स्वरूप तरी पंढरपूरला साजेसे हवे. पंढरीच्या तृण आणि पाषाणाला देव मानणारा वारकरी एकदा आषाढी वारीला निघाला की, कितीही संकटे आली तरी माघारी फिरत नसतो. नामदेव पायरीवर मस्तक ठेवायला मिळाले तरी त्याला मोठे आत्मिक समाधान मिळते. अशा वारकºयांना कसलाही व्यत्यय येऊ न देता त्यांची वारी सुखेनैव व्हावी, यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.