Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवायचे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 03:54 AM2020-10-29T03:54:30+5:302020-10-29T03:55:21+5:30

Pankaja Munde News : एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर भाजपच्या माळी, धनगर, वंजारी (माधवं) या राजकीय सूत्रांचे नेतृत्व पंकजांकडे येणे क्रमप्राप्त आहे आणि मतांची ही उतरंड रचण्यात गोपीनाथ मुंडेंचे योगदान विसरता येणे शक्य नाही. तरीही भाजपने हा जाणूनबूजून केलेला प्रयत्न पंकजांची राजकीय कोंडी करण्यासाठी होता.

Pankaja Munde: Does want to end politics of Pankaja Munde ? | Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवायचे आहे का?

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवायचे आहे का?

Next

- सुधीर महाजन
(संपादक, औरंगाबाद आवृत्ती) 

पंकजा मुंडेंचं काय करायचं, असा प्रश्नच भाजपच्या धुरिणांना पडला काय, असा एकूण माहोल दिसतो. नसता साडेसहा लाख ऊसतोड, कामगार मुकादमांची संघटना ताब्यात असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला चूड लावण्याचा भाजपमधून प्रयत्न झाला नसता. गोपीनाथ मुंडेंनी जी संघटना बांधली आणि साखर कारखानदारीवर एक आपला दबावगट तयार करत बीडमध्ये भाजप तळागळात बळकट केला तिचे नेतृत्त्व नंतर पंकजांकडे येणे साहजिकच होते; पण राजकीय कोंडी करण्याच्या प्रयत्नात भाजपने यावेळी त्यांच्याविरोधात आपल्याच पक्षातील सुरेश धस यांना वापरले. कोरोना महामारीची संधी घेत पंकजा या बीडबाहेर आहेत हे हेरून भाजपने सुरेश धसांना अधिकृत पत्र देऊन महाराष्ट्रभर ऊसतोड कामगार आणि मुकादमांच्या बैठका घेण्याचे अधिकार दिले आणि धस यांनीसुद्धा राज्यात १०६ बैठका घेत वातावरण निर्मिती केली. ही संघटना पंकजा यांच्या हातातून गेली असा एक आभास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.

महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांच्या क्षेत्रात दरवर्षी बीड जिल्ह्यातून साडेसहा लाख ऊसतोड कामगार जातात. या कामगारांनी कोयता खाली टाकला तर एकाही कारखान्याचा बॉयलर पेटू शकत नाही आणि या सर्वांची संघटना गोपीनाथ मुंडेंनी बांधली होती. हे बहुसंख्य कामगार वंजारी समाजाचे असल्याने त्यांची निष्ठा गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे आणि ओघाने भाजपवर असल्याने एका अर्थाने भाजपची परंपरागत मतपेटी तयार झाली आहे. याच मतपेटीला फोडून समांतर नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. या संघटनेचा नेता कोण या मुद्द्यावरही भाजपमधील मते-मतांतरे उघड झाली. सुरेश धस यांना पद्धतशीरपणे पुढे आणण्यात आले. एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर भाजपच्या माळी, धनगर, वंजारी (माधवं) या राजकीय सूत्रांचे नेतृत्व पंकजांकडे येणे क्रमप्राप्त आहे आणि मतांची ही उतरंड रचण्यात गोपीनाथ मुंडेंचे योगदान विसरता येणे शक्य नाही. तरीही भाजपने हा जाणूनबूजून केलेला प्रयत्न पंकजांची राजकीय कोंडी करण्यासाठी होता. विधानसभेतील पराभवानंतर राज्याच्या राजकारणात त्यांना कसे प्रभावहीन करता येईल, याचे प्रयत्न झाले. भाजपच्या केंद्रीय संघटनेत वर्णी लावत त्यांना राज्याबाहेर पाठवण्याचा घाट घातला आणि ऊसतोड कामगार संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. 

काल साखर संघात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला. प्रारंभी सुरेश धस यांना बैठकीत बसण्यास परवानगी नाकारली आणि त्यांनी तेथेच आंदोलन केले. नंतर त्यांना बैठकीत बसू दिले; पण वाटाघाटी-निर्णयप्रक्रियेत त्यांची फार दखल घेतली गेली नाही. साखर संघ आणि पर्यायाने शरद पवारांची ही खेळी दुर्लक्षून चालणार नाही. या वाटाघाटींना मंत्री धनंजय मुंडेही हजर होते आणि बैठकीत पंकजा यांच्या शेजारीच बसलेले दिसले. या दोघांचे बैठकीत छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले ते सकारात्मक संदेश देणारे होते. सुरेश धस यांचा या संघटनेतील शिरकाव आता मुंडेंना आव्हान ठरणार आहे आणि बीडमध्ये त्यांच्याविरुद्ध हे प्यादे वापरले जाणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे परवाच्या दसरा मेळाव्यात पंकजांनीच माजी आ. भीमराव धोंडे यांना पहिल्या रांगेत बसविले. या दसरा मेळाव्यात आक्रमक भाषणातून बीडमध्ये राजकीय संघर्ष अटळ असल्याचा संदेश दिला. 

विधानसभेच्या निवडणुकीतील निकालाकडे पाहिले तर पंकजा मुंडे, भीमराव धोंडे आणि रमेश आडसकर या भाजपच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला होता. तीन महत्त्वाचे उमेदवार पराभूत होतात ही भाजपसाठी धक्का देणारी बाब होती; पण पंकजांसोबत पराभूत होणारे दोघेंही त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील खंदे समर्थक होते आणि ते पराभूत का झाले, त्यांच्याविरोधात कोणी काम केले हे त्यावेळी जाहीर झाले आहे आणि याच पद्धतीने निवडणुकीनंतर पंकजांचे खच्चीकरण करण्यात पक्षातूनच प्रयत्न झाले. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यात त्यांनी एकनाथ खडसेंना निमंत्रित केले होते तेव्हाच श्रेष्ठींविरुद्धची त्यांची भूमिका स्पष्ट झाली होती. 

कालच्या साखर संघाच्या बैठकीत मजुरी,  ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ या मागण्या मान्य करून घेत एका अर्थाने भाजप श्रेष्ठींच्या राजकारणाला शह दिला. आता बीडमध्ये शह-काटशहाच्या राजकारणातील  रंगत पहायला मिळेल. पंकजांचा ‘खडसे’ करण्यात भाजप यशस्वी होतो की पंकजा डाव उलटवतात हे काळच ठरवेल.

Web Title: Pankaja Munde: Does want to end politics of Pankaja Munde ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.