पंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन
By सुधीर महाजन | Published: October 19, 2018 06:04 PM2018-10-19T18:04:42+5:302018-10-19T18:06:21+5:30
येणारा काळ हा निवडणुकांचा आहे. त्या पार्श्वभूमीवर हे सीमोल्लंघन बीड आणि महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याचे संकेत मिळतात.
- सुधीर महाजन
किंगमेकर ‘किंग’ होऊ शकतो, तसेच राजकारणाची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवून आपल्या प्याद्यांमार्फत सत्ता गाजवणारेही ‘किंगमेकर’ असतात. महाराष्ट्राच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना राजकीय प्रवासात नेमकी कोणती राजकीय भूमिका बजावायची आहे हे अजून स्पष्ट नाही. तरी आपण वडिलांप्रमाणे किंगमेकर आहोत, असे त्यांनी काल सावरगाव घाटच्या दसरा मेळाव्यात जाहीर केले. गोपीनाथ मुंडे किंगमेकर होते; पण त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही आणि जेव्हा ते होण्याची खात्री होती, नेमके त्यावेळी त्यांच्या हाती लोकसभेची उमेदवारी ठेवली गेली, याचा विसर अजून पडला नाही; पण आपण किंगमेकर आहोत, असे ज्यावेळी पंकजा सांगतात, त्यात अनेक पदर असतात.
भगवानगड आणि बीडचे राजकारण याचा अतूट संबंध. येथील मेळाव्यावरून गेल्यावर्षी राजकीय संघर्ष उडाल्याने यावर्षी भगवानबाबांच्या जन्मस्थळी सावरगावला पंकजांनी दसरा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. राजकीय विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधकांना आपल्यामागे असलेला जनाधार दाखवून देतानाच आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत, हेही सूचित केले. या मेळाव्याला किती गर्दी होते याची उत्सुकता होतीच. त्यापेक्षा जास्त गर्दी दिसली. हा संपूर्ण मेळावा पंकजा यांच्या भोवती केंद्रित झालेला असल्याने तेथे भाजप-सेना सरकारची कामगिरी, कारभार याचा कुठेही उल्लेख नव्हता. तो सरकारपेक्षा वैयक्तिकच होता. चोवीस तासांत ऊसतोड कामगार मंडळ स्थापन होणार. मी किंगमेकर आहे, अशा घोषणा त्यांनी करीत विरोधकांना इतर मागासवर्गीयांची ताकद दाखवायची आहे, असे सांगत त्या ‘स्व’ची भूमिका पार पाडताना दिसल्या.
राज्याचे व बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला, तर यातून सर्वच विरोधकांना जो संदेश द्यायचा त्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके, विनायक मेटे हे त्यांचे जिल्ह्यातील विरोधक त्यांना शक्तिपरीक्षण दाखवून देत ऊसतोड कामगार आणि वंजारी समाजाचे नेते आपणच आहोत हे त्यांनी दाखवून दिले. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे सहकारी राजेंद्र मस्केंची व्यासपीठावरील उपस्थिती बरेच काही सांगून गेली. मस्केंच्या पत्नी जयश्री या बीड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत. आ. सुरेश धस यांची हजेरीही अनेकांच्या भुवया उंचवणारी होती. ते पहिल्यांदाच या मेळाव्याला हजर होते. मच्छिंद्रनाथ गड येथे त्यांचा सालाबादाप्रमाणे मेळावा आटोपून त्यांनी सावरगावच्या मेळाव्याला हजेरी लावली. धनंजय मुंडेंवर टीकेची संधी त्यांनी सोडली नाही. आक्रमक शैलीत त्यांचा समाचार घेतला. विरोधी पक्षात असताना आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरत होतो, तर तोडीपाणीचे राजकारण करीत नाही, असा टोला हाणला.
पक्षातील विरोधकांनाही आपली शक्ती दाखवीत जनाधाराची जाणीव करून देत संदेश दिला. फुले- शाहू- आंबेडकरांचे नाव घेऊन गेल्या साठ वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण चालू असले तरी या पुरोगामी राज्याला महिला मुख्यमंत्री अजून मिळालेला नाही. या मेळाव्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय चाचपणी. आगामी निवडणूक परळीऐवजी पाथर्डी मतदारसंघातून लढण्याची चाचपणी सध्या चालू आहे. त्यादृष्टीनेही या मेळाव्याचे महत्त्व होते. राजकारणात हे बहीण-भाऊ विरोधक असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात ते आमने-सामने येणार नाहीत आणि तेवढा राजकीय सुसंस्कृतपणा त्यांच्यात आहे. अशी दुरापास्त परिस्थिती निर्माण झालीच, तर ती महाराष्ट्रातील खरी प्रतिष्ठेची लढत असेल. म्हणूनच पाथर्डीचा अंदाज घेतला जातो आहे.
खासदारांच्या कामगिरीचे सर्वेक्षण झाले. त्यात खा. प्रीतम मुंडे यांच्या कामगिरीची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यालाही या गर्दीने उत्तर दिले. दसरा मेळावा असला तरी तो आपट्याचे पान देऊन एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी करणारा नव्हता. याला सीमोल्लंघनाची नांदी म्हणायची का? कारण येणारा काळ हा निवडणुकांचा आहे. त्या पार्श्वभूमीवर हे सीमोल्लंघन बीड आणि महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याचे संकेत मिळतात.