पापलू, फ्लिश, अंदर-बहार, पासा आणि टीन पट्टी! काय आहे हा जुगाड?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:44 PM2022-12-03T12:44:00+5:302022-12-03T13:04:04+5:30

द्यूत होते. त्यानंतर मटका, लॉटरीच्या मागोमाग आता डिजिटल जुगार भारतात लोकप्रिय झाला आहे. ऑनलाइन सट्टेबाजीच्या जगाची ही सफर!

Papalu, Flesh, Under Bahar, Dice and Teen Patti! digital gambling trend | पापलू, फ्लिश, अंदर-बहार, पासा आणि टीन पट्टी! काय आहे हा जुगाड?

पापलू, फ्लिश, अंदर-बहार, पासा आणि टीन पट्टी! काय आहे हा जुगाड?

googlenewsNext

दिपक शिकारपूर

द्युत हे खेळाचे  व्यसन पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. ब्रिटिशांनी अत्याधुनिक लॉटरी आणि इतर जुगाराचे प्रकार भारतात आणले. सुरुवातीला, घोडा आणि कुत्र्यांच्या शर्यती, नंतर कोंबडा आणि हत्तींच्या शर्यतीसारखे प्राण्यांचे खेळ अशाप्रकारे भारतात जुगार खेळला जात असे. याचा आधुनिक अवतार म्हणजे विसाव्या शतकातला मटका, लॉटरीचे तिकीट. एकविसाव्या शतकात यात सुधारणा होऊन डिजिटल जुगार अस्तित्वात आला. नैतिकतेचा विचार केला तर हा प्रकार निषिद्ध पण यातून बक्कळ कर मिळत असल्याने जगात अनेक प्रदेश जुगाराला वैध मानतात. काही ठिकाणी गॅम्बलिंग टूरीझमची सर्रास जाहिरातबाजीही होते. अमेरिकेत लास वेगास, अटलांटिक सिटी ही शहरे गॅम्बलिंगसाठी म्हणून प्रसिद्ध आहेत. हीच गोष्ट ऑनलाइन जुगाराची (ज्याला बेटिंग, लॉटरी, कॅसिनो अशी विविध नावे आहेत). 

भारतातील ऑनलाइन सट्टेबाजी ही इंटरनेटवरील खेळाच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पोर्ट्स बुक इव्हेंटच्या निकालावर सट्टा लावण्याची क्रिया आहे. २०२१ या वर्षअखेर जागतिक ऑनलाइन जुगार बाजाराचे मूल्य  ५७.५४ बिलियन अमेरिकेन डॉलर्स होते. त्यात २०२२ ते २०३० पर्यंत ११.७% च्या चक्रवाढ वार्षिक दराने विस्तार होण्याची अपेक्षा आहे.  मोबाइल फोन आणि इंटरनेटचा वाढता वापर, सांस्कृतिक आणि कायदेशीर मान्यता, ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी सुलभ प्रवेश, सेलिब्रिटी समर्थन आणि कॉर्पोरेट प्रायोजकत्व यासारख्या बाबी या बाजाराच्या वाढीला चालना देत आहेत. 

एका सर्वेक्षणानुसार, ८०% भारतीय लोक वर्षातून किमान  एकदा जुगार (कुठला तरी)  खेळतात. स्पोर्ट्स बेटिंग, कॅसिनो गेम्स, लॉटरी किंवा कोणताही स्थानिक जुगार! हॉर्स रेस बेटिंगनंतर क्रिकेट आणि हॉकीसारख्या खेळांवर सट्टा लावला जातो. पोकर आणि स्लॉट गेम देखील लोकप्रिय होत आहेत. जुगार खेळणाऱ्याचे  सरासरी वय २० ते ४५ वर्षे  असते.  भारतीय खेळाडूंना ब्लॅकजॅक, बॅकरेट, स्लॉट्स, क्रेप्स, व्हिडीओ पोकर आणि रुलेसारखे पारंपरिक खेळ आवडतात, परंतु आता  पापलू, फ्लिश, अंडर बहार, पासा आणि टीन पट्टीसारखे स्थानिक खेळ देखील लोकप्रिय होत आहेत. ऑनलाइन कॅसिनो ही पारंपरिक कॅसिनोच्या पुढची आवृत्ती! या कॅसिनोमध्ये स्लॉट मशीन, केनो, पोकर, बिंगो आणि रुलेटसारख्या खेळांचा समावेश आहे. ऑफलाइन कॅसिनोच्या तुलनेत ते उच्च परतावा प्रदान करतात. ऑनलाइन कॅसिनोमध्ये कॅशबॅक किंवा विमा बोनस, रेफरल बोनस, वेलकम बोनस, भरपाई पॉइंट्स, नो डिपॉझिट बोनस असे फायदे दिले जातात. 

ऑनलाइन कॅसिनो किंवा जुगारात आता क्रिप्टो करन्सीचा हळूहळू अंतर्भाव होत आहे. अजून एक प्रवाह आहे तो व्हर्चुअल रिॲलिटी व ऑगमेंटेड रिॲलिटी  गॉगल्सचा. यामुळे वापरकर्त्याला आपण वास्तवाच्या अधिकाधिक जवळ आहोत, असे आभास निर्माण करता येतात. नवीन प्रवाह लोकप्रिय होत आहे तो मायक्रो बेटिंगचा. हे थोडेसे क्रिकेटच्या स्पॉट फिक्सिंगसारखे आहे. म्हणजे पूर्ण खेळाच्या निकालावर पैज लावायच्या ऐवजी एखाद्या लघु घटकावर पैज लावायची. पूर्वी अशा पैजा फक्त फोनवर लावता येत असत, आता बेटिंग ॲप्ससुद्धा उपलब्ध आहेत. पत्त्यांवर जुगार खेळताना हाडामासाचा पत्ते वाटणारा इसम लोकांना प्रिय वाटतो. जुगाराच्या आभासी जगातही इतर खेळाडू, डीलर (पत्ते वाटणारा माणूस) समोर ‘दिसतात’! या जगात फेसबुकचा नवीन अवतार मेटावर्ससुद्धा हळूहळू लोकप्रिय होत आहे.
ऑनलाइन जुगारामुळे कर्जबाजारी होऊन कुटुंब उद्ध्वस्त होतात. कर्जाच्या फेऱ्यात फसलेल्या तरुणांना शेवटी आत्महत्येकडे वळावे लागले. नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक होते. त्यातच आता विविध नामांकित कंपन्यांनी टीव्हीवर जाहिराती सुरू केल्या असून, गेम्सच्या आड थेट जुगार खेळवला जातो.. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ नुसार अटक आरोपींना पोलिस कोठडीही मिळत नाही. तीन महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. जुगाराची पद्धत बदलली; आता जुगार खेळविणाऱ्या आरोपीकडून खुबीने तंत्रज्ञानाचा वापर केला जातो... हे जगही बदलते आहे ते असे!!

(लेखक उद्योजक, संगणक साक्षरता प्रसारक आहेत)

deepak@deepakshikarpur.com

Web Title: Papalu, Flesh, Under Bahar, Dice and Teen Patti! digital gambling trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.