पेपरफुटीची डोकेदुखी
By Admin | Published: March 6, 2017 11:51 PM2017-03-06T23:51:30+5:302017-03-06T23:51:30+5:30
बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या की समजावे परीक्षेचा मोसम सुरू झाला.
बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या की समजावे परीक्षेचा मोसम सुरू झाला. पुढे दहावी, पदवी, पदव्युत्तर अशा अंगाने तो मेपर्यंत चालतो. जसे जसे ऊन वाढते तसा तो भरात येतो. उष्णतेमुळे आधीच गलितगात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा मेंदू परीक्षांमुळे शिणतो. कारण त्यांच्यासाठी ही ‘करो या मरो’ची लढाई असते. परीक्षेच्या मोसमात ही बातमी दरवर्षीसारखीच. यावर्षी पेपरफुटीची बातमी रोजच दिसेल. पहिल्या दिवसापासून हे पेव फुटल्यागत रोज पेपर फुटतो आहे. इंग्रजी, राज्यशास्त्र, सचिवांची कार्यपद्धती आणि गणित असे पेपर ओळीने फुटले. पूर्वी हे फुटाफुटीचे प्रकरण ते केंद्र किंवा त्या गावापर्यंत मर्यादित होते; पण सोशल मीडियाने आता या पेपरफुटीची बोंब जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याची सोय झाली. या फुटाफुटीमुळे उदगीर शहरात चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आणि परीक्षा केंद्रप्रमुखाला निलंबित केल्याची एकमेव कारवाई झाली; पण पेपर तर रोज फुटताना दिसतात. भ्रष्ट यंत्रणा जेव्हा तंत्रज्ञानाचा वापर करते त्यावेळी त्याचा दुरूपयोग होणारच. येथे तर सारे शिक्षण क्षेत्र भ्रष्ट झाले असताना पेपरफुटी ही तर किरकोळ घटनाच समजली पाहिजे. सर्वांसाठी शिक्षण या उद्देशाला हरताळ फासत राज्यभरात जेव्हा शिक्षणसम्राट निर्माण झाले. ज्ञानापेक्षा मार्केटिंगचा भाव वधारला आणि शिक्षण फाईव्ह स्टार बनले. तेव्हाच शिक्षण क्षेत्रातील मूल्यांची घसरण सुरू झाली. शिक्षणाचा व्यापार बनला आणि नफा तोट्याची समीकरणे आली. व्यापारात नफा कमावताना मूल्यांना सोयीस्करपणे मुरड घातली जाते. येथे तर ती गुंडाळून ठेवण्यात आली. अडचणीचे नियम सम्राटांनी सरकारला बदलवायला लावले. नफा-तोटा आला मग शाळांचा निकाल चांगला लागला पाहिजे हे ओघाने आले. विद्यार्थी आकर्षित करण्याचा तो फंडा ठरला. त्यातून राज्यांत अनेक ‘शैक्षणिक पंढरीं’चा उदय झाला. हमखास पास होणारी केंद्रे लोकप्रिय झाली. सरकार कॉपीमुक्त महाराष्ट्राची मोहीम दरवर्षी राबवते तिची अवस्था टँकरमुक्त राज्य या घोषणेसारखीच आहे. पेपर फुटतात, परीक्षेत गैरव्यवहार हे दरवर्षी होणारे प्रकार आहेत. परीक्षा संपल्यानंतर सारेच ते विसरतात. गेल्यावर्षी काय घडले याचे कारण कोणाला रहात नाही. कारण दरवर्षी होणाऱ्या या पेपरफुटीची किती दिवस डोकेफोड करून घ्यावी असाच प्रश्न शिक्षण खात्याला पडत असेल.