दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:14 AM2017-10-27T00:14:29+5:302017-10-27T00:14:42+5:30

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी बुधवारी भारताच्या भूमीवरून पाकिस्तानला अत्यंत कडक भाषेत संदेश दिला. दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही

The paradise for terrorists will not be tolerated at all | दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही

दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही

Next


अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी बुधवारी भारताच्या भूमीवरून पाकिस्तानला अत्यंत कडक भाषेत संदेश दिला. दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही, अशी तंबीच त्यांनी पाकिस्तानला दिली. भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्र तंत्रज्ञान देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे भारतातील राष्ट्रवाद्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, टिलरसन यांच्या वक्तव्यानंतर भारत व अमेरिकेदरम्यानचे संबंध प्रगाढ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काही दिवसांपासून विविध मुद्यांवर बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत असल्याने, मोदी सरकारद्वारा टिलरसन यांच्या वक्तव्याचे जोशपूर्ण स्वागत केले जाणे समजण्यासारखे आहे; मात्र अमेरिकेचा पूर्वेतिहास बघू जाता, फार जास्त हुरळून गेल्याने फटफजितीची पाळी येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देऊन पदारुढ झाले असले तरी, परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अमेरिकेचे धोरण सुरुवातीपासून ‘अमेरिका फर्स्ट’ हेच राहिले आहे. स्वहित साधण्यासाठी जगाला वारंवार महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेणे, वेळप्रसंगी अडचणीचे ठरणारे देश बेचिराख करून टाकणे, हे त्या देशाचे सर्वपरिचित उद्योग आहेत. त्यामुळे अमेरिकेला सध्या भारताविषयी जो प्रेमाचा उमाळा आला आहे, त्याकडे सावधगिरीने बघणेच योग्य ठरेल. भारत ही सर्वात मोठी आणि अमेरिका ही सर्वात जुनी लोकशाही असल्यामुळे आमचे द्विपक्षीय संबंध नैसर्गिक असल्याचे, अमेरिका हल्ली जगाला वारंवार सांगत असते. प्रामुख्याने लष्करशहांच्या अधिपत्याखाली राहिलेल्या पाकिस्तानची आतापर्यंत पाठराखण करताना अमेरिकेला ही वस्तुस्थिती का आठवत नव्हती? त्याची साधी कारणमीमांसा ही आहे की, तेव्हा अमेरिकेला स्वहितासाठी पाकिस्तान जास्त महत्त्वाचा होता आणि बदललेल्या परिस्थितीत भारत जास्त सोईचा वाटत आहे. अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्याची झालेली घाई, चीनमुळे आंतरराष्ट्रीय पटलावर निर्माण झालेला नवा प्रतिस्पर्धी, उत्तर कोरियाच्या रुपाने उभे ठाकलेले नवे संकट, यामुळे आज अमेरिकेला पाकिस्तानपेक्षा भारत अधिक उपयुक्त वाटत आहे. त्यामुळेच पाकिस्तानसारख्या कधीकाळच्या जीवश्चकंठश्च मित्राला दूर करायला अमेरिकेला जराही वेळ लागला नाही. चीनचा उदय, त्या देशाची एकूणच आंतरराष्ट्रीय पटलावरील व विशेषत: हिंद महासागरातील वाढती महत्त्वाकांक्षा, त्यासाठी भारताच्या शेजारी देशांबरोबरचे संबंध वृध्दिंगत करून भारताला घेरण्याची तयारी आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पाकिस्तानसोबत दिवसेंदिवस प्रगाढ होत असलेली त्या देशाची मैत्री, ही सगळी परिस्थिती लक्षात घेता, भारतालाही अमेरिकेसोबतच्या मैत्रीची गरज आहेच; पण म्हणून ‘गरज सरो, वैद्य मरो’ या अमेरिकेच्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमेरिकेला भारतासोबत संबंध वृध्दिंगत करावेसे वाटत असल्याच्या वस्तुस्थितीने हरखून न जाता, भारतीय नेतृत्वाने अमेरिकेचा पूर्वेतिहास ध्यानी घेऊन, जबाबदारीपूर्वक पावले उचलायला हवीत. अमेरिकेसोबत संबंध वाढवताना नाते बरोबरीचे असेल तर कोणत्याही मुद्यावर एकट्या अमेरिकेचे हित साधले जाणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्या परिस्थिती बदलल्यावर अमेरिकेने पुन्हा भूमिका बदलली तर आपला पाकिस्तान होणार नाही, याची काळजी नेतृत्वाने घ्यायलाच हवी. सरकारे बदलत असतात, देश मात्र कायमस्वरुपी असतो हे लक्षात ठेवूनच कोणत्याही सरकारने धोरणविषयक निर्णय घ्यायला हवे.

Web Title: The paradise for terrorists will not be tolerated at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.