पालक बालक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 08:43 AM2018-04-12T08:43:20+5:302018-04-12T08:43:20+5:30

वेगवेगळे क्रीडा प्रकार, साहसी प्रकार, चित्रे काढणे, सुंदर हस्ताक्षर, व्यक्तिमत्व विकास अशा सगळ्या गोष्टी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकविण्यात येणार असल्याचा दावा केला जातो.

Parent child | पालक बालक

पालक बालक

Next

-मिलिंद कुलकर्णी

उन्हाळ्याची सुट्टी लागली की, दोन गोष्टी प्रामुख्याने होतात. एकतर कुठेतरी सहलीला जायचे नियोजन होते किंवा दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात पाल्याला पाठवायचे निश्चित केले जाते. वार्षिक परीक्षा संपण्यापूर्वीच शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्थांचे प्रशिक्षण शिबिरांचे नियोजन सुरु होते. जाहिराती, प्रचार पत्रके यामाध्यमातून शिबिरांची माहिती पालकांपर्यंत पोहोचविण्याची धडपड सुरु असते. तीन दिवसांपासून तर १५ दिवसांपर्यंत शिबिरांचा कालावधी असतो. त्यात काय शिकविले जाणार याची मोठी जंत्री असते. वेगवेगळे क्रीडा प्रकार, साहसी प्रकार, चित्रे काढणे, सुंदर हस्ताक्षर, व्यक्तिमत्व विकास अशा सगळ्या गोष्टी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकविण्यात येणार असल्याचा दावा केला जातो. तज्ज्ञ मार्गदर्शकांची नावे दिलेली असतात, नावापुढे काही पदव्या असतात. त्याचा बोध फारसा होत नाही. पण असतील अशा पदव्या, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शिबिराचे स्थळ हा देखील महत्त्वाचा विषय असतो. एखादे उद्यान, मैदान, शाळा, फार्म हाऊस अशा ठिकाणी ही शिबिरे घेतली जातात. परंतु एवढ्या मोजक्या कालावधीत एवढे प्रकाश मुले शिकतील का, असा प्रश्न पालकांना पडत नाही. पोहण्याचा तलाव, घोड्यावरील रपेट अशा ठिकाणी पुरेशी दक्षता बाळगली जाते काय? निवासी शिबिर असेल तर व्यवस्था किमान राहण्यालायक आहे काय, याची काळजी पालक म्हणून घेतली जात नाही. अर्थात याला अपवाद आहेत. काही प्रतिष्ठित संस्था सुनियोजित शिबिरे घेतात आणि त्यांचा अनेक वर्षांपासून नावलौकीक आहे. चर्चा शिबिरांच्या नावावर दुकान मांडणाऱ्यांविषयीची आहे. शिबीर संयोजक किंवा पालकांना असा प्रश्न विचारला तर त्यांचे म्हणणे असते, आम्ही प्रशिक्षित करु असे म्हणत नाही. या प्रकारांची त्याला तोंडओळख होईल. त्यापैकी कोणत्या क्षेत्रात त्याला गती, आवड आहे, हे आम्ही निरीक्षण करतो आणि पालकांना सूचना करतो. म्हणजे वर्षभर त्या विषयाचे त्याला शास्त्रोक्त प्रशिक्षण देता येईल आणि सराव करता येईल. पालकांच्या म्हणण्यानुसार, वर्षभर शाळा असल्याने तो अभ्यासात गुंतून पडतो, त्याला क्रीडा प्रकाराची आवड निर्माण व्हावी, व्यक्तिमत्व विकसित व्हावे, समूहजीवनाची सवय व्हावी हा आमचा उद्देश असतो. संयोजक आणि पालकांच्या म्हणण्यात काही अंशी तथ्य असले तरी या शिबिरांनी फारसे काही साध्य होते असे वाटत नाही. मुळात वेगवेगळे क्रीडा प्रकार एवढ्या कमी कालावधीत शिकविले जाणेच शक्य नाही. तोंडओळख केवळ शिबिरांमधूनच होते काय? वर्षभर पाल्यांना आम्ही मातीचा, मैदानाचा स्पर्श होऊ देणार नाही आणि शिबिरातून त्याने पारंगत व्हावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. काहीवेळा तर असे वाटते की, वर्षभर शाळेत गुंतलेल्या पाल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही शिबिरांमध्ये गुंतवून, आमच्या जबाबदारीतून तर मुक्त होत नाही ना? पालक म्हणून आम्ही मामाचे गाव, आमराई, गोट्या, भोवरा, विट्टीदांडू असे खेळ, चुलत, मामे, आतेभावंडांचे जमणारे गोकूळ असे स्मरणरंजन पाल्यांसमोर करायचे आणि स्वत: मात्र पाल्यांना या आनंदापासून वंचित ठेवायचे, हे कितपत योग्य आहे. खरेतर आज पालकांच्या समुपदेशानाची आवश्यकता आहे, हे या उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते.

Web Title: Parent child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.