Aryan Khan: पालकांनी सरंजामशाही प्रवृत्ती सोडायला हवी; आर्यन खानशी आपल्या मुलांचा काय संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:22 AM2021-10-06T05:22:41+5:302021-10-06T05:23:05+5:30
जगातील सर्व सुखे उपभोगल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न हल्ली फक्त सेलिब्रिटींच्या मुलांनाच पडतो असे नाही.
संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत
ख्यातनाम अमेरिकन उद्योगपती रॉकफेलर एकदा हॉटेलमध्ये गेले आणि त्यांनी वेटरला एक डॉलर टीप ठेवली. टीपची रक्कम पाहून वेटर अचंबित झाला. हॉटेलमधून बाहेर पडत असलेल्या रॉकफेलर यांना तो म्हणाला, आपले चिरंजीव जेव्हा हॉटेलमध्ये येतात तेव्हा पाच डॉलरच्याखाली कधीच टीप देत नाहीत. त्यावर रॉकफेलर हसले व वेटरला म्हणाले, ‘तू बरोबर बोलत आहेस. माझ्या मुलाचा बाप धनाढ्य आहे. माझा बाप धनाढ्य असता तर मीही घसघशीत टीप दिली असती!’
- आता ही सत्यकथा आहे की दंतकथा ते ठाऊक नाही. त्या वादात पडायचे कारण नाही. कथेतील संदेश महत्त्वाचा आहे. बडे (धनाढ्य) बाप के बेटे दौलत उधळू शकतात. छानछौकी, मौजमजा करू शकतात. जगातील सर्व सुखे उपभोगल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न त्यांच्या मनाला सतावू लागला तर नशापाणी करू शकतात. आर्यन खान या शाहरुख खान याच्या पुत्राला अमली पदार्थांच्या सेवनाकरिता अटक झाल्यानंतर श्रीमंत जगातील, अप्राप्य असे काहीच नसलेल्या मुलांना हे असे वर्तन करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याची दुर्बुद्धी का होते? या प्रश्नाचा पाठपुरावा करावा, असे वाटणे स्वाभाविक आहे.
आपल्या देशातील शिक्षण, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेवर समाजवादी विचारांचा पगडा असल्याने वंचितांच्या जगातील जगण्याची ओढाताण, त्यामुळे येणारे नैराश्य, अंगी गुण असूनही केवळ आर्थिक बेड्यांमुळे आलेले मागासलेपण, त्यातून युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता यावर सर्व बाजूने विचार केला जात असतो. मात्र श्रीमंतांच्या जीवनातील नैराश्य व त्यातून निर्माण होणारा संघर्ष यात डोकावून पाहण्याकडे आपला कल कमी आहे. कदाचित संस्कारांचा सर्व वारसा हा केवळ मध्यमवर्गीयांकडे आहे व श्रीमंती ही मुळातच संस्कारांपासून काहीशी दुरावलेली असते, इतक्या ढोबळ मांडणीची आपल्याला सवयच झालेली असणे, हे त्यामागचे कारण असावे.
वस्तुस्थिती मात्र याच्या उलट होत असल्याचे अनेक पुरावे हल्ली अधूनमधून दिसत असतात. मध्यमवर्गीय घरांमधील मुलांनाही गांजा, चरस वगैरे नशापाण्याचे फार काही वाटत नाही. सिगारेट, दारू वगैरे तर न पिणारे म्हणजे बुळेच! पंजाबसारख्या राज्यात मध्यमवर्गीय सधन कुटुंबातील अनेक मुले अमली पदार्थांच्या व्यसनाची शिकार आहेत. त्यांचे पालक काही कोणी बडे सेलिब्रिटी नसतात.
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी सांगतात, ‘जे कशापासूनही वंचित नाहीत अशा मुलांचे पालक भौतिक सुखाकडे कसे पाहतात हे महत्त्वाचे आहे. पालकच भौतिक सुखाकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहत असतील तर मुलेही त्याच दृष्टीने पाहणार. कारण जीवनदृष्टीची पहिली ओळख ही मुलांना पालकांकडून होते!’ ज्या पालकांनी अवघड परिस्थितीचा सामना करीत आयुष्यात भौतिक सुखे प्राप्त केली आहेत अशा कित्येक पालकांची अशी इच्छा असते की, आम्ही जे वंचित आयुष्य जगलो ते आमच्या मुलांच्या वाट्याला यायला नको. त्यामुळे मग मुलांनी काही मागण्यापूर्वी लागलीच ते त्यांना पुरवण्याकडे पालकांचा कल असतो. यामुळे भौतिक सुखे उपभोगणे हा आपला हक्क असून त्याचा आपण पुरेपूर उपभोग घेतला पाहिजे, अशी बालपणापासून मुलांची धारणा होते. अशा मानसिकतेत वाढलेल्या या मुलांकरिता सुखसोयी हा त्यांच्या स्वप्रतिमेचा भाग बनतात. मग ही स्वप्रतिमा जपण्याकरिता उपभोगाकडील कल वाढत जातो. अर्थात, या सगळ्यांचा दोष पालकांचा नाही. एकाच कुटुंबातील दोन मुले भिन्न असतात. त्यामुळे मुलांच्या अंगभूत व्यक्तिमत्त्वाचाही त्यात नक्कीच भाग असतो. षोडशवयीन मुलांसमोर त्यांच्या आयुष्यातील विकासात्मक उद्दिष्टे काय हे स्पष्ट असेल तरीही त्यांची उपभोगाबाबतची दृष्टी बदलते. ही उद्दिष्टे निश्चित करून देणारी या मुलांच्या आयुष्यातील व्यक्ती कोण, यावर बरेच अवलंबून आहे.
नामवंत उद्योगपती, अभिनेते, लेखक, गायक वगैरेंच्या मुलांना सतत तुलनेला सामोरे जावे लागते. त्यातून येणारे नैराश्य हेही काही वेळा व्यसनाधीनतेचे कारण असू शकते, असे डॉ. नाडकर्णी म्हणतात, नामवंतांच्या घरात मुलांची होणारी तुलना निश्चितच मुलांवर विपरीत परिणाम करते. तू तुझ्या व्यक्तिमत्त्वानुसार वाग हेच मुलांना सांगितले पाहिजे. अर्थात, हे केवळ सेलिब्रिटींपुरते मर्यादित नाही. कुठल्याही यशस्वी माणसाने आपल्यासारखेच मुलाने यशस्वी व्हावे ही सरंजामशाही प्रवृत्ती सोडायला हवी. गेल्या काही वर्षांत नवश्रीमंतांची संख्या वाढत आहे. श्रीमंती प्राप्त केल्यावर पैशाकडे पाहण्याचा पहिल्या पिढीतील दृष्टिकोन सुस्पष्ट नसेल तर पुढच्या पिढ्या संपत्ती उपभोगतात पण दृष्टिकोन बदलत नाही. विलासी जीवनाकडे पाहण्याची कुटुंबाची मूल्ये तरुण पिढीच्या जडणघडणीत खूप मोलाची भर टाकतात.
मानसोपचारतज्ज्ञ युसूफ माचिसवाला सांगतात, ‘धनाढ्य घरातील तरुण पिढीत सुखात जीवन जगण्याची ओढ असते. काहींना क्रीडा प्रकार, भरपूर व्यायाम, ध्यानधारणा यामध्ये सुख दिसते तर एका मोठ्या वर्गाला पार्टीत सुख दिसते. मग पार्टी म्हटले की, अल्कोहोल, ड्रग्ज आले. ज्याप्रमाणे दररोज माफक मद्य घेणारा अल्कोहोलिक नसतो त्याप्रमाणे आठवड्यात एकदा किंवा दोनवेळा अथवा वरचेवर माफक अमली पदार्थ घेणारा ड्रग ॲडिक्ट नसतो. मात्र मर्यादेची ही रेषा धूसर आहे. त्यामुळे कालांतराने व्यसनाधीनतेचा धोका असतो. चरस, गांजा यामुळे मन शांत होते, अशी त्यांची धारणा असते तर टीनएजर कोकेन, एमडीचे सेवन करतात त्यामुळे शरीरात जोश येतो!’
- ऐन तारुण्यात या उसन्या जोशाचे आकर्षण वाटणे हे दुर्दैवी आहे खरे ! याबाबतीत बिल गेटस यांनी घेतलेली भूमिका मार्गदर्शक आहेत. ते म्हणतात, ‘माझ्या मुलांना गरिबीत दिवस काढायला लागावेत अशी माझी इच्छा नाही. पण आयत्या संपत्तीमुळे मुलांची उद्यमशीलता व आरंभशूरता नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे मृत्यूपूर्वी मी माझी ९० टक्के संपत्ती धर्मादाय कार्यासाठी वाटणार आहे!’