शिक्षणाची अर्धवट वाटचाल

By admin | Published: August 9, 2015 03:22 AM2015-08-09T03:22:56+5:302015-08-09T03:22:56+5:30

जगातील आर्थिक, सामाजिक, राजकीय क्रांती अपयशी ठरल्या, तेव्हा आता फक्त शिक्षण क्रांतीच जगाला वाचवू शकेल व तीच मानवतेला शेवटची आशा आहे, असं ओशो रजनीश यांनी म्हटलं होतं.

The partial approach towards education | शिक्षणाची अर्धवट वाटचाल

शिक्षणाची अर्धवट वाटचाल

Next

- हेरंब कुलकर्णी

जगातील आर्थिक, सामाजिक, राजकीय क्रांती अपयशी ठरल्या, तेव्हा आता फक्त शिक्षण क्रांतीच जगाला वाचवू शकेल व तीच मानवतेला शेवटची आशा आहे, असं ओशो रजनीश यांनी म्हटलं होतं. क्रांती दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्रांतीचे चिंतन म्हणूनच महत्त्वाचे आहे.

शिक्षणाच्या कार्य संस्कृतीत आज क्रांतीची गरज आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी उत्तरदायित्व नक्की करण्याची गरज आहे. आज काम मोजले जात नाही, त्यामुळे एक शैथिल्य आले आहे़ त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी सर्वच स्तरांवर नाराजी आहे. गुणवत्तेच्या विस्तारात तंत्रज्ञानाचीही क्रांती गरजेची आहे .विकसित तंत्रज्ञान अजूनही पुरेसे शिक्षणात वापरले जात नाही. आदिवासी भागातही सौरऊर्जा वापरून तंत्रज्ञान क्रांती शिक्षणात व्हायला हवी.

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर प्राथमिक स्तरावर गावापर्यंत शाळा, प्रशिक्षित शिक्षक, शिक्षक-विद्यार्थी प्रमाण, इमारती, शिक्षिकांचे समाधानकारक प्रमाण यात नक्कीच क्रांती यशस्वी झाली. माध्यमिक शिक्षणात अजून संसाधनांची प्रगती व्हायची आहे. प्राथमिक शाळांच्या तुलनेत माध्यमिक शाळांची संख्या अजून खूप वाढायला हवी. खरी क्रांती गुणवत्तेची व्हायला हवी आहे. शालान्त परीक्षेच्या निकालाच्या आकड्यांमध्ये क्रांतीचा आभास निर्माण करण्यात प्रशासन यशस्वी झाले, तरी ‘त्या पिकात दाणे नाही तर भुसा आहे’ हे सर्वांच्या लक्षात आले. आत्मविश्वास, कौशल्ये नसलेली पिढी आज पुढे सरकते आहे. दुर्दैवाने जागतिकीकरणात कौशल्ये असलेल्या नव्या पिढीला रोजगाराची संधी आहे. त्यातून ग्रामीण भागातील अर्थकारण बदलू शकते़ परंतु रोजगार संधी असूनही अपेक्षित कौशल्ये शिक्षणात मिळत नसल्याने एक प्रकारचे नैराश्यही ग्रामीण समाजात पसरते आहे.
साक्षरतेची क्रांती वेगाने होताना व पटनोंदणीत मागास समाजाचे प्रमाण वाढताना हीहे लक्षात घ्यावे लागेल, की महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील कोलाम, कोरकू, ठाकर, माडीयासारख्या जमातींमध्ये अजूनही शिक्षण पुरेसे झिरपलेले नाही. गडचिरोली, मेळघाट परिसरात मला ५२ गावे अशी सापडली होती, की ज्या गावांत ५० वर्षे शाळा असूनही ७वी पास तरुण आढळला नाही! तीच स्थिती भटक्या विमुक्तांची आहे. डोंबारी, मसणजोगी, गोपाळ यासारख्या अनेक जातींत अजूनही महिला साक्षरता अत्यल्प आहे. भटक्यांच्या शिक्षणाची माहिती सोडाच, पण त्यांची लोकसंख्यासुद्धा अजून माहीत नाही. विजय केळकर समितीने २००१ ते २०११ या काळात महाराष्ट्रात ७ लाख मुले १०वीपर्यंत गळती झाल्याचे वास्तव नोंदवले. या गळती झालेल्यांत शाळाबाह्य मुलांमध्ये आदिवासी, दलित, मुस्लीम, भटके यांचीच मुले असतात. आमच्या शैक्षणिक क्रांतीच्या वादळाची साधी झुळूकही या वंचितांपर्यंत गेली नाही. स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या शेवटच्या माणसाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे लागेल. उच्च शिक्षणाची क्रांती अजून अपूर्णच आहे. उच्च शिक्षणात १०० पैकी फक्त १९ जणच पोहोचतात. तेव्हा ज्याला आम्ही क्रीम म्हणतो ते क्रीम म्हणजे लोकशाही अजूनही निवडक जणांचीच मक्तेदारी आहे. हे उच्च शिक्षण शिक्षण सम्राटांच्या मक्तेदारीतून मुक्त करावे लागेल. यासाठी पारंपरिक विचारापलीकडचे पर्याय निवडावे लागतील. यात उद्योगधंद्यांना सामाजिक भावनेतून उच्च शिक्षणात उतरविणे, याचबरोबर शिक्षणावर खर्च वाढविणे हे महत्त्वाचे आहे. परंतु तो खर्च कसा होतो हेही बघावे लागेल. पगारापेक्षा जास्त खर्च विद्यार्थीच्या गुणवत्तावाढीसाठी लागणाऱ्या संशोधन आणि संसाधनांवर व्हायला हवा.
स्वातंत्र्य चळवळीत सर्वच नेत्यांनी शिक्षणावर चिंतन केले होते. स्वत: गांधीजींनी बुनियादी शिक्षणाचा आराखडा मांडून सुरुवातही केली; पण श्रमापासून-शेतीपासून आम्ही शिक्षण तोडले. त्या शाळा बंद केल्या आणि आज एक पांढरपेशा आत्मकेंद्रित मेकोलेला जसा माणूस पाहिजे तसा आम्ही तयार करीत क्रांती उलटी फिरवत आहोत.

(लेखक शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

Web Title: The partial approach towards education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.