लक्ष्मीची मनोभावे पूजा; पण अजूनही आशीर्वादाची प्रतीक्षा..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 09:09 AM2022-10-11T09:09:04+5:302022-10-11T09:10:01+5:30
देशात वेगवेगळ्या वेळी लक्ष्मीची पूजा केली जाते. पूर्व भागात नुकतीच ही पूजा झाली; पण देवी ‘प्रसन्न’ व्हावी यासाठी अजूनही ते आस लावून आहेत.
जवाहर सरकार, राज्यसभेचे खासदार तृणमूल काँग्रेस
त्रिपुरा, ओडिशा, आसाम आणि बंगाल या भारताच्या पूर्वेकडील भागात परवा लक्ष्मीची पूजा झाली. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात कोजागरी पौर्णिमेला हे लक्ष्मीपूजन होते. देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात लक्ष्मीची पूजा थोडी उशिरा अमावास्येला केली जाते. दिवाळीतला तो दिवस असतो. दक्षिणेत नवरात्रीच्या तीन रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. या एका भारत देशात वैविध्य आहे ते असे.
महिषासुरमर्दिनीसाठी उभारलेल्या ज्या मोठ्या मंडपात नुकतीच दुर्गापूजा, विजयादशमी साजरी झालेली असते, तेथेच लक्ष्मीचे पूजन होते. दिव्यांचा झगमगाट जल्लोष संपलेला असतो. त्यामुळे लक्ष्मी काहीशी एकटी, उदास, मोठ्या रंगमंचाच्या छोट्याशा भागात तिची छोटीशी मूर्ती बसलेली दिसते. पूर्व भागात लक्ष्मीची उपेक्षा होते काय? इकडे दारिद्र्यही आहे आणि आर्थिक वाढीची गती मंदच दिसते. मात्र पूर्वेकडचे लोक आणि बंगाली घरात तिची यथासांग पूजा मांडतात. स्त्रियांनी रेखाटलेल्या पावलांनी लक्ष्मीला घरात प्रवेश करण्याचा मार्ग दाखवला जातो. लक्ष्मी प्रत्येक घराला रात्री भेट देते आणि ज्या खोलीत पावलं काढलेली असतील तेथे प्रवेश करते. म्हणून घरभर पावले काढली जातात. अगदी जिन्यांवरही.
तांदळाच्या पिठीपासून केलेले रंग वापरून फुलाफुलांची चित्रे काढण्याच्या या कलेला अल्पना कला म्हणतात. बंगाली स्त्रियांच्या दृष्टीने ही प्रथा शुभ मानली जाते. त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना ती वावही देते. अलीकडच्या काळात ही अल्पना कला रस्त्यावर प्रकटू लागली आहे. गुरुदेव टागोरांनी स्थापन केलेल्या विश्वभारतीच्या प्रांगणातही सणाच्या दिवशी ती प्रकटत असते. अलीकडे रस्त्यांवर मोठ्या आणि कल्पक अल्पना रांगोळ्या काढण्याची पद्धत पडली आहे. आधुनिक रंग आणि ब्रशचा वापरही केला जातो. प्राय: अल्पनातील रंग पांढरे असतात, पण आता त्यात अन्य रंगही भरले जातात. बंगालमधली ही लक्ष्मी कमळावर आरूढ झालेली असून धनराशीचा कुंभ तिच्या मांडीवर आहे. देशाच्या इतर भागात उभी नसलेली दोन हत्ती स्नान घालत आहेत अशी लक्ष्मी दाखवली जाते तशी ही नाही. लक्ष्मी पूजेच्या दिवशी श्रीफळ ठेवलेला कलश किंवा घट घराच्या प्रवेशद्वारापाशी ठेवला जातो. लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरातील स्त्री-पुरुष सकाळी लवकर स्नान करतात.
पिकलेल्या भाताची साळ भरभराटीचे प्रतीक म्हणून पसरली जाते. पूर्वी लक्ष्मीचे स्तोत्र, लक्ष्मी पांचाली ऐकण्यासाठी परिवार घरातल्या आईजवळ येऊन बसत असे. आता हे चित्र फारसे दिसत नाही.
बहुतेक ठिकाणी खीर करून ती चंद्रप्रकाशात ठेवली जाते. नंतर दुसऱ्या दिवशी ती प्रसाद म्हणून वाटून खाल्ली जाते. खास शाकाहारी खिचडी आणि अगदी साध्या भाज्या तसेच पाम शुगरपासून केलेला तालेर बोरा, गूळखोबऱ्याचे छोटे लाडू, भातापासून केलेली मिठाई (स्वीट मोआ) या दिवशी केली जाते. लक्ष्मीला फळांबरोबर या भाताचा नैवेद्य दाखवतात. नंतर तो ग्रहण करतात. पूर्वेकडे लक्ष्मीची मनोभावे पूजा होते, पण या देवतेने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.