पाऊले चालती पंढरीची वाट - श्रद्धेचा सागर, भक्तीचा जागर...
By किरण अग्रवाल | Published: June 20, 2019 08:42 AM2019-06-20T08:42:09+5:302019-06-20T09:43:13+5:30
वारकरी सांप्रदायाचे आद्यप्रवर्तक, संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज हे श्री ज्ञानोबारायांचे ज्येष्ठ बंधू.
किरण अग्रवाल
या हृदयाची त्या हृदयाशी तार जुळली की, परस्पर भेटीची ओढ लागते. ती केवळ ओढ नसते, आस असते तृषार्त व सश्रद्ध मनाच्या भेटीची. त्यात नाद असतो भावभक्तीचा. ईश्वरप्राप्तीच्या अनामिक आसक्तीचा. अशात, श्रद्धेची वीणा झंकारली, ईश्वरनिष्ठेच्या मांदियाळीचा मृदंग वाजला आणि एकरूप भावाच्या टाळा-चिपळ्यांचा नाद जोडीस लाभला, की ब्रह्मानंदी टाळी लागणे टळूच शकत नाही. हा आनंद अवर्णनीय अनुभूती देणारा असतो. तो एक ठेका असतो. परमार्थिक लय साधणारा. मनाच्या डोहात डोकावणारा. एकदा त्यात डोकावले की षड्रिपू गळून पडतात आणि विकाराच्या जागी परमतत्त्व व ईश्वर स्वरूप आकार घेताना दिसून येतात. आनंदाचे रूपांतरण परमानंदात होते ते याच अवस्थेत. भौतिक व्यवस्थेची अपेक्षा व मर्यादा मग आपसूकच कोलमडून पडते. जगण्यातील व्यर्थतेच्या जाणिवा निरपेक्ष भक्तीच्या व यथार्थतेच्या मार्गाकडे ओढून नेतात, आणि पाऊले चालू लागतात.. मार्गस्थ होतात. हे मार्गक्रमण वा वाटचाल म्हणजेच तर वारी. ते केवळ चालणे नसते, तो एक जीवनानुभव असतो, अनामिक आस लाभलेला. हृदयंगमाने ओथंबलेला, भारलेला आणि ईश्वर दर्शनाकडे नेणारा. त्यासाठीची आस मनी व ध्यानी घेऊनच हजारो वारकरी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीसह विठू माउलीच्या भेटीस निघाले आहेत.
वारकरी सांप्रदायाचे आद्यप्रवर्तक, संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज हे श्री ज्ञानोबारायांचे ज्येष्ठ बंधू. सुमारे ३५०पेक्षा अधिक अभंगांची रचना करणाऱ्या श्री निवृत्तिनाथांनी वारकरी सांप्रदायाची प्रेरणा दिली व श्री ज्ञानोबा माउलींनी त्याचा पाया रचला. म्हणूनच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याचे आपले वेगळे महत्त्व आहे. पंढरीच्या विठोबा माउलीस भेटायला जाणा-या या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात. ‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे’, असा भाव घेऊन हे वारकरी चालत असतात. पंढरीच्या या वारीचा इतिहास पाहिला तर अगदी तेराव्या शतकात तिचा उल्लेख आढळतो. सर्वच संतांनी या प्रथेचे जतन केले असून, नवीन पिढीही यात हिरिरीने सहभाग घेताना दिसत आहे. आजही राज्यातील अनेक गावांमधून लहान-मोठ्या दिंड्या व हजारो वारकरी विठ्ठलभेटीच्या ओढीने वारी करतात, संत निवृत्तिनाथांच्या पालखीलाही शतकांची परंपरा लाभली आहे. श्रद्धेचा हा सागर असतो; जो भक्तीचा जागर घडवित विठुनामाचा गजर करीत पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. ज्ञानोबाराय म्हणतात, ‘‘पंढरपुरा नेईन गुढी, माझिया जिवेची आवडी।’’ माउलींच्या जिवाची म्हणजे मनाची आवड काय, तर सात्त्विकतेची गुढी. जी पंढरपुरी आहे. म्हणूनच भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत, वैराग्य व शांतीचा संदेश देत दिंडी निघाली आहे.
त्र्यंबकेश्वरी ज्या कुशावर्त कुंडात सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुसंतांचे पुण्यस्नान होते, गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्याच तीर्थावर संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुकांना स्नान घालून व त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर अभंग सेवा रुजू करून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. विशेष म्हणजे, वारकरी बांधवांनी संस्थानच्या पुढाकारातून लोकवर्गणी करीत सुमारे एक कोटी रुपयांचा चांदीचा रथ तयार करविला असून, त्यात संतश्रेष्ठ निघाले आहेत. यंदा या पालखी सोहळ्यातील दिंड्यांची संख्याही वाढली असून, अगदी ४० वर्षांपासून खंड पडू न देता वारी करणारे तसेच नव्याने यंदा सहभागी झालेले असे दोन ते तीन पिढ्यांचे अनेक प्रतिनिधी यात आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यात झोपण्याची वगैरे सोय नसली तरी चेह-यावर थकवा अथवा कसलाही त्राण जाणवू न देता आबालवृद्ध निघाले आहेत, पंढरीच्या दिशेने. त्यांच्यातील उत्साह, श्रद्धा कुठेही-कशानेही कमी होताना दिसत नाही. कसल्या अडचणीने डळमळताना दिसत नाही. २४ दिवसांमध्ये ४५० किलोमीटरचा प्रवास या वारीत घडणार असून,
‘धन्य धन्य निवृत्ती देवा। काय महिमा वर्णावा।।
शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन।।
असा महिमा गात, आनंदाने नाचत-गात, भावभक्तीने नामस्मरण करीत दिंडी निघाली आहे. जगण्यातले अध्यात्म काय असते, निरंकार, निरपेक्ष भाव कसा असतो; प्रत्येक पावलागणिकचा व टाळ-मृदंगाच्या तालाचा परमार्थिक, अलौकिक भाव कसा असतो आणि त्यातून कसले जीवनदर्शन घडून येते याचा प्रत्यय घेण्यासाठीच तर ‘वारी ही अनुभवावी’ लागते.
महत्त्वाचे म्हणजे, वारी ही एक चालण्याची वा प्रवासाची क्रिया नाही, तर जगण्याचे भान देणारी प्रक्रिया आहे. त्यात श्रद्धेचे संचित आहे, अध्यात्मही आहेच; पण अखिल विश्वातील यच्चयावत जिवांचे, प्राणिमात्रांचे कल्याण चिंतणाºया पसायदानाची सर्वस्पर्शी व्यापकताही त्यात आहे. ‘अवघे विश्वची माझे घर’ मानणारा व समजावून सांगणारा भावार्थ त्यामागे आहे. त्यामुळेच काळाशी सुसंगत असा विचार करीत केवळ मुखी हरिनाम घेऊन न थांबता यंदा पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी ‘हरित वारी’चा संकल्प केला आहे. ज्या मार्गावरून व ज्या ज्या गावातून हा पालखी सोहळा जाणार आहे, त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश वारकऱ्यांकडून दिला जाणार आहे. भविष्याची चिंता बाळगत व वर्तमानाचे भान ठेवत केली जात असलेली ही वारी म्हणूनच वेगळा जीवनानुभव घडविणारी तर आहेच, शिवाय मोक्ष पंढरीचा आत्माविठ्ठलही यातून प्रकटल्याखेरीज राहाणार नाही. त्यासाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पंडितराव कोल्हे, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, माजी अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, पालखी सोहळ्याचे प्रमुख पुंडलिकराव थेटे, ह.भ.प. त्र्यंबकराव गायकवाड, मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज गोसावी आदी धुरिणांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. तेव्हा त्यांच्या रंगात रंगून आपणही म्हणूया...
‘‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय!’’
श्री निवृत्तिनाथ महाराज की जय!!