‘डाटा’ क्रांतीतून समृद्धीची वाटचाल

By admin | Published: August 9, 2015 01:34 AM2015-08-09T01:34:27+5:302015-08-09T01:34:27+5:30

सध्याची आणि नव्याने मिळालेली माहिती जमवून त्यांची बांधणी करून ती जगासाठी उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही प्रक्रिया तशी खूप वेळ चालणारी आहे, मात्र जमलेला ‘डाटा’ भविष्याचा वेध

The path of prosperity through the 'Data' revolution | ‘डाटा’ क्रांतीतून समृद्धीची वाटचाल

‘डाटा’ क्रांतीतून समृद्धीची वाटचाल

Next

- पवन देशपांडे

सध्याची आणि नव्याने मिळालेली माहिती जमवून त्यांची बांधणी करून ती जगासाठी उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही प्रक्रिया तशी खूप वेळ चालणारी आहे, मात्र जमलेला ‘डाटा’ भविष्याचा वेध घेण्यास फायद्याचा ठरेल हे नक्की. त्या ‘डाटा रेव्हल्युशन’बद्दल...

आपल्या देशात एकूण किती गरीब आहेत? किती चिमुकले भुकबळीनं तडफडत मरताहेत? किती बालमजूर आहेत? किती बेरोजगार आहेत? या देशाचा महागाईचा दर किती?
जगातले सारे फेसबुक युजर्स दररोज काय शेअर करतात? टिष्ट्वटरवर किती जण कोणत्या विषयाबद्दल बोलत आहेत? आजचा टिष्ट्वटर ट्रेंड काय?
आपल्या आसपास किती जण स्मार्टफोन वापरतात? किती जण त्यावरील अ‍ॅपद्वारे खरेदी करतात किंवा अ‍ॅपद्वारे सेवांचा वापर करतात..?
कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत? किती लढाऊ विमाने आहेत? किती शस्त्रं आणि किती सैन्यबळ आहे..?
सारा आकड्यांचा खेळ.. आणि उत्तरही आकड्यांत.. मग ती संख्या एक असो, हजारो किंवा कोट्यवधी असो... पण असतो तो आकडाच.
कारण कोणतंही तत्थ्य मांडताना आकडेवारी सादर केली आणि जाते करावी लागतेही. निर्णय घेतानाही त्या-त्या विषयातील आकडेवारीचा आधार घेतला जातो; आणि याच आकड्यांच्या भरवशावर भविष्याचा वेध घेत योजना आखल्या जातात. देश-विदेशांशी असलेल्या संबंधांचं धोरण सरकारकडून ठरवलं जातं. कंपन्यांचं तर संपूर्ण भवितव्यच आकड्यांच्या जंजाळावर अवलंबून असतं. म्हणून आकडेवारीला फार महत्त्व आहे. अशाच आकड्यांची जमवाजमव करण्याची अर्थात ‘डाटा’ एकत्र करण्याच्या क्रांतीची सध्या जगात रुजुवात होऊ लागली आहे. गेल्यावर्षी संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष बान की मून यांनी काही सांख्यिकीतज्ज्ञांना सोबत घेऊन ‘डाटा रेव्हल्युशन’ मोहीम हाती घेतली. ही मोहीम होती जगाला समृद्ध बनविण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यास जगाला सक्षम बनविण्याची. जगात जी माहिती जमा केली जाते, ती साठवून, त्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून, तिची नीट मांडणी करून जगासमोर ठेवणे, अशी ही मोहीम आहे. गेल्या वर्षी जेव्हा या सर्व सांख्यिकीतज्ज्ञांची पहिली बैठक झाली त्यात असं म्हटलं गेलं की, ‘‘उत्तम माहिती आणि आकडेवारीच्या जोरावर सरकार देशाच्या विकासावर नजर ठेवू शकतं, उत्तम निर्णय घेऊ शकतं व आपली विश्वासार्हताही वाढवू शकतं. केवळ सरकारेच नाही, तर आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना, खासगी कंपन्या आणि सर्वसामान्यांनाही याचा मोठा उपयोग होऊ शकतो.’’ माहितीच्या महाजालावर एखादी गोष्ट ‘सर्च’ केल्यानंतर त्याबद्दल काही क्षणांत हजारो साइट्सवर उपलब्ध असलेली माहिती मिळते. पण केवळ या माहितीवर अवलंबून न राहता, जो ‘डाटा’ देशाच्या विकासासाठी पर्यायानं सर्वसामान्यांच्या जीवनासाठी फायद्याचा ठरेल असा डाटा जमवण्याच्या मोहिमेची बीजे रोवली गेली आहेत. ही ‘डाटा’क्रांती आपल्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाईल.

सोशल डाटा रेव्हल्युशन !
सोशल साइट्सवर निर्माण होणारी नवनवी माहितीही एक प्रकारचा सोशल ‘डाटाबेस’ आहे. जगाच्या पाठीवर कुठे, कोण, काय करतंय याचा ‘डाटाबेस’. फेसबुक असो वा टिष्ट्वटर... प्रत्येक पोस्ट, टिष्ट्वट, लाइक, कमेंट अथवा तुम्ही कोणासोबत केलेलं ‘चॅटिंग’ हे सारंच ‘डाटाबेस’मध्ये भर टाकत असतं. याचा आधार घेऊनच कंपन्या अनेकदा आपली उत्पादने आणि सेवांबद्दलची धोरणं आखतात. शिवाय सोशल वेबसाइट्सवर उठवल्या जाणाऱ्या आवाजानंतरही सरकारला भूमिका ठरवावी लागते, अशी अनेक उदाहरणं आहेत.

(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत. )

Web Title: The path of prosperity through the 'Data' revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.