पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करावे अन् पुढचा प्रवास प्रशस्त करावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:34 AM2019-05-29T05:34:26+5:302019-05-29T05:34:38+5:30

ज्या नेत्याने ४० वर्षे महाराष्ट्र ताब्यात ठेवला, सरकार कुणाचेही असले तरी त्यावर आपला प्रभाव राहील ही स्थिती सदैव अनुभवली आणि त्याचा शब्द सहसा कुणी खाली पडू दिला नाही.

Pawar should merge NCP in Congress and give further development | पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करावे अन् पुढचा प्रवास प्रशस्त करावा

पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करावे अन् पुढचा प्रवास प्रशस्त करावा

Next

ज्या नेत्याने ४० वर्षे महाराष्ट्र ताब्यात ठेवला, सरकार कुणाचेही असले तरी त्यावर आपला प्रभाव राहील ही स्थिती सदैव अनुभवली आणि त्याचा शब्द सहसा कुणी खाली पडू दिला नाही. त्या पवारांवर अशी पाळी यावी हे त्यांचे दुर्दैव. ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ हा शरद पवारांनी त्यांच्या अनुयायांना दिलेला संदेश उत्साहवर्धक असला तरी त्यात फारसा दम शिल्लक राहिलेला नाही. गेली अनेक वर्षे ते सारखा पराभव पाहात आहेत. त्यांच्या पक्षाचीही पिछेहाटच होत राहिली आहे. त्यांचे एकेकाळचे स्नेही विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे चिरंजीव रणजीत मोहिते पाटील त्यांच्यापासून दूर भाजपत गेले आहेत. ज्यांचे नेतृत्व केले, त्यांच्यावर भरवसा ठेवला आणि ज्यांना आपले मानले तेच लोक ‘तुमच्यामुळे आम्ही मागे राहिलो’ असे त्यांना ऐकवू लागले आहेत. ही स्थिती खरेतर ‘आता तुम्ही जा’ असे सांगणारी आहे. मात्र पवार चिवट आहेत आणि त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या अजून संपायच्या आहेत. वय साथ देत नाही आणि पूर्वीचे जिवलगही दूर गेले आहेत. परंतु ज्यांना वाचवायचे त्यांच्या मागे उभे राहणे त्यांना गरजेचे आहे. त्यामुळे पवारांना निवृत्ती नाही! तशी राजकारणातील कुणासही निवृत्ती नसते.


ते अडवाणी आणि जोशी ही राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी पक्षातील उदाहरणे. मुलायमसिंगांना बसून राहवत नाही, ताज्या दमाची नवी माणसे आली, पण त्यांच्याविषयी विश्वास या बड्यांना वाटत नाही. खरेतर ही स्थिती दयनीय म्हणावी अशी आहे. ज्या नेत्याने ४० वर्षे महाराष्ट्र ताब्यात ठेवला, सरकार कुणाचेही असले तरी त्यावर आपला प्रभाव राहील ही स्थिती सदैव अनुभवली आणि त्यांचा शब्द सहसा कुणी खाली पडू दिला नाही. त्या नेत्यावर आत्ताची अशी पाळी यावी हे त्यांचे व राज्याचेही दुर्दैव आहे. पवारांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत आणि त्या जिवंत व टवटवीत आहेत. त्यांच्यावर त्यांच्या वयाचा परिणाम नाही. पण राजकारण हा जनमताच्या पाठिंब्यावर चालणारा व्यवहार आहे आणि तो आता सुस्त आहे. जातीचे पाठिंबे गेले आहेत आणि जुन्या नावावर चालता यावे असेही फारसे शिल्लक राहिले नाहीत. त्यातून त्यांचा विश्वास आता कुणासही वाटेनासा झाला आहे. ते राहुल गांधींना भोजनाचे निमंत्रण देतात आणि मोदींनाही सल्ला देतात. त्यांच्या पक्षातील अनेकांना त्यांच्या या वागण्याचा अर्थ लागत नाही. ‘निदान आता तरी त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे व आमचा पुढचा प्रवास प्रशस्त करावा,’ असे त्यांचे अनेक सहकारी खासगीत सांगतात. तसे सांगणाºयात जुने मंत्रीही आहेत. पण पवारांचा आत्मविश्वासवा त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे त्यांना तसे करू देत नाही. घरातल्या अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. घरातली माणसे राजकारणातल्या खुर्च्यांवर बसवायची राहिली आहेत, एवढी वर्षे साथ दिलेले अनुयायी आहेत आणि त्यातले काही त्यांच्यातले व मोदींमधले दुवे आहेत. तसे दुवे त्यांनी राहुलसोबतचेही सांभाळले आहेत. त्यामुळे ते केव्हा कोणती भूमिका घेतील व त्यामागे त्यांचा हेतू कोणता असेल हे कुणासही अखेरच्या क्षणापर्यंत कळत नाही. महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर ते बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिका कोणत्या तेही समजत नाही. पण त्यांना लोकांसमोर राहायचे आहे. मध्यंतरी त्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करून त्याविषयी फडणवीसांना मार्गदर्शन केले. जणूकाही मराठवाड्यातील स्थिती त्यांना सांगणारे अधिकारी त्यांच्या सरकारात व कार्यकर्ते पक्षात नाहीतच.

मग पवार हे का करतात? स्वस्थ बसवत नाही म्हणून की आपण अजून कार्यक्षम आहोत हे जनतेला दिसावे म्हणून? देशात कडबोळ्यांचे राज्य येईल आणि त्यांचे पंतप्रधानपद आपल्याकडे येईल असे त्यांना अनेकदा वाटले. मोदींचे नवे सरकार पाच वर्षे राहील आणि त्यानंतर येणारे सरकारही कडबोळ्यांचे असणार नाही. निवडणूक जिंकायला राष्ट्रीय चेहरा व राष्ट्रीय मान्यताच यापुढे लागेल. त्यामुळे आपला पक्ष राष्ट्रीय पक्षात सामील करणे व पुन: एकवार राजीव गांधींना भेटावे तसे राहुल गांधींना भेटणे ही त्यांच्यासाठी सरळ व सोपी वाट आहे. ती त्यांच्या अनुयायांना हवी आहे. बहुधा ती घरच्यांनाही हवी असावी. अशावेळी अहंता उपयोगाची नाही, येथे वास्तवाची दखलच तेवढी महत्त्वाची आहे. पवार स्वत:खेरीज कुणाचे ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना हे सांगणेही रुचणारे नाही. पण त्यांच्याविषयीची सदिच्छा असणा-यांचे मत त्यांना कळावे, यासाठी हा प्रपंच!

Web Title: Pawar should merge NCP in Congress and give further development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.