पवारांचे प्रशस्तीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 12:30 AM2017-11-14T00:30:36+5:302017-11-14T00:34:23+5:30

शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे

 Pawar's certificate | पवारांचे प्रशस्तीपत्र

पवारांचे प्रशस्तीपत्र

Next

शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे अचंब्याचे तर काहीसे त्यांच्या उमदेपणाचे मानले पाहिजे. गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. पवारांचा पक्ष त्यात आपले उमेदवार उभे करीत आहे. तरीही त्यांनी राहुल गांधींच्या तेथील सभांना होत असलेल्या अलोट गर्दीविषयी, त्यातील त्यांच्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागलेल्या भाषणांविषयी आणि श्रोतृवर्गात उमटत असलेल्या त्याच्या प्रतिक्रियांविषयी ते कमालीच्या आस्थेने व कौतुकाने बोलले आहेत. पवारांचा पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीत आहे आणि ते सेक्युलर वृत्तीचे नेते आहेत, एवढेच त्या प्रशंसेचे कारण नाही. याआधी ते राहुल गांधींविषयी फारशा आस्थेने बोलताना कधी दिसलेही नाहीत. मात्र गेल्या सबंध वर्षात मोदींच्या सरकारने जनतेवर लादलेली नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी आणि नुसतीच उद्दाम व बेफाट भाषणे या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची सामान्य जनतेपर्यंत पोहचणारी उपरोधिक शैली फार परिणामकारक ठरू लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पवारांचे हे प्रशस्तीपत्र एका पार्श्वभूमीवर आणखीही महत्त्वाचे आहे. २०१४ च्या निवडणुकीतील मोदींच्या जोरकस भाषणांपुढे राहुल गांधी, त्यांचे वय व अनुभवाचे तोकडेपण यामुळे फारच उथळ वाटत. त्यांच्यावर तोंडसुख घेणारी भाजपची माणसे त्यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवीत. आता ती भाषा मागे पडली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि जेटली व अगदी मोदीसुद्धा त्यांना गंभीरपणे घेऊ लागले आहेत. काँग्रेसलाही त्यांचे नेतृत्व आता आशादायी व फलदायी वाटू लागले आहे. त्यातून मोदींना लोक ‘फेकू’ म्हणू लागल्यापासून तर राहुल गांधींचे व्यक्तिमत्त्व जास्तीचे दमदार ठरताना दिसले आहे. आर्थिक क्षेत्रात अपयश, विकासाची भाषा जोरकस पण वेग मंदावलेला, तरुणाईत निराशा, प्रत्येक राज्यात कुठे शेतकºयांचे, कुठे विद्यार्थ्यांचे, कुठे पाटीदारांचे तर कुठे गुज्जरांचे आंदोलन आणि त्यावर आश्वासनांचा नुसताच पाऊस. सामान्य माणसाला काय डाचते याची फारशी कदर कोणी करीत नाही, उलट त्याला देशभक्तीचा उपदेश ऐकविला जातो. या साºयांना राष्ट्रीय पातळीवर उत्तर देऊ शकेल असा राहुल गांधींखेरीज दुसरा नेताही विरोधकांकडे नाही. नितीशकुमार भाजपजवळ गेले आणि ममता बॅनर्जी बंगालबाहेर पडत नाहीत. प्रत्यक्ष पवारही एवढा काळ महाराष्ट्राचेच नेते राहिले. लालू, मुलायम, चंद्राबाबू, स्टॅलिन या साºयांनाच त्यांच्या प्रादेशिक मर्यादा आहेत. ही स्थिती राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींचे नेतृत्व उभे करणारी व त्यांना तरुणांचे प्रवक्ते बनविणारी ठरली तर त्याचे नवल करण्याचे कारण नाही. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणाने गुजरातमध्ये काँग्रेसला बहुमत देऊ केले. त्याच सर्वेक्षणाने हिमाचल प्रदेशातही भाजपचा पराभव होत असल्याचे दाखविले. ते सर्वेक्षण कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. मात्र गुजरातमध्ये भाजपला सारेच काही अनुकूल राहिले आहे असे नाही. तेथील व्यापाºयांनी सरकारविरुद्ध केलेले विराट आंदोलन अजून शमले नाही. अर्थात मोदी केंद्रात व राज्यातही सत्तेत आहेत आणि सत्तेला कोणतीही किमया अखेरच्या क्षणीही घडविता येणे अशक्य नसते. त्यामुळे त्यांच्या विजयाविषयीची आशाही अनेकजण बाळगून आहेत. एक गोष्ट मात्र येथे नव्याने पुढे आलेली. ती म्हणजे, राहुल गांधी यांचे राष्ट्रीय स्तरावर उभे होत असलेले नेतृत्व. त्याची भरधाव वाटचाल व भरारी आता कुठवर जाते ते यापुढे पहायचे.

Web Title:  Pawar's certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.