पवारांचे ‘नमोमीलन’!

By admin | Published: January 24, 2015 12:31 AM2015-01-24T00:31:57+5:302015-01-24T00:31:57+5:30

राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र आल्याने सर्द झालेले राजकारण उष्ण होऊ लागले आहे.

Pawar's 'NaMomilan'! | पवारांचे ‘नमोमीलन’!

पवारांचे ‘नमोमीलन’!

Next

राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राला धरून अनेक विषय घोंगावू लागले आहेत. किरण बेदी, अरविंद केजरीवाल या शिष्योत्तमांमुळे अण्णा हजारे, वादग्रस्त विधानांनी बिहार सरकार व जदयूला अडचणीत आणणारे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा जातीय समीकरणांची गोळाबेरीज करणारा महाराष्ट्र दौरा, राज्यपाल राम नाईक यांच्या सुधारणावादामुळे उत्तर प्रदेश दिनाच्या मुंबईतील कार्यक्रमातून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना मिळालेला डच्चू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांसोबतची सलगी, सर्द झालेल्या उत्तरेतील राजकारणाला उष्ण करू पाहत असल्याने मोदी-पवारांचे हे ‘मनोमीलन’ असेल की ‘नमो-मीलन’ हे वेळच सांगेल.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या वर्षी अरविंद केजरीवाल यांनी उडी घेतली. त्यांचे गुरू अण्णा हजारे त्यामुळे खट्टू झाले. आता किरण बेदी यांनी तोच कित्ता गिरवला. दोघेही अण्णांचे शिष्य व दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा! साहजिकच आशीर्वादासाठी भुकेल्या असलेल्या बेदी-केजरीवाल यांना अण्णाशीर्वादाची ‘सिद्धी’ मिळाली नाही! या दोघांपेक्षाही अधिक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या अण्णांनी या दोघांसाठी ‘मौना’चा एकच न्याय लावला आणि फोन घेतले नाहीत. ‘अण्णांची लाइन माझ्यासाठी व्यस्त आहे’ असा टोमणा बेदींनी हाणला, तर ‘ते माझ्यासाठी जनतेला संदेश देतील’ असे संकेत केजरीवाल यांनी दिले. याचाच एक अर्थ असा, माध्यमांचे ‘कारण’ समजलेले अण्णा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चर्चेत राहतील आणि नैतिकतेचा तराजू तोलून, न जाणो एका शिष्याला पाठिंबाही देतील!
दुसरीकडे, बेताल बोलण्याने पक्षात जड झालेले बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी पक्षांतर्गत विरोध मोडून काढण्यासाठी दलितांचा राष्ट्रीय नेता होण्याचा अजेंडा हाती घेतला आहे. मांझींनी बिहारातील अडीचशे दलित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बिहारपर्यंतच असलेला त्यांचा हा अट्टहास एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेल्या कल्पनेने विस्तारला व त्यांनी बिहारच्या रोजगाराचा थेट संबंध मुंबईशी असल्याने तिथे जाऊन दलित बिहारींची मोट बांधण्याचा इरादा पक्का करून महाराष्ट्रात मोर्चा वळविला. ते दोन दिवस राज्यात फिरले. पण फेरी फुकट गेली.
बिहारबाजूच्या उत्तर प्रदेशातही मुंबईतील ‘उत्तर प्रदेश दिवसावरून’ चांगलेच मानापमान नाट्य रंगू लागले. आजचा हा दिवस झोकात करण्याची मुंबईच्या ४० लाख उत्तरप्रदेशी बांधवांची इच्छा राज्यपाल राम नाईक यांनी उचलून धरल्याने मुख्यमंत्री अखिलेश यादव अकारण खफा झाले आहेत. २५ वर्षांपासून ‘अभियान’ ही मुंबईतील संस्था मुंबईत हा दिवस साजरा करते. यावेळी महाराष्ट्र, गुजरात व बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशानेही थाटामाटात हा दिन साजरा करताना, मुंबईकर उत्तरप्रदेशी बांधवांनी उत्तर प्रदेशातील एक गाव दत्तक घ्यावे, अशा काही सूचना नाईक यांनी केल्या. बहुधा त्या मुख्यमंत्र्यांना रुचल्या नाहीत! त्यांनी मुंबईत येणार नाही, असे जाहीर केल्याने भय्या लोकांचे डोके आता पार बिघडले! सुधारणावादी नाईक लोकप्रिय झाल्याचेही लक्षण आहे.
बारामतीकर शरद पवारांचे मोदीप्रेम वाढले आहे. स्वच्छता अभियान, मग फडणवीस सरकारला पाठिंबा आणि आता ‘पंतप्रधान आपल्या दारी..!’ हा त्यांचा उपक्रम म्हणजे सुखासुखी राजकारण करू नका,
हाच संदेश देतो. साखरेच्या मुद्द्यावरून दिल्लीला चर्चेला येण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार यांना भेटल्याने आधीच अंतरावर असलेले खासदार राजू शेट्टी महायुतीपासून आणखी दुरावले. निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना
व केंद्राचा ढब्बू पैसाही राज्याच्या
तिजोरीत आला नसताना, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढ्यात पंतप्रधान बारामतीला जाऊन शेती पाहणी करणार असल्याने हे ‘मनोमीलन’ असेल की ‘नमो-मीलन’ हे वेळच सांगेल.
- रघुनाथ पांडे

Web Title: Pawar's 'NaMomilan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.