९५ लाख डॉलर्स द्या, रोज पाहा १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 10:18 AM2022-10-29T10:18:37+5:302022-10-29T10:19:12+5:30

चंद्र, मंगळ तसंच इतर लघुग्रहांवर अतिशय सहजपणे प्रवास आणि वस्ती करणं माणसाच्या आवाक्यात येऊ शकेल.... त्याची स्वप्ने बघायला काहीच हरकत नाही!

Pay 95 million dollars, see 16 sunrises, 16 sunsets every day! | ९५ लाख डॉलर्स द्या, रोज पाहा १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त!

९५ लाख डॉलर्स द्या, रोज पाहा १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त!

Next

- अच्युत गोडबोले (ख्यातनाम लेखक) 
- आसावरी निफाडकर (सहलेखिका )

हौशी नागरिकांना अंतराळात फिरवून आणायचं किंवा चक्क काही दिवस तिथे वास्तव्य करायचं आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालायची यासाठी आता 'स्पेस टुरिझम' नावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरायला लागली आहे. नासाबरोबरच स्पेस एक्स व्हर्जिन गॅलॅक्टिक ब्लू ओरिजिन अशा अनेक प्रायव्हेट कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आहेत. काही कंपन्या लोकांना अंतराळात फिरवून आणतील काही परग्रहांवर (चंद्र, मंगळ..) उतरवतील आणि तिथे थोडा वेळ घालवून त्यांना पृथ्वीवर परत आणतील तर काही पृथ्वीच्या वातावरणापासून ५० मैल वरपर्यंत अंतराळात नेतील आणि खाली आणतीला रशियन स्पेस एजन्सीनं २००० साली ७ नागरिकांना घेऊन 'स्पेस टुरिझम'चा श्रीगणेशा केला होता. ३० एप्रिल २००१ रोजी डेनिस टिटो नावाचा करोडपती अंतराळात ८ दिवस राहून आला. तिकीट घेऊन अंतराळात जाणारा टिटो हा पहिला सामान्य (1) नागरिक 'ब्लू ओरिजिन', 'ओरिऑन स्पॅन', 'बोईंग' अशा अनेक कंपन्या आता 'स्पेस टुरिझम'मध्ये आपले पाय रोवू पाहताहेत. 'व्हर्जिन गॅलॅक्टिक कडे तर हौशी नागरिकांची भलीमोठी वेटिंग लिस्ट आहे. त्यासाठी लोकांनी चक्क २ लाख डॉलर्स देऊन बुकिंग केलं आहे!

२० जुलै २०१२ रोजी स्पेस कंपनी 'ब्लू ओरिजिन'चा मालक जेफ बेझॉस आपला भाऊ मार्क इतर दोन सहकाऱ्यांसोबत 'न्यू शेफर्ड' कॅप्सूलमधून अवकाशात झेपावला. त्यांनी अवकाशात ४ मिनिटं शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. कॅप्सूल जमिनीवर सुखरूप परतलं. या कंपनीनं आतापर्यंत अनेक जणांना अवकाश सफर घडवली आहे. अर्थात त्याच्या तिकिटाची किंमत तब्बल १० कोटी डॉलर्सच्या आसपास आहे. त्यामुळे सध्यातरी इतकी मोठी रक्कम परवडणारी मंडळीच, अशी अवकाशयात्रा करू शकतील. मात्र, आजच्या घडीला प्रचंड खर्चीक असणारी ही उड्डाणं भविष्यात कदाचित सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात येतीलही अनेक कंपन्यांनी चक्क 'स्पेस रिझॉर्टस्' काढण्याची योजना आखली आहे. 'स्पेस एक्स' कंपनी तर आपल्या स्टारशिप रॉकेट'चा वापर करून शंभरेक लोकांना काही मिनिटांत 'वर्ल्ड टूर' घडवून आणण्याची योजना आखते आहे. पृथ्वीवर शांघाई ते न्यूयॉर्क हा १५ तासांचा प्रवास ३९ मिनिटांत घडवून आणण्याचा याच कंपनीचा प्रयत्न आहे.

ऑर्बिटल टुरिझम' यात प्रवाशांसाठी चंद्रावर आणि इतर ग्रहांवर हॉटेल्स बांधली जातील. प्रवाशांना हायड्रोजन भरलेल्या फुग्यात राहता येईल किंवा ISS मध्ये बदल करून त्यांची तिथे राहण्याची सोय केली जाईल. 'ऑरोरा स्टेशन' हे असंच एक हॉटेल असेल. हे स्टेशन लवकरच पूर्णत्वास येऊन त्याची सेवाही सुरू होईल, अशी अशा आहे. यात सहा जणांची (चार ग्राहक आणि दोन क्रू सदस्य) १२ दिवस राहण्याची सोय केलेली असेल. पृथ्वीच्या ३२० किलोमीटर वरपर्यंत प्रवाशांना हे स्टेशन घेऊन जाईल. पृथ्वीला दर १० मिनिटांमध्ये हे स्टेशन घिरट्या घालेल, प्रवाशांना दररोज एकूण १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त बघायला मिळतील. प्रत्येकी तब्बल ९५ लाख डॉलर्स मोजावे लागतील. 'स्पेस एलिव्हेटर' म्हणजे चक्क अंतराळात जाण्यासाठी लिफ्ट ही कल्पना प्रत्यक्षात उतरल्यास अंतराळ प्रवासाचा चेहरामोहरा बदलून जाईल. 'सॅटेलाईट लॉन्चिंग'साठी लागणारा खर्च कमी होईल. आपण चंद्र, मंगळ तसंच लघुग्रहांवर अतिशय सहजपणे प्रवास/वस्ती करू शकू. येत्या शतकात आपल्या आकाशगंगेची किंचितशी का होईना सफर करता येईल. हा प्रवास सामान्यांच्या खिशाला कसा परवडेल, हा वेगळा मुद्दा असला तरी त्याची आपण आज स्वप्नं बघायला हरकत नाही !!

Web Title: Pay 95 million dollars, see 16 sunrises, 16 sunsets every day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.