शांतता, स्थैर्य, दोन वेळचं जेवण... मग नाटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 06:42 AM2021-12-11T06:42:16+5:302021-12-11T06:42:29+5:30

‘आपलं नेमकं काय चाललंय?’ - हे टोकदार व जोरकसपणे सांगणारा नाहीसा होतोय, कलाकार भयभीत आहेत, हा दोष केवळ सत्तेचा कसा?

Peace, stability, two meals a day ... then drama! | शांतता, स्थैर्य, दोन वेळचं जेवण... मग नाटक!

शांतता, स्थैर्य, दोन वेळचं जेवण... मग नाटक!

Next

वामन केंद्रे, ख्यातनाम नाट्यकर्मी

कलेतून काळाला कलाटणी मिळाल्याचा इतिहास आहे. काय सांगाल? ...

कोविडचा काळ बघता मला आत्ता जगातली सगळ्यांत सर्वश्रेष्ठ कला नीट जगण्याचीच वाटते.  प्रत्येक काळामध्ये कुठल्याच देशात व समाजात राजकीय सुवर्णकाळ असा आलेला नाही. अस्वस्थता जरी व्यवस्थेनंच निर्माण केलेली असली तरी ती सदैव असते. आम्ही परफॉर्मिंग आर्टवाली माणसं नेहमी म्हणतो की, देशात शांतता, स्थैर्य, दोन वेळचं जेवण याची भ्रांत नसेल तर, त्यानंतरची माणसाची नैसर्गिक भूक म्हणजे मनोरंजन ! हे मनोरंजन हर तऱ्हेचं, नवरसापैकी कुठलाही रस अनुभवण्याचं आहे. त्यातून माणसाला राजकीय-सामाजिक व्यवस्थेबद्दल आरसा दाखवणं, प्रश्न विचारणं, विचार करायला लावणं ही गोष्ट महत्त्वाची. नाटक कलेचा जन्मच त्यासाठी झाला.

कुणी पथनाट्यं करून विरोध करतो, घोषवाक्य देत राहातो. माझ्यासारखा कुणी ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘झुलवा’, ‘जानेमन’, ‘रणांगण’ सारख्या नाटकातून धार्मिक-जातीय दंगली, माणूसपण नाकारलं गेलेल्या देवदासी, परिघावर ठेवलेले किन्नर यांच्या प्रश्नांविषयी व हक्कांविषयी भान जागवणारी नाटकं करतो. ती नाटकं समाजाच्या एका वर्गाला नाकारलेली प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या विचारातून आलेली असतात. तिसरा प्रकार बिरबलच्या चतुर बुद्धिवादी भूमिका रेटत राहाण्याचा. ते काम सामान्य माणसांचा प्रतिनिधी होऊन सोंगाड्या करतो. ‘हे बरं चाललंय आणि हे बरं चाललेलं नाही’ असा कटाक्ष ठेवत प्रबोधन करतो. कीर्तनकार हेच अध्यात्माच्या धाग्याने पुढे नेतो. सिनेमाही प्रबळ माध्यम आहे. लोकांच्या मनातील अस्वस्थतेला आवाज देण्याचं काम नाटक जास्त टोकदार पद्धतीनं करतं. या कृतीतून धोरणात्मक बदल झालेले मी पाहिले आहेत. हे करणारी माणसं त्यांनी ते करत राहावं या अवस्थेत राहिली नाहीत, त्यांचं अस्तित्व बेदखल होतंय ही माझी आताची अस्वस्थता आहे. 

जगभरातच दडपशाहीचा, उजव्या वळणाने जाणाऱ्या राजकीय विचारसरणीचा कालखंड आहे. बुद्धिवादी लोकांमध्ये अस्वस्थता दिसते..?
आपल्या कृतीचा परिणाम काय होतो हे पाहाणं ही, गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची असते. त्यावेळी सत्तेत उजवे आहेत की, डावे याने फरक का पडावा?, जबाबदार कलाकार या नात्याने एकजिनसी समाज घडावा म्हणून जाणवणारी निकड तटस्थपणे मांडणं हे माझं काम आहे. सर्व काळात वेगवेगळ्या पातळ्यांवर जी अस्वस्थता जाणवते तिचं आपण करतो काय हा माझा प्रश्न आहे. सत्ता कुणाचीही असो, ती सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्याच्या आड येत असेल तर, आपल्या माध्यमातून आपण उभे राहातो का, हा मुद्दा आहे. उजव्यांच्या सत्ताकाळात खूप अन्याय झाला आणि डाव्यांच्या काळात सुवर्णयुग आलं असं मी मानत नाही. व्यक्तिगत विचारसरणी कुठलीही असली तरी बाजूला ठेवून विचार करताना दिसतं, गांधींना अभिप्रेत असणाऱ्या स्वराज्याच्या संकल्पनेपर्यंतही आपण पोहोचलेलो नाही. शेवटच्या माणसापर्यंत समता, न्याय या गोष्टी झिरपलेल्या नाहीत. राजकीय स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्ष उलटल्यावर स्थिती सुधारायला हवी होती. 

अस्वस्थ काळाबद्दल बोलत असताना कलेचं आणि सत्तेचं काय नातं असलं पाहिजे याची स्पष्टता हवी, तर सुधारणा होतात. कुठल्याही काळाची अस्वस्थता कमी कसाची ठरवता येणार नाही, कधी ती जाणवते, कधी जाणवत नाही इतकंच. जी माणसं चळवळी उभारतात, परिवर्तनासाठी विवेकी पद्धतीनं हाकारतात त्यांचं काम हेच की, कुणाच्याही वळचणीला न लागता तटस्थपणे सामाजिक-राजकीय प्रक्रियांकडे पाहाणं व त्यातली अस्वस्थता समाजात, सत्तावर्गासमोर मांडणं. 

आपापल्या अभिव्यक्तीतून हे मांडणारा चित्रकार, नाटकवाला, आदिवासी कलाकार, शेतकरी कलाकार, लोककलावंत आज कोलमडले आहेत, दोनवेळच्या भुकेसाठी झगडताहेत ही माझी अस्वस्थता आहे.  आपलं नेमकं चाललंय काय हे टोकदार व जोरसकपणे सांगणारा नाहीसा होतोय हे विचित्र गुंगीच्या अवस्थेत कुणाच्या लक्षात येत नाही आहे. अशा कलाकारांच्या भयाला आपण दुर्लक्षित करू शकत नाही. याचा दोष केवळ राजकीय व्यवस्थेला देणं मला गैर वाटतं. एकूण समाजरचना, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची उपस्थिती, त्यांनी सामान्य माणसाच्या खांद्यावर हात ठेवून, “ घाबरू नको. मी पाठीशी आहे.’’ असं म्हणणारा समाज कुठाय असा प्रश्न पडतो.  

तरुण वर्ग तुमच्या सतत भवताली आहे. तो कसा दिसतो?
भारतातला तरूण मला अत्यंत महत्त्वाकांक्षी दिसतो. निसर्गानं दिलेल्या क्षमता धुंडाळण्याचा त्याचा ध्यास आहे. मात्र त्याला आव्हान स्वीकारण्याचा संस्कार देण्याची गरज आहे. हर प्रकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशाच्या गावात, गल्लीबोळात, वाडीत, तांड्यात खचाखच प्रतिभा भरलेली आहे. उसळत्या प्रलोभनांपायी तरूण काहीसा भरकटतो कारण हातात असलेल्या काळाचं, वेळेचं करायचं काय याचा निश्चित अजेंडा त्याच्यासमोर नाही. स्वप्नं अगणित पण, त्यासाठीचं इंधन नाही. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक पूर्वग्रह बाजूला ठेवून तरूणांमधील शक्तीला संपूर्ण प्रोत्साहन देण्याचं धैर्य उदार मनानं आपल्याला दाखवावं लागणार. मूल जन्मल्यावर, चालू-बोलू लागताच त्याची दहावीस वर्ष ज्या शिक्षणासाठी खर्च होतात ते उपजीविकेची खात्री देऊ शकत नाही. त्यात आमूलाग्र बदल घडवण्याची अस्वस्थता आपल्याला कैक वर्ष शिवत नाही , मग बाकी गोष्टी काय बोलायच्या?, ज्याला काहीच करायचं नाही व आपल्या निष्क्रियतेचा भार दुसऱ्यावर लादायचा आहे तो केवळ या ना त्या नावे बोटे मोडत राहातो. आपण दोषाच्या मुळाशी पोहोचून निराकरणासाठी कुठं कमी पडतोय हेच तपासायला हवंय. स्वप्नं बघणाऱ्या  तरूणांची स्वप्नं अधिक गडद, व्यापक, रंगीत व्हावीत यासाठी पुनर्रचना करायला हवी.

मुलाखत : सोनाली नवांगुळ

Web Title: Peace, stability, two meals a day ... then drama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.