पदोपदी जाणवणारी दातृत्वाची थोरवी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 02:50 AM2018-10-24T02:50:40+5:302018-10-24T02:51:17+5:30
दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाचा सन्मान समाजात नेहमीच केला जातो़ अशीच एक व्यक्ती म्हणजे उद्योग महर्षी रसिकलाल धारीवाल़
- मिलिंद फडे
दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाचा सन्मान समाजात नेहमीच केला जातो़ अशीच एक व्यक्ती म्हणजे उद्योग महर्षी रसिकलाल धारीवाल़ एक वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले़ त्यांच्या निधनानंतरही त्यांचे कार्य त्यांच्या पत्नी शोभाताई आणि कन्या जान्हवी यांनी सुरू ठेवले आहे़
जेव्हा रसिकभाऊंना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मोठा उद्योगपती हा दर्प त्यांच्यात कुठेच दिसला नव्हता. उलट अत्यंत विनम्रशील आनंदी आणि आस्थेने विचारपूस करीत आपलेसे वाटेल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणवले. त्या वेळी त्यांच्यासोबत पत्नी शोभाताईदेखील होत्या. कुटुंबवत्सल असे हे जोडपे म्हणजे, लक्ष्मी-नारायणाचे जोडपेच वाटले. पुढे कालौघात या दोघांशीही वारंवार संपर्र्क येत गेला़ पुढे त्यांच्या विराट कर्तृत्व आणि दातृत्वाचे दर्शन घडत राहिले.
धारीवाल यांनी केलेल्या प्रचंड कार्याची प्रचिती त्यांना मिळालेल्या पहिल्या ‘पुलाकभूषण’ पुरस्काराने आली़ देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार जैन समाजाचे मुनीश्री प़ पू़ १०८ पुलाकसागरजी महाराज यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला़
रसिकभाऊंनी शिक्षण संस्था, शाळा कॉलेज मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारली. शेकडो जैन-अजैन शिक्षण संस्थांना भक्कम आर्थिक देणगी देऊन स्थिर केले. रुग्णालयाची उभारणी, तसेच विविध रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले़ याबरोबरच निसर्ग महाविद्यालय, वृद्धाश्रम यांचीही जोड त्यास दिली. धार्मिक पातळीवर तर रसिकभाऊ व त्यांची पत्नी शोभाताई सतत सक्रि य असायचे. त्यामुळेच रसिकभाऊंना उद्योग महर्षी या बिरुदावलीप्रमाणेच दानशूर आणि समाज भूषण या गौरवानेदेखील उल्लेखिले जाऊ लागले. हीच त्यांच्या कार्याची पावती मानावी लागेल.
स्वत: रसिकलाल धारीवाल हे देशातले उद्योगपती असले, तरी त्यांची खरी ओळख हजारो गरजूंना आणि शेकडो संस्थांना कोट्यवधी रुपयांची देणगी देऊन, त्यांच्या जीवनात आणि वाटचालीत चांगले दिवस आणणारा दानशूर उद्योग महर्षी हीच राहिली.
श्री क्षेत्र सम्यक शिखरजी असो, पालीठाणा , श्री क्षेत्र जिरावाला असो, हे दाम्पत्य खूपच भक्तिभावाने या जैन तीर्थस्थळांच्या विकासाबद्दल वारंवार बोलत असे़ विशेष म्हणजे, त्यांनी स्वत:च तेथे विकास कामासाठी कोट्यवधी रुपये देणगी दिल्याचा उल्लेख कधीच ते करत नसत. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे नव्याने साकारल्या जात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास त्यांच्या उद्योग समूहातर्फे तब्बल ५१ कोटी रुपये देणगी दिल्याचे जेव्हा समजले, तेव्हा आश्चर्य वाटले नाही.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी, गरजू रुग्णांना मोफत अथवा माफक शुल्कात वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांची ट्रस्ट उभारून, त्याद्वारे आपल्या सामाजिक कार्याचा झरा सदैव वाहता राहील याची दक्षता घेतली. जैन संस्कारांचा प्रभाव असणारे रसिकभाऊ अन्य धर्मियांबद्दलही आस्था बाळगत आणि मदतीचा हात पुढे करायचे़ गुजरात व महाराष्ट्रामधील भूकंप, आंध्र प्रदेशामधील वादळ, पूर, कारगिल युद्ध अशा प्रत्येक नैसर्गिक व राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी रसिकभाऊ आणि शोभाताई मदतीसाठी पुढे असायचे. या त्यांच्या दानशूर वृत्तीमुळेच त्यांच्याकडे मदतीसाठी येणारी संस्था कधी विन्मुख परत गेले नाहीत. किंबहुना, एखाद्या दिवशी असे कोणी त्यांना भेटले नाही, तर पटकन शोभातार्इंना म्हणायचे की, आज माझे पुण्य कमी पडलेले दिसतेय.
(धारीवाल यांचे स्नेही)