पदयात्री राजारामबापू

By वसंत भोसले | Published: July 28, 2019 12:02 AM2019-07-28T00:02:53+5:302019-07-28T00:10:31+5:30

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी जे काम हाती घेतले आणि जे पद स्वीकारले त्याला सुवर्णस्पर्श झाल्याप्रमाणे ते चमकतच राहिले. त्यांनी वाळवा तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचा पाया घातला. संपूर्ण राज्याचा एकच महसुली कायदा तयार करुन महसुली पातळीवरील संयुक्त महाराष्ट्र त्यांनी निर्माण केला अशा या लोकनेत्याचे जन्मशताब्दी वर्ष येत्या १ आॅगस्ट रोजी सुरू होत आहे.

 Pedestrian Rajarambapu | पदयात्री राजारामबापू

पदयात्री राजारामबापू

googlenewsNext
ठळक मुद्देया तिन्ही नेत्यांच्या आयुष्यात एका वळणावर जोरदार राजकीय संघर्षही झाला. त्यातून सांगली-साताºयाचे नुकसानही खूप झाले. मनापासून सार्वजनिक जीवनाला वाहून घेतलेल्या या नेत्यांनी संघर्ष करतानाही मागेपुढे पाहिले नाही.रविवार -- जागर

- वसंत भोसले
महाराष्ट्राच्याराजकारणावर पश्चिम महाराष्ट्राचा सातत्याने प्रभाव राहिला. त्या पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू सांगली जिल्हा कायम राहिला. कारण या जिल्ह्याने अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला आणि देशाला दिले. प्रतिसरकारच्या चळवळीचे नेतृत्वही याच जिल्ह्याने दिले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रचलित राजकारणावर या जिल्ह्यातील तीन नेत्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला. मी ११ जून १९८६ रोजी पत्रकाराची नोकरी करण्यासाठी सांगलीच्या केसरी आवृत्तीत दाखल झालो. तेव्हा या तीन नेत्यांपैकी यशवंतराव चव्हाण आणि राजारामबापू पाटील यांचे निधन झाले होते. त्यानंतर तीनच वर्षांनी वसंतदादा पाटील यांचेही १ मार्च १९८९ रोजी निधन झाले. आमच्या पत्रकारांच्या पिढीला या दिग्गज नेत्यांना जवळून पाहण्याचा योग आला नाही. मात्र, क्षणोक्षणी आणि पदोपदी सांगली-सातारा जिल्ह्यांच्या गावोगावी त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा सर्वत्र दिसत होत्या.

यशवंतराव चव्हाण यांचे मूळ गाव विटा. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी देवराष्ट्रे येथे झाला. त्यांची जन्मशताब्दी सहा वर्षांपूर्वी झाली. वसंतदादा पाटील त्यांच्याहून चार वर्षांनी लहान. त्यांचे गाव सांगलीच्या जवळचे कृष्णाकाठावरील पदमाळे. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ रोजी कोल्हापूरला झाला होता. राजारामबापू हे वसंतदादांपेक्षा तीन वर्षांनी लहान. त्यांचा जन्म
१ आॅगस्ट १९२० रोजी कºहाड तालुक्यातील आजोळी वडगाव-हवेलीत झाला. त्यांचे मूळ गाव कासेगाव. वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी दोन वर्षांपूर्वी झाली. येत्या १ आॅगस्ट रोजी लोकनेते राजारामबापू पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या तिन्ही नेत्यांच्या कार्याचा आणि विचारधारणेचा प्रवाह एकच होता. सामान्य माणसांचे कल्याण हाच केंद्रबिंदू होता. शिवाय गावोगावांचा शाश्वत विकास कसा होईल हाच ध्यासही होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य सार्वजनिक जीवनाला वाहून घेतले होते. या नेत्यांना राज्यपातळीवर विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या कामाचा वेगळेपणा दाखवून दिला. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनास एक विधायक वळण दिले. सहकारी चळवळ, शेतीसाठी पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती यासाठी सातत्याने काम केले.

या तिन्ही नेत्यांच्या आयुष्यात एका वळणावर जोरदार राजकीय संघर्षही झाला. त्यातून सांगली-साताºयाचे नुकसानही खूप झाले. मनापासून सार्वजनिक जीवनाला वाहून घेतलेल्या या नेत्यांनी संघर्ष करतानाही मागेपुढे पाहिले नाही. जिवाचे रान करून राजकीय संघर्ष केला. मात्र, विधायक कामात एकमेकांना अखेरच्या क्षणी मदतही करण्याची भावना ठेवली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथेच शेतकरी मेळाव्यात १९८३ मध्ये पाच वर्षांच्या संघर्षानंतर यशवंतराव-वसंतदादा यांनी एका व्यासपीठावर येऊन संघर्ष संपल्याची घोषणा केली. तसे राजारामबापू आणि वसंतदादा पाटील यांचा १९७३ पासून उडालेला वैचारिक संघर्षाचा धुरळा दहा वर्षांनी साखर कारखान्याने आशिया खंडात उभारलेल्या पहिल्या अ‍ॅसिटोन प्रकल्पाचे उद्घाटन वसंतदादा पाटील यांच्या हस्ते करून खाली बसला.

हा सर्व संदर्भ याच्यासाठी मांडण्याचे कारण की, सांगली जिल्ह्याचे राजकारण पत्रकार म्हणून समजून घेताना या नेत्यांना समजून घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नव्हते. कारण ही नेतेमंडळी काळाच्या पडद्याआड गेली होती. यशवंतरावांना ७१ वर्षे, वसंतदादांना ७२ वर्षे आणि राजारामबापू यांना सर्वांत कमी ६४ वर्षेच आयुष्य लाभले. मी एका राजबिंडा आणि देखण्या नेत्याला (राजारामबापू पाटील) प्रथम आणि शेवटचे पाहिले ते पुणे-बंगलोर महामार्गावरील कागलजवळील दूधगंगा नदीवर असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर. जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी कन्याकुमारीपासून संपूर्ण भारताची पदयात्रा काढली होती. निपाणीनंतर कागल येथे महाराष्ट्रात त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश जनता पक्षाचे अध्यक्ष राजारामबापू पाटील असंख्य कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. आम्ही विद्यार्थी त्या गर्दीत होतो. पांढरे शुभ्र धोतर, कुडता आणि जॅकेट घातलेले, डोकीवर टोकदार पांढरी शुभ्र टोपी धारण केलेले राजारामबापू यावेळी केंद्रस्थानी होते. कोल्हापुरातील बिंदू चौकात त्यांच्याच अध्यक्षतेखाली चंद्रशेखर यांची प्रचंड जाहीर सभा झाली आणि ही पदयात्रा पुढे सांगलीकडे गेली. या संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेत राजारामबापू एप्रिल-मेच्या उन्हाळ्यात वयाच्या ६३ व्या वर्षी ११०० किलोमीटर चालत होते. ते खºया अर्थाने पदयात्री होते.

राजारामबापू पाटील यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झाला, तर अनेक पातळीवर त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. जे काम हाती घेतले आणि जे पद स्वीकारले त्याला सुवर्णस्पर्श झाल्याप्रमाणे चमकतच राहिले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी आपल्या कासेगाव गावी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. कॉँग्रेसच्या विचाराने आणि सत्यशोधकी आदर्शाने काम करणाºया पिढीचे ते प्रतिनिधी होते. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते या संस्थेच्या माध्यमातून काम करीत राहिले. आयुष्याच्या अखेरीस अभियांत्रिकी आणि माहिती-तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना करेपर्यंत मजल मारली. सहकारी साखर कारखान्यासाठी त्यांनी संघर्ष केला. वाळवा हा धारदार संघर्षाचा तालुका म्हणून मानला जायचा. त्या तालुक्यात विधायक कामाचे पहिले पाऊल सहकारी चळवळीच्या माध्यमातून राजारामबापू यांनीच टाकले. पुढे त्यांचा कारखाना नावारूपाला आला. साखरेशिवाय उपपदार्थांची निर्मिती केली. अगदी अ‍ॅसिटोन अ‍ॅसिड उत्पादनापर्यंत मजल मारली. शेतीच्या पाण्यासाठी अनेक योजनांची आखणी केली.

राजकीय जीवनातही त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. किंबहुना वसंतदादा पाटील यांच्यापेक्षा अधिक आणि आधी राज्यपातळीवर काम करण्याची संधी राजारामबापू पाटील यांना मिळाली. बी. ए. एलएल.बी. असलेले बापू यांना १९५९ मध्ये कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या झेंड्याखाली महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते आणि कॉँग्रेसची दाणादाण उडवून टाकली होती. पश्चिम महाराष्ट्रात केवळ सहाच आमदार निवडून आले होते. तेदेखील हजार-दोन हजार मताधिक्याने निवडून आले होते. विदर्भ आणि सध्याच्या गुजरातमधून कॉँग्रेसला भरघोस यश मिळाले होते म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली द्विभाषिक मुंबई प्रांताचे ते मुख्यमंत्री झाले होते. अशा कठीण प्रसंगी राजारामबापू पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि केवळ तीन वर्षांनी १९६२ मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत २६४ पैकी २१५ जागा जिंकल्या होत्या. राजारामबापू यांच्या कार्यकाळातच अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाचे अधिवेशन पुण्यात झाले होते. त्याच्या संपूर्ण संयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा इंदिरा गांधी आणि सरचिटणीस लाल बहादूर शास्त्री यांच्या उपस्थितीत तीन दिवस हे अधिवेशन १८ नोव्हेंबर १९५९ पासून झाले होते.

राजारामबापू पाटील यांच्या कार्याचा प्रभाव राज्यभर झाला होता. त्यांना वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री म्हणून प्रथम संधी मिळाली. पुढे ते महसूल मंत्री झाले. उद्योग आणि ऊर्जा खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली. सलग बारा वर्षे ते राज्य मंत्रिमंडळात कार्यरत राहिले. त्या-त्या खात्यांची जबाबदारी सांभाळताना अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित मुंबई प्रांताचा भाग मिळून महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. त्यामुळे या तिन्ही विभागात महसूल कायदे वेगवेगळे होते. ते सर्व रद्द करून राजारामबापू पाटील यांनी पुढाकार घेत संपूर्ण राज्याचा एकच महसुली कायदा तयार केला आणि तो लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. महसुली पातळीवरील संयुक्त महाराष्ट्र त्यांनी निर्माण केला, असे म्हणायला हरकत नाही. महसूल मंत्री असतानाच त्यांनी शेतकऱ्यांना खातेपुस्तिका देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व खातेदार शेतकºयांना ते देण्याची व्यवस्था केली.

उद्योगमंत्री असताना त्यांनी निम्म्या ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. महाराष्ट्राचा औद्योगिक विकास होत नाही, अशी टीका नेहमी विरोधक करीत असायचे. राजारामबापू पाटील यांनी औद्योगिकरणास गती दिल्यावर तेच विरोधक महाराष्ट्राचे सर्व औद्योगिकरण करून ग्रामीण भागातील शेती संपुष्टात आणता की काय? असा सवाल विधिमंडळात करू लागले होते. राज्य मंत्रिमंडळातील त्यांची देदीप्यमान कामगिरी चालू असतानाच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे नंदनवन करण्याची त्यांची मोहीम कायम चालू होती. राज्यभर दौरे, अधिवेशने चालू असली तरी त्यांनी वाळवा तालुक्यातील कामाकडे कधी दुर्लक्ष केले नाही.

बँक स्थापन केली, सूतगिरणी उभारली, पाणी योजनांची आखणी करून ऊस शेती विकसित करण्याच्या योजना राबविल्या, कासेगाव शिक्षण संस्थेचा विस्तार चालू होता. याच काळात त्यांचे वारणा नदीवर उभारण्यात येणाऱ्या धरणावरून वसंतदादा पाटील यांच्याशी मतभेद झाले. वारणेवरील धरण शिराळा तालुक्यातील खुजगाव येथे व्हावे, अशी त्यांची मागणी होती.

खुजगावला धरण झाल्यास पाणलोट क्षेत्र मोठे मिळते आणि हे धरण ८६ टीएमसीचे होऊ शकते, अशी आखणी होती. यासाठी त्यांचा आग्रह होता. मात्र, यामध्ये खुजगावपासूनची आता धरणाजवळ असलेल्या मणदूर गावापर्यंतची सर्व आरळा, चरण, आदी गावे पाण्याखाली गेली असती. त्यामुळे या गावांचा खुजगावला धरण बांधण्यास विरोध होता. मात्र, खुजगावला धरण झाले असते तर पाण्याचा साठा मोठा झाला असता. शिवाय वाळवा, शिराळा, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, मिरज, कºहाड, आदी तालुक्यांना कालव्याद्वारे पाणी मिळाले असते. शिवाय सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पूर्व भागालाही पाणी देता आले असते. वसंतदादा पाटील यांनीही हा विषय प्रतिष्ठेचा केला.

राजारामबापू पाटील यांनी पहिली शेतकरी परिषद खुजगावला १७ जून १९७३ रोजी घेतली होती. हजारो शेतकरी जमले होते. कोल्हापूर जिल्ह्यातूनही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावरून राज्यात एक मोठा राजकीय संघर्ष झाला. अखेर यशवंतराव चव्हाण यांनी वसंतदादांची बाजू घेतली आणि चांदोली येथे केवळ ३४ टीएमसीचे धरण बांधण्याचा निर्णय झाला. पुनर्वसनाचा प्रश्न होता. मात्र, अधिक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग खुंटला आणि सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचे नुकसान झाले.

वसंतदादा-राजारामबापू यांच्या वादाचे अनेक राजकीय पडसाद सांगली जिल्ह्यात उमटत राहिले. हा संघर्ष दहा वर्षे होत राहिला. अखेरीस राजारामबापू यांना मंत्रिमंडळातही स्थान मिळाले नाही आणि कॉँग्रेसही सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जगजीवनराम यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचे ते प्रदेशाध्यक्ष झाले. पुढे तो पक्ष जनता पक्षात विलीन झाला. त्या पक्षाचेही बापू दोनवेळा प्रदेशाध्यपदी निवडले गेले. १९७८च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, जनता पक्षाने ९९ जागा मिळवून विधिमंडळातील सर्वांत मोठा पक्ष ठरला. पुढे पुलोद सरकारची स्थापना झाली. यावेळी त्यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली, पण शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामीण विकास, कायदा व न्याय खात्याचे मंत्री झाले.

राजारामबापू पाटील यांचा जनसंवादावर गाढा विश्वास होता. त्यांच्याइतक्या पदयात्रा महाराष्ट्रातील कोणीही नेत्यांनी केलेल्या नाहीत. त्यांनी १९७५ मध्ये वीस कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वाळवा तालुक्यात ६५० किलोमीटरची पदयात्रा केली. सांगली ते उमदी २५० किलोमीटरची पदयात्रा, चंद्रशेखर यांच्यासोबत कागल ते धुळे जिल्ह्यातील बिजासनपर्यंतची ११०० किलोमीटरची पदयात्रा, जळगाव ते नागपूर सतरा दिवस ४६५ किलोमीटरची शेतकरी दिंडीसह पदयात्रा काढली. ते एक लोकनेते होतेच, पण पदयात्रीही होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांचे कनिष्ठ चिरंजीव जयंत पाटील यांनी राजकारणात प्रवेश करताच राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ६ जानेवारी १९८६ रोजी वाळवा तालुक्यात पदयात्रा काढून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली.

चांदोली धरण होणार होते. वारणा आणि कृष्णा या नद्या वाळवा तालुक्याच्या दक्षिण तसेच उत्तर बाजूने वाहतात. तालुक्याच्या बराच मोठा मध्य भाग कोरडवाहू होता. त्या गावातील शेतीला पाणी देण्यासाठी राजारामबापू यांनी ५० हजार एकरांचे परवाने घेऊन ठेवले होते. दुर्दैवाने त्यांचे १७ जानेवारी १९८४ रोजी निधन झाले. केवळ चोवीस वर्षांचे जयंत पाटील यांनी बापूंचे कार्य हाती घेतले. बापूंच्या जुन्या सहकाऱ्यांना आणि तरुण साथीदारांना एकत्र करून शेतकºयांना विश्वास देण्यासाठी त्यांनी ही पदयात्रा काढली. साखर कारखान्याने हमी घेऊन भूविकास बँकेचे ४८ कोटी रुपये कर्ज घेतले आणि ३२ उपसा जलसिंचन योजना पूर्ण केल्या. पन्नास हजार एकर जमीन ओलिताखाली आणणारा तरुण अशी महाराष्ट्रात त्यांची नोंद झाली.

बापूंच्या पावलावर पाऊल टाकत जयंत पाटील तीस वर्षे अपराजित आमदार राहिले. पंधरा वर्षे राज्य मंत्रिमंडळात काम केले. आता तेही प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. बापूंच्या सर्व संस्थांचा विकास आणि विस्तार केला. या पदयात्रीच्या मार्गावरून पुढे चालत राहायचे हा मंत्र त्यांनी जपला आणि बापूंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभी याचे समाधान आहे की, त्यांच्या कार्याचा विस्तार करणारा पुत्र रत्नासारखा झळकत राहिला. राजकारणातील चढ-उतार कोणाला सुटलेले नाहीत. मात्र, पदयात्रेच्या माध्यमातून विकासाचा महामार्ग बनविणाच्या कार्यापासून ते विचलित झाले नाहीत. राजारामबापू हा एकमेव नेता सांगली जिल्ह्यात होऊन गेला की, कार्यकर्त्यांना कारखाना काढून दिला. त्याचप्रमाणे जयंत पाटील यांनी चार साखर कारखाने काढण्याचे कार्य करून दाखविले. ते महाराष्ट्रातील एकमेव दुर्मीळ उदाहरण असावे. राजारामबापू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे स्मरण करताना महाराष्ट्राच्या इतिहासाची पाने या कर्तृत्वाने भरली गेली पाहिजेत. त्यासाठी पदयात्री बापूंना अभिवादन!

Web Title:  Pedestrian Rajarambapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.