पीपल्स एज्युकेशन सोसायटी : एक सामाजिक क्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:26 AM2020-07-08T06:26:43+5:302020-07-08T06:28:52+5:30
शेकडो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यामुळे अंधारयुगात जगणाऱ्या तत्कालीन अस्पृश्य व एकूणच बहुजन समाजाला उच्चशिक्षणाची दारे मोकळी करून देण्यासाठी त्यानी ‘पीईएस’ची केलेली स्थापना हे त्यांच्या क्रांतिकारक द्रष्टेपणाचे द्योतक आहे.
- डॉ. भालचंद्र मुणगेकर
(माजी राज्यसभा सदस्य)
आठ जुलै, १९४५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे आज, ‘पीईएस’चा अमृतमहोत्सव. शेकडो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यामुळे अंधारयुगात जगणाऱ्या तत्कालीन अस्पृश्य व एकूणच बहुजन समाजाला उच्चशिक्षणाची दारे मोकळी करून देण्यासाठी त्यानी ‘पीईएस’ची केलेली स्थापना हे त्यांच्या क्रांतिकारक द्रष्टेपणाचे द्योतक आहे. उच्चशिक्षण हेच वंचित, उपेक्षित समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षाचे साधन आहे, याबद्दल त्यांची खात्री झाली होती.
‘पीईएस’ स्थापनेच्या द्रष्टेपणातील आणखी एक क्रांतिकारक द्रष्टेपणा म्हणजे १९४६ मध्ये सुरू केलेले मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज हे देशातील पहिले सकाळचे कॉलेज. तेही फोर्टमध्ये सुरू केले. ‘क्रांतिकारक’ या अर्थाने की त्या काळात सर्व सरकारी, निमसरकारी कचेºया, बँका, विमा कंपन्या, सार्वजनिक उपक्रम व खासगी कंपन्यांच्या कचेºया फक्त फोर्ट भागात होत्या, त्यामुळे नोकरी करून कॉलेज करणे शक्य होई. दलित समाजातील तरुणांचीच नव्हे, तर तथाकथित उच्चवर्णीय समाजातील तरुणांची ती गरज होती. सन १९६५ ते १९७४ या काळात मी रिझर्व्ह बँकेत नोकरी करताना बँकेतील माझ्या पूर्वीच्या पिढीतील ५० टक्क्यांहून अधिक पदवीधर सिद्धार्थ आर्टस् अॅन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये शिकल्याचे ते अभिमानाने सांगत. मुंबईतील वकील तर बघायला नको. सिद्धार्थ लॉ कॉलेज संध्याकाळी सहानंतर. हजेरीची फारशी अट नसल्याने थेट परीक्षेला बसण्याची सोय असलेले कॉलेज. बाबासाहेबांनी आर्टस् कॉलेजच्या इमारतीचे नाव ‘बुद्ध भवन’, तर कॉमर्स व लॉ कॉलेजच्या इमारतीचे नाव ‘आनंद भवन’ ठेवले. त्यांच्याकडे पाहताना आजही मन अभिमानाने व कृतज्ञतेने भरून येते.
सन १९६४ मध्ये मुंबईतील वडाळा येथे सोसायटीच्या कॉलेजांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना राहण्यासाठी १३० खोल्यांचे हॉस्टेल बांधले आणि सन १९७२ मध्ये बाजूलाच ‘डॉ. आंबेडकर कॉमर्स कॉलेज’ स्थापन करून कामगार विभागातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली. महाड व बंगलोर येथेही सोसायटीने कॉलेज स्थापन केलीत; परंतु औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना ही बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनातील आनंदाची बाब होती. औरंगाबादच्या कॅन्टॉन्मेंट भागात काही बराकीमध्ये भाडेतत्त्वावर दि. १९ जून १९५० रोजी हे कॉलेज स्थापन केले. प्रारंभी ते इंटरपर्यंत होते. पदवी अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मुख्यत: हैदराबाद संस्थानातील मुख्य असलेल्या उस्मानिया विद्यापीठात जावे लागे. मराठवाड्यात सर्वांमध्ये, विशेषत: मागासलेल्या समाजात उच्चशिक्षणाची इतकी आस होती की, एका वर्षात विद्यार्थ्यांची संख्या १४० वरून ३३२ वर गेली आणि जागेअभावी प्रवेश बंद करावे लागले.
कॉलेजची स्वत:ची इमारत बांधणे गरजेचे होते, त्यामुळे हैदराबाद संस्थानातील शेड्युल्ड कास्ट फंडातून १२ लाख रुपये कर्ज घेऊन सोसायटीने १५५ एकर जागा खरेदी करून बाबासाहेबांनी हे कॉलेज सुरू केले. दि. १ सप्टेंबर, १९५१ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांनी कॉलेजचा शिलान्यास समारंभ केला. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हैदराबाद व मराठवाडा आणि त्यातही औरंगाबाद का निवडले तसेच उच्चशिक्षण हाच प्रगतीचा मार्ग कसा आहे, याचे मर्मग्राही विवेचन केले आहे. प्रारंभी ‘पीईएस’चे कॉलेज, औरंगाबाद हे नाव बदलून सन १९५५ मध्ये ‘मिलिंद कॉलेज’ असे त्याचे नामाभिदान केले. पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे मराठवाड्यातील हे पहिले कॉलेज. त्याचदरम्यान स्वामी रामानंद तीर्थ यांनीही तेथे शैक्षणिक कार्य सुरू केले होते. परंतु, बाबासाहेबांनी तेथे उच्चशिक्षणाचा पाया घातला नंतर सोसायटीने कॉमर्स, सायन्स, लॉ, फिजिकल एज्युकेशन, अशी कॉलेजीस स्थापन केली. वसतिगृहे बांधली. परिसराचे नाव ‘नागसेन वन’ ठेवले. त्याची सर्व धुरा ‘मिलिंद’चे पहिले प्राचार्य एम. बी. चिटणीस यांनी सांभाळली.
सन १९५८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केली. त्याच्या नामांतराचा इतिहास सर्वांना माहीत आहे. नामांतराच्या आंदोलनात बारा दिवस मी तुरुंगात राहिलो. हा मी मोठा आत्मसन्मान समजतो. सन १९७४ मध्ये रिझर्व्ह बँकेची १६०० रुपयांची नोकरी सोडून केवळ ६५० रुपयांच्या पगारावर आंबेडकर कॉलेजमध्ये लेक्चरर झालो आणि ऐन उमेदीची आठ वर्षे सर्वस्व पणाला लावून शिकविले ते बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. ‘पीईएस’ने उच्चशिक्षणाच्या माध्यमातून दलित समाजामध्ये भौतिक, सामाजिक व सांस्कृतिक क्रांती घडवून आणली. हजारो लोकांचे आयुष्य सोसायटीने घडविले. लेखक, कवी, कथाकार, डॉक्टर, वकील, आदी क्षेत्रांतील नामवंत ही ‘पीईएस’ची देणगी आहे.
अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत सोसायटीची ५० कॉलेजीस व २०० हायस्कूल्स पाहिजे होती. बाबासाहेबांच्या नावामुळे दानशूरांनी कोट्यवधींची देणगी दिली असती. १५० वर्षे पूर्णत्वाबद्दल मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठांना सन २००६ मध्ये माझ्या विनंतीवरून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रत्येकी २५ कोटींचे अनुदान दिले. ‘पीईएस’साठी आर्थिक मदतीसाठी मी त्यांना विनंती केली असती, तर बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांनी ती मान्य केली असती. परंतु, अनुदान देणार कुणाकडे? अकरा आजीव सदस्यांपैकी फक्त धर्मादाय आयुक्तांकडे कुणीतरी एकाच सदस्याला मान्यता दिली आहे. म्हणजे ‘पीईएस’ला पूर्ण गव्हर्निंग बॉडी नसणे वेदनादायक आहे. कितीतरी अनिष्ट गोष्टी मला माहिती झाल्या आहेत. परंतु, केवळ औचित्याचा भाग म्हणून त्याविषयी मी काही लिहीत नाही. ज्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये चार वर्षे राहिलो आणि जे सन १९७० च्या दरम्यान दलित चळवळीचे केंद्रस्थान होते, ते जमीनदोस्त झाले. ही घटना मात्र वेदनादायक आहे.