उत्तम चित्रकार आणि मुशायऱ्यांचे शायर राहत इंदौरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 07:52 AM2020-08-12T07:52:21+5:302020-08-12T07:52:28+5:30
साहिर लुधियानवी यांच्यानंतर मुशायऱ्यात ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची, ते राहतजी म्हणजे चमत्कार होते.
- प्रदीप निफाडकर, ज्येष्ठ गझलकार व पत्रकार, पुणे
हम ऐसे फूल कहाँ रोज रोज खिलते है,
सियह गुलाब बडी मुश्किलों से मिलते है।
(आमच्यासारखी फुलं कुठे रोज रोज उमलतात का? अहो, काळा गुलाब फार मुश्किलीने उमलतो.)
राहत इंदौरी गेले अन् माझ्या ओठांवर हाच शेर आला. त्यांच्याकडून मी पहिला हाच शेर ऐकला होता. स्वत:च्या काळ्या रंगावर त्यांनी सियह गुलाब लिहिले; पण त्याचबरोबर त्यांनी लिहिले होते की, ‘अशी फुले थोडीच रोज उमलतात?’ ते खरेच होते. एक चांगला चित्रकार, चांगला शायर व चांगला माणूस म्हणून भारतच नाही, तर संपूर्ण शायरी जगत ज्यांना जाणत होते, ते राहत इंदौरी म्हणजे मुशायरा जिंकणारे खात्रीशीर नाव होते. याचा अर्थ असा अजिबात नाही की, ते फक्त मुशायऱ्यांचे शायर होते.
हौसले जिंदगी के देखते हैं,
चलिए कुछ रोज जी के देखते हैं।
असे शेर लिहिणारे राहतजी. आणि मंदिर-मशिदींच्या बदलत्या स्वरूपावर-
यहां एक मदरसा होता था पहले
मगर अब कारखाना चल रहा है।
असे लिहिणारे राहतजी मुशायऱ्यांचे शायर होते असे कोण म्हणेल; पण साहिर लुधियानवी यांच्यानंतर मुशायऱ्यात ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची, ते राहतजी म्हणजे चमत्कार होते. शाळेत असतानाच त्यांचा मल्लखांब खेळताना खांदा निसटला, तरी अत्यंत मेहनत करून त्यांनी आपल्या व्यंगाची कुणाला जाणीवही करून दिली नव्हती. ते ध्वनिक्षेपकाजवळ उभे राहिले की तिरके उभे राहत आणि लोकांना त्यांची ती शैलीच वाटायची; पण आपल्या व्यंगाला त्यांनी बदलले हा चमत्कारच नाही का? त्यांना मधुमेहापासून अनेक आजार झाले तरी देश-विदेशात मुशायरे गाजत होते. त्यांची पत्नी सीमाजी म्हणायच्या की, ते जर घरी राहिले तर आजारी पडतील. आणि त्यावर ते शेरही ऐकवायचे-
फुर्सते चाट रही हैं मेरी हस्ती का लहू
मुन्तजिर हूँ, कि कोई मुझको बुलाने आये।
मित्र-चाहत्यांमध्ये वाटला गेलेला हा शायर जाणे हे केवळ ऊर्दूचे नव्हे, तर तमाम कवितेच्या जगाचे नुकसान आहे. अनेकांना माहिती नसेल, ते उत्तम चित्रकार होते. तारिक शाहीन यांच्या ‘सूरज देश’ या पुस्तकाचे कव्हर पाहिल्यावर अनेकांना ते कळाले. त्यांनी इंदूरला आपल्या चित्रकारितेने अनेक चित्रपटांची पोस्टर रंगविण्यापासून सुरुवात केली. पुढे कलार्थी नावाचा स्टुडिओ उघडून अनेक कामे त्यांनी केली. त्याकाळाचे नामवंत चित्रकार विष्णू चिंचाळकर, डी. डी. देवलाळीकर, एन. एस. बेंद्र यांच्याकडे त्यांनी काही काळ चित्रकलेचे धडेही घेतले होते. इकडे हे उस्ताद, तर शायरीमध्ये त्यांचे उस्ताद कैसर इंदौरी होते. म्हणून सुरुवातीला त्यांनी आपल्या गुरूची आठवण म्हणून ‘राहत कैसरी’ या नावाने गझला लिहिल्या होत्या. त्यांचा पहिला संग्रह ‘धूप-धूप’ आला. त्यावर हेच नाव दिसते. कैसर साहेब इंदूरच्या राणीपुरा भागात राहात. राहत जेव्हा त्यांच्याकडे जात तेव्हा वाटेत नाला ओलांडून जावे लागे. या नाल्याने इंदूरचे दोन भाग केले होते. एकदा असेच ते कैसर साहेबांकडे गेले असता त्यांनी विचारले की, किती गझला लिहिल्यास? त्यावर राहत यांनी अभिमानाने सांगितले, अगदी चार-पाच दिवसांत २२ गझला लिहिल्या. कैसर साहेब म्हणाले, ‘जा, त्या नाल्यात सगळ्या फेकून ये.’ राहत यांनी त्या फेकल्या. उस्तादांचे म्हणणे होते, इतक्या झपाट्याने गझला लिहू नयेत. अशा गझलांना जीव नसतो. राहत यांनी गुरूंची आज्ञा पाळली. अशा घटनेतून त्यांचा लिखाणाचा झपाटा दिसतो आणि गुरूवरचे प्रेमही. त्यांचा मुलगाही अलीकडे लिहू लागला होता. त्याचा पहिला मुशायरा पुण्यातच झाला. त्यावेळी मी गेलो होतो. आमची ती शेवटची भेट. त्यावेळी त्यांनी ऐकवलेला शेर आजही कानात गुंजतो आहे -
जिस्म में कैद है घरों की तरह
अपनी हस्ती है मकबरों की तरह
और दो चार दिन हयात के हैं
ये भी कट जायेंगे सरों की तरह
(घरात जसे कोंडून राहतो, तसे आयुष्य हे शरीरात कोंडलेले आहे. आपले अस्तित्व एखाद्या थडग्यासारखे आहे. अजून दोन-चार दिवसांचे आयुष्य आहे. तेही कापले जाईल मुंडकी उडवावी तसे.) तेव्हा वाटले नव्हते की, हे दोन-चार दिवस असेच उडून जातील. फार लवकरच गेले. असा हा माणूस. माझे चांगले मित्र आज आपल्यातून गेले आहेत. त्यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमी. त्यांच्याबरोबरचे अनेक मुशायरे आठवतात. विशेषत: जळगावच्या बालगंधर्व नाट्यगृहातील त्यांच्या गुजरातच्या वक्तव्यावरचे शेर आणि त्यावर मी दिलेले उत्तर व त्यानंतर त्यांनी भेटून दिलेली दाद. सारेच आठवते, पण... आपण आता फक्त त्यांच्या गझला आणि ‘चोरी चोरी जब नजरे मिली’सारखी गीते गुणगुणणे हीच त्यांना श्रद्धांजली.