वेध अर्थसंकल्पाचे
By admin | Published: January 18, 2016 12:13 AM2016-01-18T00:13:08+5:302016-01-18T00:13:08+5:30
जानेवारी उजाडला, की वेध लागतात ते अर्थसंकल्पाचे! जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढवून सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल तर विशेष उत्सुकता असते
जानेवारी उजाडला, की वेध लागतात ते अर्थसंकल्पाचे! जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढवून सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल तर विशेष उत्सुकता असते. जगभरात व्याप्त असलेली एक प्रकारची अस्वस्थता, चिनी अर्थव्यवस्थेमध्ये आलेला भूकंप, त्याचे जगभरातील अर्थव्यवस्थांना बसत असलेले हादरे, भारतात सलग तिसऱ्या वर्षी पडलेला दुष्काळ आणि सरकारने गत वर्षभरात केलेल्या विविध विकास प्रकल्प व योजनांच्या महत्त्वाकांक्षी घोषणा, या पृष्ठभूमीवर अपेक्षा आणि रुपयाची आवक व जावक यांचा ताळमेळ सरकार कसा बसविणार, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. देशात मंदीचे वातावरण आहे, हे सांगण्यासाठी कुण्या अर्थतज्ज्ञाची आवश्यकता नाही. चिनी अर्थव्यवस्थेवर जमलेल्या काळ्या ढगांमुळे त्या देशाने जगभरातील बाजारांमध्ये स्वस्त वस्तूंचा अक्षरश: पूर आणला आहे. परिणामी देशांतर्गत उद्योग संकटात सापडले आहेत. उद्योग संकटात सापडल्यामुळे नवी रोजगार निर्मिती तर सोडाच, कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबण्याची पाळी लवकरच येऊ शकते, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यात मोठी भूमिका बजावलेल्या बेरोजगार युवकांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. हा वर्ग नाराज होणे सरकारला परवडण्यासारखे नाही. स्टार्ट अप इंडिया आणि स्टॅँड अप इंडियासारख्या योजनांच्या निमित्ताने या वर्गाची भलामण करण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात रोजगार उपलब्ध होणार नाहीत, तोवर बेरोजगार युवक आणि विद्यार्थी वर्गातील अस्वस्थता वाढतीच राहील. सलग तिसऱ्या वर्षी पडलेला दुष्काळ, प्रचंड वाढलेला भांडवली खर्च, उत्पादन खर्चही भरून निघण्याची हमी न देणारी बाजार व्यवस्था आणि काही राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या शेतकरी आत्महत्त्या, यामुळे शेतकरी वर्ग बेरोजगार युवकांपेक्षाही किती तरी जास्त अस्वस्थ आहे. सरकारने किमान कृषी कर्ज माफ करून दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ती पूर्ण करायची झाल्यास अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येऊन, विकास प्रकल्पांना कात्री लावण्याची पाळी सरकारवर येऊ शकते. थोडक्यात, सरकारपुढील आव्हान खूप मोठे आहे आणि सर्वच आघाड्यांवर चित्र निराशाजनक आहे. सरकारसाठी दिलासादायक बाब एकच आहे आणि ती म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात झालेली अभूतपूर्व घसरण! केवळ त्या बळावर विविध घटकांचे समाधान करू शकणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे शिवधनुष्य सरकार कसे पेलते, हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.