वेध - ही संक्रांत कुणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 12:12 AM2017-01-12T00:12:57+5:302017-01-12T00:12:57+5:30

सांप्रतचा काळ संक्रमणाचा आहे. उंबरठ्यावर आलेली संक्रात कोणावर येईल हे काळच ठरवेल. या पार्श्वभूमीवर सलोख्याचा, सौहार्दाचा व सामंजस्याचा गोडवा वृद्धिंगत व्हावा, हीच सदिच्छा...

The perforation - the concentrated key | वेध - ही संक्रांत कुणावर

वेध - ही संक्रांत कुणावर

googlenewsNext

 मकरसंक्रांत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण संक्रांतीचे ‘उत्सवी’ वातावरण गेल्या दोन महिन्यांपासूनच अनुभवाला येत आहे. अर्थातच निवडणुका, हे त्यामागचे खरे कारण. एरवी मतदारांकडे डोळे वर करून पाहाण्याची तसदी न घेणारी नेतेमंडळी ‘खुर्ची’ डोळ््यासमोर ठेवून पक्के ‘गोडबोले’ झाले आहेत. ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ हे सांगण्याची गरजच उरली नाही इतका गोडवा सध्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्याही शब्दाशब्दांतून ओसंडून वाहतो आहे. प्रत्येकाला त्याचे इप्सित साध्य करायचे आहे. त्यासाठीच ही साखरपेरणी आहे. संक्रमण म्हणजे ओलांडून जाणे. निसर्गाच्या प्रत्येक अवस्थेत संक्रमणावस्थेला महत्त्व आहे; किंबहुना तो निसर्गाचा स्थायीभाव आहे. चिकित्सेतून नवे परिवर्तन घडूून येत असते. म्हणूनच मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. हा सण खऱ्या अर्थाने निसर्गाचा सण आहे. सूर्य मकर राशीत ज्या दिवशी प्रवेश करतो ती मकरसंक्रांत. त्या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान. हे सृष्टीतील परिवर्तन होते आणि निसर्गचक्राच्या बदलाची चाहूल लागते. हेच सूत्र मानवी जीवनालाही लागू आहे. म्हणून आपल्याकडे संक्रातीचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जीवनातही सर्व स्तरांवर संक्रमण सुरूच असते. अशाच स्थित्यंतराचे नोटाबंदी हे अगदी ताजे उदाहरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे धाडसी पाऊल म्हणजे असेच एक नवे संक्रमण आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत आणि विरोध दोन्ही बाजूने होत आहे. ते स्वाभाविकच. हे संक्रमण योग्य की अयोग्य याचे उत्तर सध्या तरी काळाच्या कुपीत बंद आहे. या निर्णयाचे जे काही पडसाद सध्या उमटत आहेत त्यावरून ही संक्रमणावस्था देशभर चर्चेला उधाण आणणारी ठरली आहे. जागतिक स्तरावरही संक्रमण सुरू आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेत उभे राहिलेले नवे नेतृत्व, इसिसच्या रुपाने अवघ्या जगापुढे उभा राहिलेला दहशतवादाचा भस्मासूर, ग्लोबल वॉर्मिंगची नवी आव्हाने या साऱ्या बाबतीत अवघे जगदेखील संक्रमणावस्थेतून जात आहे. या साऱ्या बदलांना ओलांडून पुढे जाताना शाश्वत, जागतिक व सर्वव्यापी असे मानवतेचे, मुल्यांचे व सौख्याचे वातावरण निर्माण व्हावे हीच समाजाची अपेक्षा आहे. राजकीय आघाड्यांवर तर रोजच ‘दंगल‘ सुरू आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी जी काही रणधुमाळी सुरू होती त्या राजकीय संग्रामामध्ये आक्रमण, अतिक्रमण आणि संक्रमणही प्रकर्षाने अनुभवाला आले. प्रचाराचा धुरळा उडाला आणि प्रत्यक्ष निकालात अनेक प्रस्थापितांना धक्के बसले. पुणे जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या पक्षांनाही त्यांच्या बालेकिल्ल्यातच अडकून पडावे लागले. काही ठिकाणी तर पूर्ण सत्तांतर झाले. पुणे, पिंंपरी-चिंचवड, मुंबईसह ११ महापालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, कुरघोडीचे राजकारण, वर्चस्वाची अहमहमिका पुरेपूर अनुभवायला मिळणार आहे. हे सारे संक्रमण आणि नवे बदल अपरिहार्य असले तरीही त्यातही सकारात्मकतेचा, विधायकतेचा, सामंजस्याचा गोडवा कायम असेल हे पाहायला हवे. संक्रमण सकारात्मकही असू शकते, असावे असा प्रयत्न असायला हवा. स्पर्धा संपली की हेवेदावे संपावेत, राजकारण विरघळून जावे, स्नेहवर्धन व्हावे हा खरा मकर संक्रांतीचा अर्थ आहे. आज स्वामी विवेकानंदांची जयंती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय युवक दिन देशभर साजरा होत आहे. भारत हा जगातील सर्वाधिक युवक असलेला देश आहे. त्यामुळे आजमितीला या तरुणांमधील ऊर्जा, त्यांची बुद्धिमत्ता याचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करायचा असेल तर समता, राष्ट्रवाद, भूतदया, राष्ट्रप्रेम व सर्वधर्मसमभाव ही मूल्ये जपणे व जगणे गरजेचे आहे. उद्याच्या जगाचे भवितव्य या तरुणांच्याच हाती असणार आहे. युवकांनी काळाच्या प्रवाहावर स्वार व्हायला हवे. देश घडवण्याची व परिवर्तनाची पूर्ण क्षमता त्यांच्यात आहे. सांप्रतचा काळ संक्रमणाचा आहे. ही संक्रात कोणावर येईल हे येणारा काळच ठरवेल. आक्रमणासाठी व संक्रमणासाठी राजकारणी सज्ज आहेत, पण त्यातही सलोख्याचा, सौहार्दाचा, सामंजस्याचा, विचाराचा व विवेकाचा गोडवा वृद्धिंगत होवो ही सदिच्छा.
- विजय बाविस्कर

Web Title: The perforation - the concentrated key

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.