वेध - पाण्याचा शोध,पार्डीचा बोध !
By admin | Published: May 30, 2017 12:24 AM2017-05-30T00:24:58+5:302017-05-30T00:24:58+5:30
कितीही उपाययोजना आखल्या तरी, मनुष्याची पाण्याची गरज भागविण्यास त्या अंतत:
भारतातील विविधतेचा आम्हा भारतीयांना मोठा अभिमान आहे; पण या विविधतेलाही काही धरबंध असणे गरजेचे आहे. एकीकडे आमच्या प्रसारमाध्यमांमध्ये मंगळयान, चंद्रयान, अग्नि-५, जीएसएलव्ही मार्क-३, अशा तंत्रज्ञानातील प्रगतीच्या डोळे दीपवून टाकणाऱ्या बातम्या उमटतात आणि दुसरीकडे पाणीटंचाईच्या बळींच्या बातम्याही उमटतात. विकासाच्या मापदंडाच्या दोन टोकांवरील ही विविधता खरोखरच नकोशी वाटते.
या प्रस्तावनेसाठी कारणीभूत ठरला तो बुलडाणा जिल्ह्यातील गत पंधरवड्यातील घटनाक्रम ! बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात पार्डी नावाचे छोटेसे गाव आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई या गावाच्या पाचवीलाच पुजलेली ! यावर्षी तर पाणीटंचाईने अगदी कहर केला आहे. सकाळ झाली, की गावकऱ्यांची, विशेषत: महिलांची, पाण्याच्या शोधात वणवण सुरू होते. दिनांक १९ मेच्या सकाळी सावित्री होगे ही महिला अशीच पाण्याच्या शोधात निघाली अन् एका विहिरीत तोल जाऊन मृत्युमुखी पडली.
एवढी गंभीर घटना घडूनही प्रशासनाला तिची दखल घेण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले. तोपर्यंत गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा एवढा कडेलोट झाला होता, की होगे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या जोडीला घेराव घालून, त्यांना तब्बल तीन तास उन्हात उभे राहण्यास, त्यांनी भाग पाडले. एवढेच नव्हे, तर तीन गावकऱ्यांनी त्यांच्यासमोरच गळ्यात फास अडकवून घेतला व अंगावर रॉकेल ओतून घेतले. आम्हाला पाणी द्या, अन्यथा फाशी द्या, अशी टोकाची मागणी त्यांनी केली. त्यामधील अभिनिवेश लक्षात घेतला तरी, त्यामुळे स्थितीचे गांभीर्य कमी होत नाही.
पार्डी गावात गत १५ वर्षांपासून उन्हाळ्यात टॅँकरद्वारा पाणीपुरवठा केला जातो. गावाला पाणीटंचाईपासून मुक्तता देण्यासाठी अजिबात प्रयत्नच झाले नाहीत, अशातला भाग नाही. प्रथम जलस्वराज्य योजनेत पार्डीचा समावेश करण्यात आला; पण त्यातून केवळ पाण्याच्या टाकीचे खांब तेवढे उभे झाले. टाकीचाही पत्ता नाही ! पुढे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत पार्डीचा समावेश झाला; पण या योजनेचे कामही रडतखडतच सुरू आहे. त्यामुळे पार्डीवासीयांच्या नशिबाचे भोग काही संपायला तयार नाहीत.
हे चित्र एकट्या पार्डीतील नाही. कमीअधिक फरकाने देशातील अनेक गावांचे तेच प्राक्तन आहे. एकीकडे आम्ही मंगळावर पोहोचलोय आणि दुसरीकडे आमच्या कोट्यवधी बांधवांपर्यंत पिण्याचे पाणीही पोहोचवू शकत नाही ! पूर्वी पाणीपुरवठा योजना नव्हत्या; पण प्रत्येक गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते. पाणीपुरवठा योजनांनी गावांची पाणी स्वयंपूर्णत: नष्ट केली आणि काही अपवाद वगळता बहुतांश गावांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आणली. शासनाने भूजल उपसा आणि मोठी धरणे बांधण्यास प्राधान्य दिल्याचा हा परिणाम ! भूजलाच्या अनिर्बंध उपशामुळे भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. पार्डीतील पाणीटंचाईमागचे ते प्रमुख कारण आहे. धरणांमुळे सिंचन व मोठ्या शहरांसाठी पाण्याची सोय निर्माण झाली खरी; पण त्यामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्या हिवाळ्यातच आटू लागल्या आणि परिणामी नदीकाठांवरील गावांचा हक्काचा पाणी स्रोत संपला.
पार्डीत जे घडले त्याकडे सरकारने केवळ अपघात म्हणून बघू नये. स्वातंत्र्याच्या ७०व्या वर्षातही पाण्याच्या शोधात बळी जात असतील, तर ते आपले अपयशच आहे. त्याचे खापर केवळ बदलते निसर्गचक्र, वाढती लोकसंख्या, पाण्याचा वाढता वापर इत्यादी बाबींवर फोडून चालणार नाही. सरकारी धोरणांमधील फोलपणाही तेवढाच
कारणीभूत आहे. विद्यमान सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेलाही आधीच्या योजनांप्रमाणे भ्रष्टाचाराची लागण झाली आहे. राज्यात पार्डीसारख्या आणखी घटना घडायला नको असतील, तर सरकारी धोरणांचे काटेकोर पुनरावलोकन व त्यावर आधारित उपाययोजना आत्यंतिक गरजेच्या आहेत.
- रवि टाले -