वेध - भारत विकासाची ‘हणमंत’ उडी
By admin | Published: June 1, 2017 12:13 AM2017-06-01T00:13:34+5:302017-06-01T00:13:34+5:30
‘भारत विकास ग्रुप’चे अध्यक्ष हणमंत गायकवाड समाजबांधणीसाठी आश्वासक विश्वास आणि सन्मान सेवा क्षेत्रातील तरुणांना देतात.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विजिगीषू वृत्तीने समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्यांच्या अनेक यशोगाथा आहेत. पण नावीन्याचा ध्यास घेऊन, मळलेली वाट सोडून वाटचाल करताना आपल्यासोबत अनेकांना घेऊन त्यांचे जीवनपरिवर्तन करणारे समाजात दीपस्तंभासारखे असतात. तरुणाईला प्रेरणा, ऊर्जा अन् दिशा देण्याचे काम ते करतात. बीव्हीजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘भारत विकास ग्रुप’चे अध्यक्ष हणमंत गायकवाड हे आज महाराष्ट्रातील तरुणाईचे आयकॉन झाले आहेत.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘माणूस स्वकर्मानेच स्वत:चे जीवन घडवीत असतो. आणखी कोणत्याही नियमाच्या आधीन नाही, केवळ स्वत:च्याच कर्मबंधनांनी माणूस बांधला गेला आहे.’ स्वत:ला विसरून एखाद्या कामामध्ये झोकून दिले पाहिजे, असे बरेचदा लिहिले वा बोलले जाते; पण प्रत्यक्षात झोकून देणे कशाला म्हणतात याचं जिवंत उदाहरण हणमंत गायकवाड आहेत. स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान आणि विचारांच्या प्रेरणेतून त्यांची वाटचाल सुरू आहे. आजपर्यंत सुमारे ७० हजार लोकांना रोजगार देणाऱ्या गायकवाड यांचा प्रवास साधा नव्हता. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरमधील कोर्टातील कारकुनाचा हा मुलगा. घरच्या नाजूक परिस्थितीमुळे रेल्वेस्थानकावर आंबे विकण्यापासून अनेक कामे त्यांनी केली. छोट्या खोलीत कुटुंबासमवेत राहत असताना आपल्या हुशारीने शिष्यवृत्ती मिळवीत शिक्षण पूर्ण केले. टेल्कोसारख्या कंपनीत नोकरी लागली. या संधीचे त्यांनी सोने केले. अनेक अभिनव कल्पना राबविल्या. वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले. परंतु, त्यांनी वरिष्ठांकडे स्वत:साठी काहीच मागितले नाही. परिस्थितीच्या चटक्यांची जाणीव असणाऱ्या हणमंतरावांनी बेरोजगार तरुणांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तनासाठी प्रोत्साहन मागितले. त्यातूनच ‘भारत विकास ग्रुप’ या संस्थेची स्थापना झाली. हाऊसकिपिंगचे कामही एक उद्योग होऊ शकतो, हे त्यांच्यातील द्रष्ट्या उद्योजकाने ओळखले होते. २००४मध्ये भारत विकास ग्रुपला भारतीय संसद भवनाचे हाऊसकिपिंगचे काम मिळाले. राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान कार्यालय आणि निवासस्थानापासून रेल्वेस्थानक, एअरपोर्ट, कॉर्पोरेट भवन यांसारख्या अनेक कामांनी या अभिनव व्यवसायाचा विस्तार होत गेला. महत्त्वाच्या उद्योग संस्था तसेच आळंदी, पंढरपूर, तुळजापूर आदी देवस्थानांंची हाउसकिपिंगची जबाबदारी बीव्हीजी निष्ठेने सांभाळते. स्वच्छतेच्या या कामामागे सेवाभाव आहे. विविध सेवांसाठी वेगवेगळ्या संस्थांचे जाळे उभे करण्यात आले. भारत विकास ग्रुप ही सेवा क्षेत्रातील आघाडीची संस्था बनली आहे. परंतु, तेवढ्यावर समाधान मानणे गायकवाड यांच्या उन्मेषशालिनी वृत्तीला मान्य नाही. त्यामुळे शेती उत्पादनवाढीसाठी औषधे, आरोग्यसेवा आणि वीजनिर्मिती क्षेत्रात क्रांतिकारी बदलासाठी त्यांनी दमदार पाऊल टाकले आहे. त्यांच्या संस्थेचा पुण्यात दिमाखदार रौप्यमहोत्सवी सोहळा झाला. नितीन गडकरी, शरद पवार, रघुनाथ माशेलकर, संदीप वासलेकर यांनी हणमंत गायकवाडांंच्या भरारीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. महाराष्ट्राबाहेर जाऊन यशस्वी होणाऱ्या उद्योजकांची संख्या कमी आहे. सेवा क्षेत्रातील तरुणांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षित करत माणूस म्हणून वागण्याची शिकवण गायकवाड देतात. समाजबांधणीसाठी आश्वासक विश्वास आणि सन्मान त्यांनी संपर्कात येणाऱ्यांना दिला. शेतकरी हितासाठी ‘भारत विकास गु्रप’च्या माध्यमातून त्यांनी प्लॅस्टिकचा पुनर्वापर, सौरऊर्जा तसेच शेतकऱ्यांसाठीच्या उपक्रमांसाठी घेत असलेल्या कष्टातून निर्माण झालेले विश्व अफाट आहे. हनुमानाला त्याच्या क्षमतेची जाणीव झाल्यानंतर तो समुद्र पार करून लंकेपर्यंत पोहोचला, अशी अख्यायिका आहे. त्याप्रमाणे तरुणाईत त्यांच्या क्षमतेविषयी विश्वास जागवण्याचे काम हणमंतराव करत असून, स्वयंपरिपूर्णतेकडे झेपावणारी अशी त्यांची ही ‘हणमंत उडी’ आहे. अशा व्यक्ती कर्मानंदात, कर्तव्यपूर्तीचा आनंद उपभोगत स्वत:चे व इतरांचेही जीवन सार्थकी लावतात. राष्ट्रजीवनात कर्मयोगी हणमंतरावांसारख्यांचे स्थान फार मोलाचे व मानाचे असते.
- विजय बाविस्कर