वेध - क्रिकेटमधील ‘पृथ्वी’चे प्रेमगीत

By admin | Published: January 9, 2017 12:25 AM2017-01-09T00:25:00+5:302017-01-09T00:25:00+5:30

गावसकर नावाचा सूर्य मावळत होता तेव्हा तेंडुलकर नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितिजावर उदयाला आला. तेच आवर्तन पृथ्वीच्या उदयातून जाणवू लागले आहे.

Perforation - The love of 'Prithvi' in cricket | वेध - क्रिकेटमधील ‘पृथ्वी’चे प्रेमगीत

वेध - क्रिकेटमधील ‘पृथ्वी’चे प्रेमगीत

Next

 मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी. मुंबईच्या स्टेडियमवर जाणाऱ्या पब्लिकचं पहिलं प्रेम क्रिकेटवर असतं. इथं हजेरी लावणाऱ्याला क्रिकेट अंतर्बाह्य समजतं. किंबहुना क्रिकेट हा बहुसंख्य मुंबईकरांचा बहिश्चर प्राण आहे. वैभवाचे दिवस हा मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या अभिमानाचा विषय. विजय मर्चंट ते अजित वाडेकर आणि सुनील गावसकर ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेकानेक दैवते या रसिकांनी मनोभावे पुजली. मन:पूत मिरविलीही. पण अगदी काल-परवा संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात भारत जिंकला. तरीही मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या मनाचा एक कंगोरा काजळला होता. फार वर्षांनी एक आक्रित घडलं होतं. अजिंक्य रहाणे जायबंदी झाल्यामुळे तो अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नव्हता. परिणामी मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात एकही मुंबईकर नव्हता.
एक काळ होता, जेव्हा निदान अर्धा डझन मुंबईकर भारतीय संघात असायचे. पण या सामन्यात एकही मुंबईकर खेळाडू भारतीय संघात नव्हता. मुंबईचं क्रिकेट संपलं की काय, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. इथल्या क्रिकेटरसिकांची मान खिन्न भावनेनं गुडघ्यात खुपसली गेली. हे चित्र गेल्या गुरुवारी अचानक बदललं. राजकोटमध्ये तामिळनाडू विरुद्ध मुंबई या रणजी सामन्यात अवघ्या सतरा वर्षांच्या मुंबईकरानं पदार्पणातच आक्रमक शतक ठोकून मुंबईसाठी अंतिम सामन्याचा दरवाजा उघडून दिला. रणजी करंडकाच्या सामन्यात पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत तो जाऊन बसला. लहान चणीचा, कमी उंचीचा आणि निरागस भाव असलेला बालिश चेहऱ्याचा पृथ्वी शॉ एका रात्रीत क्रिकेटविश्वातील चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला वा अपघाताने गवसलेला हिरा नाही.
सचिन आणि राहुल द्रविडला टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर बघता बघता क्रिकेटच्या, त्यातही बॅटिंगच्या प्रेमात पडलेल्या पृथ्वीची कहाणी जितकी संघर्षाची, तितकीच तळपत्या यशाची आहे. आशेचा किरण मनामनात जागविणारीही आहे. मुंबईतलं क्रिकेट पोसलं जातं, ते शालेय स्तरावर. हॅरीस आणि गाइल्स शील्डच्या आंतरशालेय स्पर्धांमधून. मुंबईतल्या क्रिकेटचं घट्ट नेटवर्क या स्पर्धांमधूनच तर विणलं जातं. सचिन, विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, प्रवीण अमरे अशा अनेकांसारखं पृथ्वीचं नाणंही बावनकशी सोन्याचं असल्याचं आधीच सिद्ध झालं होतं. तीन वर्षांपूर्वी हॅरिस शील्डच्या सामन्यात ५४६ धावांची विक्रमी खेळी करणारा पृथ्वी तेव्हा आकर्षण बिंदू बनला. त्याच्या पाठोपाठ कल्याणच्या प्रणव धनावडेनं हजार धावांची विश्वविक्रमी खेळी केली. शाळेत विक्रमी खेळी केलेल्या पृथ्वीला जेमतेम सतरा वर्षे पुरी होत असताना मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळालं. दिलीप वेंगसरकर आणि राहुल द्रविडच्या त्याच्याविषयीच्या मताचाही त्यात वाटा आहे.
प्रश्न एकट्या पृथ्वीचा नाही. श्रीमंतीचं पाठबळ नसलेली मुंबई आणि मुंबईच्या जवळपास शंभर किलोमीटरच्या पट्ट्यातील गुणवत्ताही आपल्या लायकीनुसार मिळकत करू शकते, हे चांगलं लक्षण आहे. अगदी अलीकडे श्रीलंकेत झालेल्या १९ वर्षांखालील युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पृथ्वी भारतीय संघातून खेळला. आक्रमकतेची चुणूक दाखवून गेला. राजकोटमधल्या रणजी सामन्यात पदार्पणात शतक झळकावल्यानंतर मुंबईकर क्रिकेटरसिकांना जणू नवा सचिन सापडल्याचा आनंद झाला. तो तितका कसदार आहे की नाही, अपेक्षांचे ओझे तो चिमुकल्या खांद्यावर वाहू शकेल की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत. ती मिळायची तेव्हा मिळतीलच. पण त्याच्या आगमनाने आशेला नवी पालवी फुटली आहे.
गावसकर नावाचा सूर्य मावळत होता तेव्हा तेंडुलकर नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितिजावर उदयाला आला. तेच आवर्तन पृथ्वीच्या उदयातून जाणवू लागले आहे. गुणवत्ता बावनकशी असली की तिला फार काळ झाकता येत नाही. मुंबईतल्या क्रिकेटमधल्या सोन्यासारख्या गुणवत्तेला इथल्या मातीचा सुगंध आहे. त्यातूनच मध्यंतरी निराश झालेली मुंबई नव्या उत्साहात पृथ्वीचे प्रेमगीत गुणगुणायला लागली आहे!
- चंद्रशेखर कुलकर्णी

Web Title: Perforation - The love of 'Prithvi' in cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.