परफॉर्मन्सची स्मृती
By admin | Published: February 26, 2016 04:37 AM2016-02-26T04:37:47+5:302016-02-26T04:37:47+5:30
अलीकडच्या काळात ज्यांना असाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्या सामाजिक माध्यमांमधील प्रतिक्रिया हा कोणत्याही गोष्टीच्या भले-बुरेपणाचा यथार्थ निकष मानायचा झाल्यास
अलीकडच्या काळात ज्यांना असाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्या सामाजिक माध्यमांमधील प्रतिक्रिया हा कोणत्याही गोष्टीच्या भले-बुरेपणाचा यथार्थ निकष मानायचा झाल्यास केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी संसदेत जे भाषण केले तो म्हणजे त्यांचा काही काळ स्मृतीत राहाणारा चांगला परफॉर्मन्स होता हे मान्य करावे लागेल. कारण त्यांचे भाषण हा सामाजिक माध्यमांचीच भाषा वापरायची तर एक ‘हॉट फेवर्ड’ विषय बनून राहिला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनाही या भाषणाने बरीच भुरळ पाडल्याचे दिसून आले. अर्थात स्मृती इराणी मूळच्या कलावंत असल्याने त्यांनी केलेला अभिनय उत्तम होता अशी तिरकस टीकाही काँग्रेसने केली आहे. या दोन्ही प्रतिक्रिया घटकाभर बाजूला सारल्या तरी त्यामधून काही बाबी स्पष्ट झाल्या. मागील पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनदेखील नरेन्द्र मोदी सरकारच्या दृष्टीने अडथळ्याचीच शर्यत ठरणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वार्धात कोणतीही वादग्रस्त विधेयके सादर करु नका असा इशारा काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी अगोदरच देऊन ठेवला आहे. गेल्या मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाचा प्रारंभ झाला व संसद हे गोंधळ घालून बंद पाडण्याचे नव्हे तर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे असा इशारा याच अभिभाषणात राष्ट्रपतींनी दिला होता. पण तो कोणीही फारसा मनावर घेतल्याचे निदान गेल्या दोन दिवसात तरी आढळून आले नाही. अन्य कोणतेही कामकाज न करता रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठातील बुद्धिमान विद्यार्थ्याची आत्महत्त्या आणि जेएनयुमधील काही विद्यार्थ्यांवर ठेवलेला देशद्रोहाचा आरोप याच विषयांवर चर्चा करण्याचा विरोधकांचा आग्रह होता. अंतस्थ हेतू अर्थातच स्मृती इराणी यांना अडचणीत आणण्याचा होता. सरकारने विरोधकांची मागणी मान्य केली. स्वाभाविकच त्यांनी म्हणजे काँग्रेस आणि डाव्यांनी इराणी यांच्यावर तुफानी हल्ला चढविला. परंतु या हल्ल्यास उत्तर देण्यासाठी स्मृती इराणी सरसावल्या तेव्हां मात्र बहुतेक सारे सभागृहाबाहेर निघून गेले. पण अंमळ अधिक आणि कदाचित अकारणही त्वेषाने इराणी यांनी त्यांच्यावर केलेले सारे आरोप परतवून लावले. परंतु केवळ तितकेच नव्हे तर आपल्या काही कट्टर विरोधकाना त्यांनी उघडेदेखील पाडले. वास्तविक पाहाता चर्चेचा आग्रह धरणाऱ्यांनी आणि राष्ट्रपतींचा व त्यांच्या वक्तव्यांचा आदर करतो असे सांगणाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही व स्मृती इराणी यांना अनायासेच रान मोकळे मिळाले. त्याचा त्यांनी मन:पूत वापर करुन घेतला.