वेध - वृक्षवल्ली कोणा सोयरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 12:06 AM2017-05-29T00:06:27+5:302017-05-29T00:06:27+5:30
मेट्रोच्या कामासाठी मुंबापुरीतली उणीपुरी पाच हजार झाडं कापली जाणार आहेत, म्हणे! या महानगरातली माणसंही झाडं मातीतच लावतात. पण ही माती जमिनीवर नव्हे, तर कुंडीत असते.
हाती नाही बळ, दारी नाही आड
त्याने फुलझाड, लावू नये...
प्रतिभेचे संत गदिमांनी व्यवहारे दिलेलं हे अक्षरधन आजही गैरलागू नाही. एकीकडे सुधीर मुनगंटीवारांसारखा विदर्भाच्या जंगलात वाढलेला मंत्री कोटी-कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडतो आणि दुसरीकडे शहरी विकासाच्या ‘मेट्रो’साठी नोकरशाही मुंबईतली पाच हजार झाडं तोडण्याचा प्लॅन बनवतेय. काँक्रीटच्या जंगलातला उरलासुरला प्राणवायू बंद केल्यानं काय साधणार आहे, हा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांनीच विचारायला सुरुवात केली आहे. तसं पाहिलं तर मुंबईला काही वर्षांपूर्वी एक ब्रीदवाक्य मिळालं. स्वच्छ मुंबई, हरित मुंबई! ते राजकीय राहिलं आणि कागदावरही! अर्थात १०४ चौरस कि.मी. पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग वगळला तरी उरलेल्या तीन चतुर्थांश मुंबईत आजही पूर्णत: सावलीत असलेले अनेक भाग आहेत. धरित्रीची हिरवी वसने ल्यालेल्या वस्त्या आहेत. एक काळ होता, जेव्हा वृक्षांची लागवड व्हायची. आताशा वृक्षारोपणाच्या नावाखाली लावली जाणारी झाडं इथल्या पावसात तग धरू नाही शकत. ही अल्पायुषी झाडं कधीही उन्मळून पडतात.
डॉ. होमी भाभांसारख्या द्रष्ट्या वैज्ञानिकानं संस्था उभारणीच्या आड येणारं झाड कापण्यापेक्षा आराखड्यात बदल करण्याचा मार्ग स्वीकारला. याच मुंबईत काही वर्षांपूर्वी गुडघ्यांच्या प्रत्यारोपणासाठी आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनीही एक आगळा वस्तुपाठ घालून दिला होता. झाड लावणं हा एक खराखुरा कार्यानुभव. वरकरणी वाटतं, की झाड लावणं खूप सोप्पं आहे. पुरेशी जमीन किंवा माती मिळाली की बस्स! पण म्हटलं तर जमिनीत झाड लावणं तितकंसं सोपं नाही. झाड लावायचं तर गुडघ्यात वाकावं लागतं. गुडघ्यात न वाकता जमिनीच्या जवळ जाता येत नाही. या निसर्गनियमानुसार आॅपरेशनसाठी आलेल्या अटलजींनी मुंबईत गुडघे टेकले होतेच की! वडाचं झाड लावून त्यांनी इथल्या मातीशी असलेलं बुनियादी नातं आणखी बुलंद केलं होतं. तो वटवृक्ष जगलाही. सुदैवानं त्याभोवती राजकीय व्रतवैकल्यांनी फेर नाही धरला. वटपौर्णिमेला त्याभोवती गुंडाळलेलं सूत काँग्रेसच्या चरख्यावरचं आहे का, अशी फाजील राजकीय चिकित्सा झाली नाही. तसं पाहिलं तर आपले राजकारणी असंख्य वेळा या ना त्या कारणानं वृक्षारोपण करत असतात. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांनी खूप वर्षांपूर्वी सांगितलेला अनुभव खूपच बोलका आहे. एका संस्थेनं सुधीरभाऊंना वृक्षारोपणासाठी बोलावलं होतं. संयोजकांनी या उपक्रमाबद्दल उत्साहानं माहिती देताना त्यांना आणखी माहिती पुरवली... ‘आम्ही दरवर्षी याच जागी वृक्षारोपण करतो’! म्हणूनच राजकारण्यांनी लावलेल्या रोपांतली किती जगली, याच्या खानेसुमारीच्या फंदात मुंबईकर कधी पडलेच नाहीत. एरव्ही नेहरूंपासून पवारांपर्यंत आणि बापूजींपासून रामदेवांपर्यंत कैक मंडळींनी जितकी झाडं लावली, ती सगळी जगली असती तर भारत हा कांगो खोऱ्यासारखा निबिड अरण्याचा प्रदेश झाला असता. तसं होणं अंमळ कठीणच होतं म्हणा. कारण पुढाऱ्यांच्या तळहातावरच्या उत्कर्षरेषा ठळक असल्या तरी त्यांचा अंगठा हिरवा कुठं असतो? ज्यानं लावलेलं झाड हमखास जगतं, त्याचा अंगठा हिरवा समजावा, हा निसर्गाचा थम्ब रूल! हा रूल फॉलो करायला केस पांढरे झाले तरी मन हिरवं लागतं. मुंबईवर राज्य करणाऱ्यांचं मन हिरवं आहे का, याची ‘मेट्रो’च्या निमित्तानं कसोटी लागणार आहे.
मुंबई हरित आंदोलनांसाठी प्रसिद्ध नाही. पण अलीकडच्या काळात आरे कॉलनीचा हिरवा पट्टा वाचविण्यासाठी जनमनानं आक्रोश केला. शिवाजी पार्कला केटरिंग कॉलेजच्या बाहेर रस्त्याच्या मधोमध असलेलं झाड वाचविण्यासाठीही एक छोटेखानी आंदोलन झालं होतं. त्याची व्याप्ती उत्तर प्रदेशात ४३ वर्षांपूर्वी झालेल्या ‘चिपको’ आंदोलनासारखी मोठी नव्हती. मेट्रोसाठी मुंबईच्या फुफ्फुसांचा बळी द्यायचा का, हा प्रश्न आहे. अडीच हजार झाडांची कत्तल वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांच्या प्रेरणेतून गौरादेवींसारख्या सामान्य महिलांनी झाडांना मिठी मारून ‘चिपको’ आंदोलन केले. त्यानंतर इंदिरा गांधींनी हिमालयाच्या कुशीतलं एकही झाड कापल्यावर १५ वर्षांचा निर्बंध घातला होता. मुंबईही आज अशा एखाद्या गौरादेवीच्या प्रतीक्षेत आहे. शिवाय या मुंबईला तुकोबांचं एक वचन पक्कं ठाऊक आहे...
दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी,
माफी नाही तरी। शिक्षेतुनी।।
हे नोकरशहा समजून घेतील का, एवढाच प्रश्न आहे!
- चंद्रशेखर कुलकर्णी-