पेशावर घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते!

By admin | Published: December 22, 2014 05:43 AM2014-12-22T05:43:39+5:302014-12-22T05:43:39+5:30

पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कृूलमध्ये निरपराध मुलांचे जे हत्याकांड झाले ते या भागातील अखेरचे हत्याकांड असेल असे समजण्याचे कारण नाही.

Peshawar incident can be repeated! | पेशावर घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते!

पेशावर घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते!

Next

विजय दर्डा ;लोकमत पत्र समूहाचे चेअरमन

पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कृूलमध्ये निरपराध मुलांचे जे हत्याकांड झाले ते या भागातील अखेरचे हत्याकांड असेल असे समजण्याचे कारण नाही. आपल्याला आवडो की नाआवडो पण या भागात दहशतवादाची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत हे मान्य करावेच लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायला हवी ती ही, की हा विषय ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ किंवा भारत विरुद्ध पाकिस्तान या तऱ्हेचा नाही. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगायला हवे, की नवी दिल्लीपासून मुंबई, कोलकाता किंवा चेन्नई ही शहरे जितकी दूर आहेत, त्यापेक्षा कमी अंतरावर (८०० कि.मी.) पेशावर हे शहर आहे! दहशतवादी कृत्ये ही नेहमीच अमानवी असतात. पण या कृत्याने अमानवी वर्तनाची सीमा ओलांडली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांवर हा योजनाबद्ध राक्षसी हल्ला होता. या पवित्र युद्धात शालेय मुलांवर हल्ला करून त्यांना मारून टाकणाऱ्या लोकांची मानसिकता समजून घेणे कठीण आहे. त्यांच्या अशा कृत्याबद्दल बक्षिसी म्हणून जन्नतमध्ये त्यांना स्थान मिळेल, हे कसे शक्य आहे? पण पाकिस्तानातील मुल्ला-मौलवींनी या तऱ्हेच्या हल्ल्याचे समर्थन केले असून, त्याचा दोष भारत आणि अमेरिकेवर ठेवला आहे. या तऱ्हेचे राक्षसी कृत्य करणारे स्वत:ला तेहरिक-ए-पाकिस्तानी तालिबान म्हणवून घेतात. त्याचा अर्थ पाकिस्तानातील विद्यार्थी चळवळ. तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो.
त्या भीषण घटनेनंतर प्रत्येक विचारवंताने पाकिस्तानी प्रश्नाचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्या प्रश्नाचे उत्तर आपापल्या पद्धतीने शोधले आहे. हा विषय गुंतागुंतीचा आहे हे कुणीही नाकारत नाही. त्यामुळे त्यासाठी सोपा आणि अंतिम असा उपायही नाही. वास्तविक ही पाकिस्तानच्या आत्म्यासाठीची आणि एक आधुनिक राष्ट्र या नात्याने पाकिस्तानच्या संकल्पनेची लढाई आहे. ही अस्तित्वाची लढाई पाकिस्तानी जनतेला आपल्या देशातील लोकांशी लढा देऊन जिंकायची आहे. या लढाईचे वेगळेपण हे आहे की, एक मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तानला जगातील सर्व राष्ट्रांचे समर्थन लाभले आहे. यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा तालिबानच्या हल्ल्याला धीराने तोंड देणाऱ्या पाकिस्तानी मलालाला मिळाल्यामुळे जगाकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या समर्थनाचा प्रत्यय आला आहे.
भारतानेदेखील पेशावर येथील विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. आपल्या देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी हा पाठिंबा विविधप्रकारे व्यक्त केला आहे. शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शांतता पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांची मने दु:खाने आणि या शोकांतिकेविषयी वाटणाऱ्या असहायतेने भरलेली होती. अशातऱ्हेच्या घटनेमध्ये पहिल्यांदाच पेशावरच्या १४८ मुलांचा मृत्यू झाला अशी स्थिती नाही. यापूर्वीदेखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी एक पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान या पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ होण्याच्या तयारीत असताना मारल्या गेल्याची आहे. त्याच हल्ल्यात आणखी १०० निरपराध लोक मारले गेले होते. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात चर्चवर, पोलिओविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या विचारसरणीशी सहमत न होणाऱ्या अनेकांवर हल्ले केले आहेत.
वस्तुस्थिती ही आहे, की पाकिस्तानातील ६० हजार लोक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत पण हे मृत्यू दहशतवादी कृत्यामुळे घडलेले आहेत हे मान्य करायला जग तयार नाही. कारण दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तान काहीही करताना दिसत नाही. पेशावरच्या हत्याकांडाला ४८ तास उलटले नाहीत तोच, आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अखेरचा दहशतवादी संपेपर्यंत दहशतवादाविरुद्धचा लढा सुरू राहील अशी घोषणा केल्या केल्याच मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकी-उर-रहमान लखावी याची सुटका न्यायालयाने जमानतीवर केली. त्याचे कारण भारताने हल्ल्यातील लखावीच्या सहभागाचे पुरेसे पुरावे दिले नाहीत असे देण्यात आले. सुदैवाने पाकिस्तानने परिस्थिती लक्षात घेऊन आणि भारताने निषेध व्यक्त केल्यावर लखावीला पुन्हा तीन महिन्यांसाठी तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले. यावरून पाकिस्तानचे सत्ताधीश हे अनेक पिढ्यांपासून इतरांना दुखावण्याचेच काम करीत आलेले आहेत असे दिसून येते. तसे करताना पाकिस्तानी जनतेलाही आपण दुखावत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही. १९७१ साली पाकिस्तानचे विभाजन झाले तेव्हाही पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात भारत दखल देत आहे असेच तेथील सत्ताधीशांना वाटत होते. पण पूर्व पाकिस्तानातील बंगाली मुस्लिमांच्या भावना पश्चिम पाकिस्तानातील लोकांनी कधीही विचारात घेतल्या नाही. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. त्या वेळी पाकिस्तानने लोकशाही संकल्पनांची पायमल्ली केली होती. पश्चिम पाकिस्तानातील लष्करी अधिकारी, राजकारणी आणि सत्ताधीश यांनी बंगाली मुस्लिमांच्या अपेक्षांचा जर विचार केला असता तर बांगलादेशची निर्मिती झालीच नसती, तसेच भारताला हजारो जखमा कराव्या लागल्या नसत्या. ४३ वर्षांपूर्वी १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या सैन्याला ढाका येथे भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करावी लागली होती. त्याच दिवशी पेशावरची घटना घडली हे विसरता येणार नाही. पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांची ऐतिहासिक घटनांविषयीची मानसिकता कशी विपरीत आहे हेच यावरून दिसून येते.
तालिबानच्या संदर्भात बोलताना क्रिकेटमधून राजकारणात आलेल्या इम्रानखान यांनीदेखील तालिबानी हे अमेरिकेच्या विरुद्ध लढत आहेत, असे मत व्यक्त केले आहे आणि त्यामुळे सरकारने त्यांचे समर्थन करायला हवे असे म्हटले आहे. त्यामुळे ते ‘तालिबानखान’ म्हणून ओळखले जातात. सरकारशी चर्चा करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेहेरिके-तालिबान-पाकिस्तान संघटना स्वत:चा प्रतिनिधी म्हणून इम्रानखान यांची निवड करीत असते. इम्रानखान यांनी अशा चर्चेत कधी भाग घेतला नाही, पण त्यामुळे एकूण परिस्थितीची जटिलता लक्षात येते. लष्कराच्या अनेक अधिकाऱ्यांनी तालिबानच्या उद्दिष्टांचे समर्थन केले आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचाही त्यांनी पुरस्कार केलेला आहे. काश्मीरच्या वादामुळे दहशतवाद्यांना दुसरा मार्गच उरलेला नाही असे या जनरलना वाटते. पेशावरचे हत्याकांड हे यातऱ्हेचे अखेरचे दहशतवादी हत्याकांड असेल असे न वाटण्याची काही कारणे आहेत. गेल्या ६७ वर्षांत पाकिस्तानने स्वत:शीच समझौता करण्याची परिपक्वता दाखविलेली नाही. त्यामुळे भारताला दुखावत राहण्यातच त्यांना समाधान वाटते. त्याबाबतीत ते बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाले आहेत. पण तसे करताना त्यांनी स्वत:चे राष्ट्र उभारण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. आधुनिक मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तान उभे राहू शकलेले नाही. वास्तविक पाकिस्तानची तशी क्षमता आहे. त्यांनी आपल्या देशातील महिलांचे सबलीकरण करायला हवे. मुलांना शिक्षण द्यायला हवे आणि एक शांततावादी राष्ट्र म्हणून वाटचाल करायला हवी. हे ध्येय साध्य करण्याचा मार्ग आपल्याला गवसला आहे याचे प्रत्यंतर सध्याच्या पाकिस्तानी नेत्यांना देता आलेले नाही. आता मात्र ते दहशतवाद्याशी लढा देण्याच्या गोष्टी करीत आहेत. इन्शाल्ला, तो मार्ग त्यांना सापडावा!
अखेर ----
नथुराम गोडसे यांचे पुतळे उभारण्याचे हिंदू महासभेने ठरवले आहे. महात्मा गांधींच्या हत्येबद्दल ते कशासाठी आनंद व्यक्त करीत आहेत? त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील बांधव आपल्या सकाळच्या प्रार्थनेतून गांधींचे नाव वगळून त्या जागी गोडसे यांचे नाव टाकणार आहेत काय?

Web Title: Peshawar incident can be repeated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.