‘ल’ची पाकळी, ‘श’ची दांडी... हे काय आता?

By संदीप प्रधान | Published: November 16, 2022 10:35 AM2022-11-16T10:35:16+5:302022-11-16T10:36:15+5:30

हिंदीचे अतिक्रमण झुगारून ‘श’ आणि ‘ल’ ही अक्षरे मूळ मराठी वर्णमालेनुसार लिहिण्याचा सरकारी हट्ट खरेच गरजेचा आहे का?

Petal of 'L', stem of 'Sh'... What is this now? | ‘ल’ची पाकळी, ‘श’ची दांडी... हे काय आता?

‘ल’ची पाकळी, ‘श’ची दांडी... हे काय आता?

googlenewsNext

- संदीप प्रधान
मराठी लेखनात ‘श’ आणि ‘ल’ ही अक्षरे मूळ मराठी वर्णमालेनुसार लिहिण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था गेली १३ वर्षे याकरिता लढा देत होते. त्यामुळे आता यापुढे हिंदी भाषेतील ‘ल’ व ‘श’चे अतिक्रमण संपुष्टात येऊन पाकळीचा ‘ल’ व दांडीचा ‘श’ तुमच्या संगणकात, मोबाइलमध्ये आणि पुस्तकात उमटायला लागेल. (या घडीला तमाम मराठी माणसाच्या आयुष्यातील ल व श कसा बदलणार हे दाखवायची सोय सध्याच्या संगणकीय लिपीत नाही.) तूर्त आपण वापरत असलेले युनिकोड हे देशात मराठीपेक्षा अधिक लिहिल्या जाणाऱ्या हिंदी भाषेकरिता तयार केले असल्याने आपण वर्षानुवर्षे हिंदीतील ‘श’ व ‘ल’चे अतिक्रमण सहन करीत होतो. आणखी एक अक्षर म्हणजे ‘ख’ हेही हिंदीतील आहे. आपल्या मराठीतील ‘ख’मध्ये ‘र’ आणि ‘व’ हे वेगवेगळे लिहिले जात होते. हिंदी भाषेत ‘र’ हा ‘व’ ला जोडून ‘ख’ लिहिण्याची पद्धत असल्याने आपणही हा ‘ख’ खळखळ न करता स्वीकारला. मराठी भाषेच्या अभ्यासकांच्या मतानुसार, हिंदीमधील श, ल व ख आपण स्वीकारले त्याला बरीच वर्षे झाली. एका विशिष्ट पिढीत ‘ल’ हा पाकळीचाच तर ‘श’ हा दांडीचाच शिकवला जात होता. परंतु ‘श’ ची दांडी केव्हा गुल झाली आणि मराठीतील ‘श’ यापुढे न वापरता हिंदीतील गाठीचा ‘श’ वापरण्याची खूणगाठ आपण कधी मनाशी बांधली तेही अनेकांना आता आठवत नाही. त्यामुळे एकाच घरातील वडील आणि मुलगा, वयात अंतर असलेले थोरला व धाकटा भाऊ हे ‘ल’ व ‘श’ वेगवेगळ्या पद्धतीने लिहीत होते. मात्र, यातून कौटुंबिक अक्षरकलह माजल्याचे एकही उदाहरण नाही.

मराठी भाषेच्या हितरक्षणार्थ गेली पाच दशके डोळ्यात तेल घालून जागल्यासारखी असलेल्या शिवसेनेच्या नजरेतून हे ‘ल’ व ‘श’वरील हिंदीचे आक्रमण कसे सुटले याचे आश्चर्य वाटते. शिवसेनेच्या वाघाने तेव्हाच डरकाळी फोडली असती तर गाठीचा ‘श’ गाठोडं बांधून पुन्हा उत्तरेच्या दिशेने पळाला असता. बरं गेली १३ वर्षे साहित्य महामंडळ व मराठी भाषा विकास संस्थेमधील ढुढ्ढाचार्य महाराष्ट्रातील मराठी सरकारकडे केवळ दोन अक्षरे बदलण्याकरिता झुंज देत होते व तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मावळ्यांना त्याची गंधवार्ता लागली नाही, हेही धक्कादायक आहे. अन्यथा ‘ल’ पाकळीवाला करण्याकरिता खळ्ळ् खट्याक करून या पक्षाने केव्हाच ‘ल’च्या ललाटीचे भोग संपवले असते. दिल्लीतील म्हणजे हिंदीचा पगडा असणाऱ्या देशाच्या राजधानीतील महाशक्तीने घडवलेल्या राज्यातील सत्तांतरानंतर आलेल्या सरकारने शिवसेनेला जे ‘करून दाखवता’ आले नाही ते मराठी अक्षरांच्याबाबत करून दाखवले, यावरून श्रेयवादाची लढाई अद्याप कशी रंगली नाही हेही अचंबित करणारे आहे. परंतु आता तरी हे बदल व्हावेत, अशी अपेक्षा आहे. अर्थात याबाबत वेगवेगळी मत-मतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते अक्षरांमधील हे बदल गोंधळ वाढवणारे आहेत. वर्षानुवर्षे अक्षरे लिहिण्याची एक विशिष्ट सवय आपल्याला लागली असून, ती लागलीच बदलणे शक्य नाही.

भाषातज्ज्ञ गणेश देवी सांगतात की, मुद्रित माध्यमांची सुरुवात झाल्यावर अनेक अक्षरांचे वळण बदलले. तंत्रज्ञान जसे बदलते तसे अक्षरे बदलतात. लिखाण ही भाषेची छबी आहे. त्यामुळे भाषेवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष बदल होत नाही. ऐकलेल्या शब्दांच्या स्मृती माणसाच्या मेंदूत नोंदलेल्या असतात. आपण जेव्हा वाचतो तेव्हा अक्षरे कशीही असली तरी मेंदूत बसलेला अर्थ आपल्या मनात उतरतो. लिपी सुधारणेमुळे भाषेवरील बंधने येत नाहीत किंवा सैल होत नाहीत. व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना वाटते की, ‘श’ व ‘ल’ ही अक्षरे दोन्ही पद्धतीने लिहिली तरी फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो छपाई करताना. छपाई करताना मराठीतील ‘ल’ व ‘श’ लिहिण्याचा आग्रह योग्य आहे. इंंग्रजीतील ‘एल’ हे अक्षर आपण केवळ एक दांडी काढूून लिहितो किंवा ‘एल’ कॅपिटलमध्ये लिहितो. दोन्हीमधून आपल्याला एकच अर्थ जाणवतो. तेच ‘ल’च्या बाबत आहे, असे शेख सांगतात.

मराठीच्या प्राध्यापिका व लेखिका शिरीन कुलकर्णी म्हणतात, अक्षरांमधील बदलांपेक्षा मराठी शब्दांचा चुकीचा वापर हे भाषेपुढील आव्हान आहे. ‘आव्हान’ व ‘आवाहन’ या शब्दांमधील चॅलेंज व विनवणी हा कमालीचा टोकाचा फरक अनेकजण लिहिताना दुर्लक्षित करतात. मराठीमधील अक्षरे बदलण्यापेक्षा शुद्ध, नेमकी मराठी अधिकाधिक कशी बोलली, लिहिली व वाचली जाईल याकरिता प्रयत्न करायला हवेत.

‘ल’ व ‘श’मधील हे क्रांतिकारक बदल राजकीय श्रेयवादापासून व सोशल मीडियावरील काथ्याकुटापासून दूर राहण्याचे कारण हेच आहे की, आता पाकळीचा ‘ल’ व दांडीचा ‘श’ गिरवायला विद्यार्थ्यांखेरीज कुणी पेन अथवा पेन्सील हातात धरत नाही. मोबाइलच्या समोर बसून बोलले तरी अक्षरे टाईप होतात. स्क्रीनवर उमटलेला ‘ल’ व ‘श’ कसा आहे हे न पाहताच फॉरवर्ड करण्याची घाई साऱ्यांना इतकी झालेली असते की, एखादा शब्द पूर्णत: ‘दिव्यांग’ लिहिला गेलेला असेल तरी ‘भावना पोहोचली ना,’ यावर माणसे समाधान मानतात. इंग्रजीतही ‘थँक यू’ ऐवजी केवळ (टीवाय) तर ‘टॉक टू यू लेटर’ ऐवजी (टीटीवायएल) लिहिले जाते. मराठी भाषेच्या हितरक्षणाकरिता झटणाऱ्या या अक्षरप्रेमींचा मराठी घरातील तरुण पिढीचा हात सुटून ते दोघे प्रवाहाच्या वेगात किती दूर फेकले गेले आहेत, नाही का?
sandeep.pradhan@lokmat.com

Web Title: Petal of 'L', stem of 'Sh'... What is this now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी