पेट्रोल आणखी महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 06:35 AM2018-09-17T06:35:17+5:302018-09-17T06:36:32+5:30
इराणचा तेलपुरवठा एकाएकी बंद झाला तर भारतातल्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आणखी किती वाढतील ही या देशाची खरी चिंता आहे.
इराणची संपूर्ण नाकेबंदी करण्याच्या हेतूने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या देशावर आर्थिक व लष्करी अशा सर्व तऱ्हेचा बहिष्कार घालण्याचा इशारा जगाला दिला आहे. जगातले जे देश तो मान्य करणार नाहीत त्यांच्याशी अमेरिकाही यापुढे कोणता व्यवहार करणार नाही, अशी धमकीही त्यावर त्यांनी दिली आहे. भारताला लागणारे सगळे पेट्रोलियम पदार्थ भारतइराण, इराक व सौदी अरेबिया या देशांतून मागवतो. अमेरिकेच्या धमकीपायी भारताने इराणमधून मागवायच्या पेट्रोलियम पदार्थांवर याआधीच मोठे निर्बंध लादले आहेत. देशातील जनतेला पेट्रोल व डिझेलसारख्या जीवनावश्यक बाबी आज ज्या महागड्या दराने खरेदी कराव्या लागतात त्याचे एक महत्त्वाचे कारणही हे आहे. अमेरिकेने आपल्या नव्या धमकीत आॅक्टोबरची अखेरची तारीख आपल्या निर्देशाच्या अंमलबजावणीची अखेरची तारीख असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तोपर्यंत इराणमधून बोलाविले जाणारे पेट्रोलियम पदार्थ थांबविले नाहीत तर तो देश भारताचीही आर्थिक नाकेबंदी करील व ती आपल्यासारख्या गरजू व आयातीवर अवलंबून असणाऱ्या देशाला जराही परवडणारी असणार नाही. अध्यक्ष ट्रम्प हे आपल्या चमत्कारिक स्वभावाने त्यांच्याही देशात आपली लोकप्रियता गमावून बसलेले पुढारी आहेत. मात्र त्यांना आपल्या लोकप्रियतेची पर्वा नाही. आपल्या धोरणामुळे आपली आर्थिक स्थिती उंचावत आहे व देशात नव्या नोकऱ्या निर्माण होत आहेत या एका यशावर त्यांच्या राजकारणाची सारी मदार आता उभी आहे. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत मध्यावधी निवडणुका व्हायच्या आहेत. त्या निवडणुकीत त्या देशाच्या विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह व सिनेट या वरिष्ठ सभागृहातील एकतृतीयांश सभासद निवडले जाणार आहेत. जाणकारांच्या मते या निवडणुकीत ट्रम्प यांचा पक्ष पराभूत होण्याची शक्यता मोठी आहे. मात्र निवडणुकीतील शक्यता जेवढ्या विश्वसनीय असतात तेवढीच ही शक्यताही विश्वसनीय समजावी अशी आहे. खरा पेच अमेरिकेसमोरचा नाही. अमेरिकेसमोरचे ते आव्हानही नाही. खरे आव्हान भारतासारख्या गरजू देशांसमोर आहे. इराणचा तेलपुरवठा एकाएकी बंद झाला तर भारतातल्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आणखी किती वाढतील ही या देशाची खरी चिंता आहे. त्यातून सौदी अरेबिया आणि इराक हे दोन्ही देश पूर्णपणे अमेरिकेच्या धोरणानुसार वागणारे आहेत. आपली आर्थिक घडी उंचावण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प या देशांनाही त्यांच्या इच्छेप्रमाणे वाकवणार नाहीतच याची खात्री कुणी देत नाहीत. इराणची स्थिती यात अतिशय वाईट आहे. एकेकाळी तेलाच्या उत्पादनावर जगात फार वरच्या क्रमांकावर गेलेली त्याची अर्थव्यवस्था आता पार रसातळाला गेली आहे. या स्थितीत अमेरिकेने त्याच्यावर हे निर्बंध लादले आहेत. त्या निर्बंधांचा परिणाम त्या देशाशी आर्थिक संबंध राखणाऱ्या अन्य देशांवरही होणार आहे आणि भारत अशा देशांपैकी एक आहे. जगभरच्या सगळ्या युद्धयंत्रणा व औद्योगिक सामग्री यांचे चलन या तेलाच्या भरवशावर चालणारे आहे. त्यामुळे रशिया व चीन हे बलशाली देश तेलाचे उत्पादक असतानाही आपल्या देशात होणारे तेलाचे उत्पन्न अपुरे म्हणून ते मध्य आशियाई देशांवर अवलंबून आहेत. अमेरिकेच्या धमकीमुळे त्यांच्यासमोरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या तेढीतून मार्ग कसा काढावा यासाठी पाश्चात्त्य देश व संयुक्त राष्ट्रसंघटना यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची मग्रुरी अशी की ते यापैकी कुणाचेही ऐकायला राजी नाहीत. जॉन मॅकेन या नुकत्याच दिवंगत झालेल्या लोकप्रिय सिनेटरने तर ‘माझ्या अंत्ययात्रेला ट्रम्प याने येऊ नये’ अशी सूचनाच जारी केली होती. मात्र यातल्या कशाचाही ट्रम्पवर परिणाम नाही. सबब अमेरिकेची धमकी कायम आहे आणि तिचा अंमल सुरूही होणार आहे. या स्थितीत भारतातील डिझेल आणि पेट्रोलच्या किमती आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि त्यासाठी देशाने तयार राहिले पाहिजे.