सौंदर्यवादी साहित्याचे ‘फडके युग’
By विजय दर्डा | Published: August 3, 2018 02:53 AM2018-08-03T02:53:33+5:302018-08-03T02:54:35+5:30
लघुनिबंधकार, कथाकार, कादंबरीकार, ना. सी. फडके यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कन्या गीतांजली जोशी ‘साहित्यगंगेच्या काठी’ हा कार्यक्रम पुण्यात ४ आॅगस्टला सादर करत आहेत. त्यानिमित्त...
-विजय बाविस्कर
लघुनिबंधकार, कथाकार, कादंबरीकार, ना. सी. फडके यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कन्या गीतांजली जोशी ‘साहित्यगंगेच्या काठी’ हा कार्यक्रम पुण्यात ४ आॅगस्टला सादर करत आहेत. त्यानिमित्त...
लोकप्रिय कादंबरीकार, सौंदर्यवादी साहित्यिक, नारायण सीताराम ऊर्फआप्पासाहेब फडके यांचा जीवनपट विविधरंगी होता. तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे नामवंत प्राध्यापक असलेल्या फडके यांचा जीवनाकडे, कलेकडे व साहित्याकडे पाहण्याचा स्वत:चा असा खास दृष्टिकोन होता.
सन १९०४ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी पुण्यात आलेल्या फडक्यांचे शिक्षण पुण्यात झाले अन् नोकरीनिमित्त ते कोल्हापूरमध्ये स्थिरावले. राजाराम महाविद्यालयात दोन तपे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. सन १९१२ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली; परंतु ती लिहिल्यावरही आपण साहित्यिक होणार आहोत अशी त्यांची भावना नव्हती. सन १९१६ मध्ये ‘अल्ला हो अकबर’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर आणि थोडीफार गाजल्यावरदेखील साहित्यिक होण्याची इच्छा त्यांच्या हृदयात उगम पावली नव्हती. पुढे ‘जादूगार’ आणि ‘दौलत’ या दोन कादंबऱ्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी ‘हरिभाऊ आपट्यांनंतर एक नवा कादंबरीकार महाराष्ट्राला मिळाला आहे,’ असं वाचक म्हणू लागले.
‘ललित साहित्याची दौलत उधळणारे जादूगार’ अशा शब्दांत बेळगाव येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना शि.म. परांजपे यांनी त्यांचा गौरव केला. मग मात्र साहित्य क्षेत्रात अलौकिक कामगिरी करून दाखविण्याचं जीवितकार्य मानून त्यांनी साहित्यिक होण्याचं ध्येय ठेवलं. त्यानंतर १९७८ पर्यंत ते सतत लिहीतच राहिले. त्यातून ७४ कादंबºया, २७ लघुकथासंग्रह, ७ नाटके, २२ समीक्षणात्मक लेखसंग्रह आणि ८ चरित्रे असा प्रचंड पसारा उभा राहिला.
मराठीतील पहिले कथाकार मानले गेलेल्या फडके यांनी लघुकथा आणि समीक्षेच्या क्षेत्रात विशिष्ट परिभाषा रूढ केली. त्यांनी केवळ विवेचन केले नाही, तर तंत्रवाद आणि कलेकरिता कला याबाबत निश्चित अशा भूमिका घेतल्या. आपल्या कथांना आकर्षक शीर्षक देणाºया फडके यांनी वाचकांसमोर उत्तम दर्जाचा आदर्श निर्माण केला. मराठी कादंबरीला त्यांनी बांधेसूद, आधुनिक व तंत्रशुद्ध रूप दिले. विशेषत: बोलीभाषेला जवळची सुटसुटीत, सोपी भाषा दिली. महाराष्टÑातील तत्कालीन महत्त्वाच्या घटना, चळवळी व विचारप्रणालीचा त्यांनी आपल्या कादंबरी लेखनासाठी उपयोग केला व स्वत:ला काळाच्या मागे पडू दिले नाही. लघुनिबंध या पाश्चात्त्यशैलीतले लेखन त्यांनी जाणीवपूर्वक मराठीत वाढवले. मराठी साहित्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यामागे होता.
शैलीदार, श्रवणीय, निरुपमेय आनंद देणारा वक्ता म्हणूनही ना.सी. फडके यांनी लौकिक कमावला. त्यांचे अमोघ वक्तृत्व हे मैफलीचा आनंद देणारे होते. असे असले तरी वाङ्मयचौर्य तसेच लेखनातील काहीसे एकसुरीपण
अशा टीका त्यांच्यावर होत गेल्या. त्यांचे प्रेमविषयक चिंतन उथळ व ठरावीक ठशाचे असले, तरी त्यांच्या लेखनशैलीची सहजता
व रुचिर सौंदर्यदृष्टी यामुळे हे चित्रण वाचकांना आकर्षक वाटत असे. आपल्या लेखनातून
वसंत फुलविणारा युगप्रवर्तक साहित्यिक
म्हणून वाचकांच्या मनात त्यांचे एक स्थान निर्माण झाले आणि मराठी साहित्यातील
एका कालखंडाची ‘फडके युग’ म्हणून नोंद घेतली गेली.