Corona Vaccination: तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:12 AM2021-03-02T06:12:13+5:302021-03-02T06:12:26+5:30
कुठली लस चांगली याचे उत्तर “जी उपलब्ध आहे ती” एवढे सोपे आहे. म्हणून “कुठली घ्यावी” यापेक्षा “लस घ्यावी” हेच महत्त्वाचे !
- डॉ. अमोल अन्नदाते, आरोग्य व सामाजिक
प्रश्नांचे विश्लेषक
कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरू झाला असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या अनुभवांवरून हा टप्पा जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य व शासन, प्रशासन अशा सर्व पातळ्यांवर काही सुधारणा आवश्यक आहेत.
साठीच्या पुढे व इतर आजारांसह पंचेचाळीशीच्या पुढे असलेल्यांचे लसीकरण आता सुरू झाले असले, तरी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला टप्पा अजून अपूर्ण आहे. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या संख्येपैकी केवळ ५० टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही. दुष्परिणामांची भीती व लस घेऊनही कोरोनाची लागण होते या दोन गैरसमजांमुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर नैसर्गिक कारणांमुळे झालेले मृत्यू व दुष्परिणामांचे संबंधही लसीशी जोडण्यात आल्याने काही आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकडे पाठ फिरवली. लस पूर्णपणे सुरक्षित आहे व एक दिवसासाठी अंगदुखी, थोडा ताप, थकवा हे तुरळक परिणाम सोडता लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे जीवघेण्या दुष्परिणामांची कुठलीही शक्यता मनात न आणता सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.
लसीकरणासाठी जाताना प्रत्येकाने आणखी एकाला लसीकरणासाठी प्रेरित करणे, त्याला सोबत घेऊन जाणे, त्याच्या मनात शंका असतील तर त्या दूर करणे हा सध्या देशसेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास काहीजण उत्सुक नव्हते. दोन डोस शिवाय पूर्ण प्रतिकारशक्ती येणे शक्य नाही. दुसरा डोस न घेणे म्हणजे पहिला डोस वाया घालवण्यासारखे आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसची तारीख चुकवून ती उद्यावर ढकललेल्यांचे लसीकरण इच्छा असूनही चालढकल केल्यामुळे राहून गेले असे पहिल्या टप्प्यातले निरीक्षण आहे. आपल्याला ठरवून दिलेल्या दिवशी लस घेणे हे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे प्राधान्य आहे असे ठरवून सकाळच्या सत्रातच लस घेण्याचा निश्चय करावा. एखाद्या साथीच्या रोगावर मात करायची असते तेव्हा कमी वेळात जास्त लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक असते. सध्या देशातील केवळ ०.६ टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग संथ आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना लसीकरण बंद ठेवून चालणार नाही. शासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या हालचाली तेव्हाच होतील जेव्हा लसीकरण केंद्रावर मागणी वाढेल. म्हणून आपल्याला ठरवून दिलेली तारीख न चुकविणे गरजेचे आहे.
पहिल्या टप्प्यातील बॅक लॉग पाहता प्रत्येक टप्प्यावर असाच लस न घेणाऱ्यांचा बॅक लॉग राहिला तर लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी म्हणजे कळप/सामूहिक प्रतिकारशक्तीच्या मुख्य हेतूपासून आपण वंचित राहू व सर्व मुसळ केरात जाईल. म्हणूनच प्रत्येकाने आरोग्य साक्षरता दाखवत साथ रोखण्यासाठीची इच्छाशक्ती सिद्ध करण्याची ही वेळ आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांनी विचलित होण्याची गरज नाही. लस ही आजारासाठी कवच कुंडले आहेत, पण तो काही अमरत्व देणारा अमृत कलश नाही. म्हणून इतर प्रतिबंधक उपायांचे महत्त्व याने कमी होत नाही. लस घेतल्यावर कोरोनासंसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. झाला तरी तो गंभीर स्वरूपाचा नसेल. म्हणजेच लसीचे मुख्य ध्येय हे मृत्यू टाळणे हे आहे हे समजून घ्यावे.
कुठली लस चांगली याचे उत्तर “जी उपलब्ध आहे ती” एवढे सोपे आहे. दोन्ही लसी शासनाने सखोल वैज्ञानिक चिकित्सेअंति उपलब्ध केल्या आहेत म्हणून “कुठली घ्यावी” यापेक्षा “लस घ्यावी” हेच सध्या प्राधान्य असले पाहिजे.
शासनाने लसीकरण धोरणात काही बदल केला तर लसीची परिणामकारकता वाढवता येऊ शकते. सध्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ५६ टक्के प्रतिकारशक्ती मिळणार आहे. हे अंतर जर ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवले तर लसीची परिणामकारकता ८० टक्केपर्यंत वाढू शकते. तसे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेनेही दिले आहेत.
म्हणून पहिला डोस घेणाऱ्यांना चार आठवड्यांनी दुसरा डोस देण्यापेक्षा तो इतर लस न मिळालेल्यांना पहिला डोस म्हणून देता येईल (या धोरण सुधारण्यासाठी सूचना आहेत, पण सर्वसामान्यांनी ठरवून दिलेल्या दिवशी म्हणजे चार आठवड्यांच्या अंतरानेच दुसरा डोस घ्यायचा आहे)
दुसरा डोस लांबविण्याचा शासकीय पातळीवर फायदा असा होईल की पहिल्या डोस नंतरही काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होतेच व जास्तीत जास्त जनतेला कमी वेळात पहिला डोस मिळाला तर संसर्गाचे प्रमाण, मृत्युदर व दुसऱ्या लाटेची शक्यता अशा अनेक गोष्टी कमी होतील. दुसरा डोस लांबल्याने प्रतिकारशक्तीही जास्त प्रमाणात निर्माण होईल.
दुसरा डोस लांबवून पल्स पोलिओच्या धर्तीवर जास्तीत जास्त लोकांना कमी वेळात पहिला डोस देण्याचा विक्रम प्रस्थापित करणे हा हर्ड इम्युनिटीसाठीचा राजमार्ग ठरू शकतो. यासाठी निश्चित काळ निर्धारित करून देशात उपलब्ध असलेले ८ लाख डॉक्टर व २० ते २५ लाख आरोग्य कर्मचारी सरकारच्या एका हाकेवर हे शिवधनुष्य नक्कीच पेलून धरतील.
फ्रान्समध्ये आधी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना एकच डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आधी संसर्ग झाल्याने त्यांच्यासाठी पहिला डोस हा काही प्रमाणात दुसऱ्या बुस्टर डोससारखा काम करण्याची वैज्ञानिक शक्यता आहे. याचाही हेतू जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस कमी वेळात देण्याचाच आहे.
लसीकरण धोरण राबविताना आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या, कमी मनुष्यबळ असलेल्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील जनता कोविन ॲपवर नोंदणी व प्रवास करून गावातून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात येईल ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. अगदी गंभीर आजारासाठीही तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आर्थिक व मानसिक क्षमता नसलेल्या ‘नाही रे’ वर्गाला लसीकरण मोहिमेत कसे सामावून घेता येईल याचे सूक्ष्म नियोजन अजून आरोग्य खात्याकडे नाही. समाजाच्या या स्तरासाठी लसीकरण गाव-खेड्यात न्यावे लागणार आहे.
reachme@amolannadate.com