प्राणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:46 AM2018-04-23T00:46:58+5:302018-04-23T00:46:58+5:30
आमच्यात सध्या मुली मिळत नाहीत. तरणीबांड पोरं सुकून चाललीत. मुलींचा भाव वाढत चाललाय.
किशोर पाठक|
मनुष्य हा एक प्राणी आहे, म्हणून तो जनावरासारखा वागतो. त्याच्या हिंस्र नखांवर कातडी चढवलीय. वेळ येताच तो कातडी दूर करतो. मग ती लहान मुलगी असो वा म्हातारी. स्त्रीला जात नसते, धर्म नसतो. ती फक्त योनीची वाहक असते. घडणाऱ्या प्रत्येक अत्याचाराला सामोरी जात ती मरते, मारली जाते. पुरुषांना असेच मारले तर... मित्र रडत होता. पूर्वी छान होतं. माणसांना माणसांची जाण होती. एकीकडे मुलीवर अत्याचार होताहेत तर दुसरीकडे मुलींची संख्या कमी होतेय. पैसे काय चाटायचेय. आमच्यात सध्या मुली मिळत नाहीत. तरणीबांड पोरं सुकून चाललीत. मुलींचा भाव वाढत चाललाय. उलट हुंडा द्यायची वेळ आलीय. पैसा पैसा करीत माणूस मरतो आहे. शहरातला दुकानदार नको, खेड्यातला शेतकरी नको. मुलाला शहरात गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी, गाडी हवी. नाती नकोत, बॅँक बॅलन्स हवा. अविवाहित तरुणांची फौज तयार होतेय. नवीन प्राण्यांची. आईबापांना आपण म्हातारे नाहीत, हे सांगावं लागतं. कारण मुलांना म्हाताºयांची सेवा करायला वेळ नाही, घरात जागा नाही. पुरेसा पगार नाही. टीव्हीचा एक चांगला उपयोग. सतत म्हातारे तोंड खुपसून. मग मुलांशी चर्चा आणि वादविवाद करायला वेळ नाही. हे नवे प्राणी. मुलांना खेळायला कशाला पाठवता. हातात मोबाईल द्या. लवकर डोळे खाचा होतील. गुडघे धरतील. म्हातारपण लवकर येईल. शिक्षित समाजात एकीकडे प्रचंड स्पर्धा आहे. दुसरीकडे प्रचंड नैराश्य. कॉन्स्टेबल पोलीस शिपायांच्या मुलाखतीसाठी पीएचडी झालेले लायनीत उभे. काय उपयोग शिकून. त्यात पुन्हा जातीय राजकारण वेगळंच. त्यापेक्षा एखादा गडगंज श्रीमंत नेता धरावा. त्याचा चमचा म्हणून जगावं. निदान दारू आणि जेवणाची सोय तर होते. त्याच्या जीवावर दादागिरी तर करता येते. मधेच कुणी आपला निकाल लावला तर सुटलो एकदाचे. हे एक प्राणी. माणूस प्रचंड भेदरलेला, घाबरलेला आहे. धर्म आणि नास्तिकतेचे चाबूक घेऊन समोर उभे आहेतच. एक तर जय म्हण नाही तर पाठ सोलून काढायला तयार हो. जन्म, मृत्यू, मोकळी हवा, शिक्षण, नोकरी, सामाजिक पत आणि पद, प्रतिष्ठा, माणसं वापरून घेण्याची कला या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यात माणूस नावाचा प्राणी हुंगत फिरतो आहे. त्याला दिसलं काही तर झडप घालून मोकळा. थोड्या कला पांघरूण तो जगण्याची हुडहुडी कमी करू शकतो. पण तेवढ्यापुरतीच. पुन्हा माणूस नावाचा अजस्र प्राणी माणसाला मारायला आणि गिळायला सज्ज!