फोटोनं घडविला चमत्कार !
By सचिन जवळकोटे | Published: August 30, 2018 06:11 AM2018-08-30T06:11:03+5:302018-08-30T08:16:13+5:30
तिरकस
गेल्या सहा महिन्यापासून सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवून-झिजवून पिंट्याचे प्लास्टिक शूज पार झिजले होते़ कुठल्यातरी प्लास्टिक पिशवीत गुंडाळून हे शूज कुठेतरी लांब कोनाड्यात ठेवावेत, असं त्याला कैकदा वाटलेलं़ मात्र, ‘मातोश्री’वरील मंत्र्यांच्या कृपेनं ही संधी काही त्याला मिळालीच नव्हती़
त्यामुळं तो चिडून जाऊन मुद्दामहून फाटक्या प्लास्टिक शूजमधून आपल्या पायाचा अंगठा बाहेर काढून चालायचा़ कुणी आश्चर्यानं विचारलं तर मोठ्या कौतुकानं सांगायचा, ‘एकमेकांना अंगठा दाखवण्याचा मक्ता काय फक्त महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनीच घेतलाय की काय? हा प्रकार फक्त दोन पार्टीमध्येच असू शकतो काय?’
‘युती’च्या कारभारावरवर सडकून टीका करणाºया पिंट्याला अलीकडच्या काळात येथील सरकारी यंत्रणेनं खूप सतावलं होतं़ सुरुवातीला तो नवउद्योजक म्हणून कर्ज मागण्यासाठी बँकेत गेला होता, तेव्हा तिथल्या मॅनेजरनं अशी काही विचित्र ‘मुद्रा’ केली की, पिंट्यानं आपल्या नियोजित धंद्याला लांबूनच रामराम ठोकला़
त्यानंतर थेट शेती करावी, या विचाराने त्याने उचल खाल्ली.
खाचखळग्यातील एसटीचे दणके खात तो गावी पोहोचला़ विशेष म्हणजे, सहा महिन्यापूर्वी याच रस्त्यावर म्हणे चंद्रकांतदादांची ‘पंधरा दिवसात खड्डे भरो मोहीम’ रंगली होती़ ‘पीडब्ल्यूडी’च्या नावाने बरीच ‘खडी’ फोडून पिंट्या घरी गेला, तेव्हा त्याचे वडील अंथरुणाला खिळलेले दिसले़ ‘पाच महिन्यांपूर्वी तर तुम्ही धडधाकट होता नां... आता मध्येच काय अकस्मात झालं?’ पिंट्यानं विचारलं, तसे वडील उत्तरले, ‘आता काय सांगू लेकरा तुलाऽऽ सा म्हैन्यागुदर कर्जमाफीचा अर्ज भरायचा म्हनूनशान रोज तालुक्याच्या कॉम्प्युटर सेंटरमंदी जात हुतो. तिथं हेलपाटे मारूनशान पायाचा लगदा झाला बग... पण शेवटपत्तुर कर्ज काय माफ जालं नाय, कारण येक कोन्चीतरी म्हैती म्हनं म्या भरलीच नाय.’
पेशाने शेतकरी असलेल्या वडिलांची ही अवस्था पाहून पिंट्या हबकला़ शेतीचा नाद सोडून त्यानं पुन्हा बस स्टॅँडगाठलं. तिथल्या चहावाल्याच्या टपरीवर रेडिओ लागला होता़ ‘मन की बात’ ऐकत कॅन्टीनवाला किटलीतला चहा वर-खाली करत होता़ हे पाहताच मात्र पिंट्या हरखला़ त्याला एक जबरदस्त कल्पना सुचली़ तो कामाला लागला़
रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका पडीक सरकारी जागेवर त्यानं बोर्ड लावला, ‘पिंटकराव यांचा नियोजित पेट्रोलपंप.’ बोर्डाच्या बाजूलाच ‘नमो’चा फोटोही लटकविला़ मग काय.. काही तासातच त्या ठिकाणी कैक सरकारी गाड्या येऊन थडकल्या़ अधिकारी खाली उतरले़ कुणाच्या हातात फायली होत्या, तर कुणाच्या हातात धनादेशांचा गठ्ठा़ ‘देशातील सर्वाेत्कृष्ट उद्योजक म्हणून आम्ही तुमचा गौरव करतोय,’ म्हणत पिंटकरावांसोबत खटाऽऽखट फोटोही काढले गेले़ एकानं पेट्रोल पंपाचं लायसन दिलं़ दुसºयानं ‘क्वालिटी कंट्रोल’चं प्रमाणपत्रही दिलं़ काहीही न करता पिंट्या ऊर्फ पिंटकराव एका पेट्रोल पंपाचे मालक बनले़ हे सारं एका फोटोमुळं घडलं़ ‘नमो’च्या फोटोनं जणू चमत्कार घडविला़
सचिन जवळकोटे
(लेखक लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत)