चित्र सूर्यमालेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:13 AM2018-02-11T01:13:40+5:302018-02-11T01:15:23+5:30

ग्रहांचे नभपटलावर वक्री जातानाचे दिसणे कशासाठी असावे? ते का? हे समजण्यासाठी कुठलाही सुटसुटीत उपाय नसणे, ही त्या काळातील शास्त्रज्ञांसाठी एक मोठी डोकेदुखीच होती.

Picture sunmatch | चित्र सूर्यमालेच

चित्र सूर्यमालेच

googlenewsNext

- अरविंद परांजपे

ग्रहांचे नभपटलावर वक्री जातानाचे दिसणे कशासाठी असावे? ते का? हे समजण्यासाठी कुठलाही सुटसुटीत उपाय नसणे, ही त्या काळातील शास्त्रज्ञांसाठी एक मोठी डोकेदुखीच होती. यावर कोपर्निकसने गणितीय उपाय सुचवला की, पृथ्वीभोवती न फिरता सूर्याभोवती फिरत आहेत, असे मानले, तर ग्रहांच्या गतीचे गणित सुटसुटीतपणे सोडविता तर येईलच, पण त्याचबरोबर ग्रहांच्या वक्री जाण्याचे स्पष्टीकरण ही समोर येते. हा तर्क खूपच सोपा होता आणि त्या काळातील विद्वानांनाही तो कळला होता, पण यात एक मोठी अडचण होती.
हा तर्कच मुळी एरिस्टोटलच्या पृथ्वी केंद्रित विश्वाच्या विरोधात होता. या तर्कामुळे मानवाला आणि म्हणून पोपला विश्वात सर्वात उच्च स्थान प्राप्त झाले होते आणि म्हणून या तर्काच्या विपरित कुठलाही तर्क जो या स्थानाला धक्का देऊ शकेल, असा तर्क स्वाभाविक पोप आणि त्याच्या अनुयायींना रुचणारा नव्हताच.
कोपर्निकसच्या पूर्वी जियोद्र्रानो ब्रूनो यांनी मत मांडल होते की, विश्व हे अनंत असून त्याला कुठलेच केंद्र नाही, असे मत मांडल्याबद्दल, ब्रूनोला सर्वांसमोर जाळून मारण्याची शिक्षा देण्यात आली होती आणि म्हणूनच कोपर्निकस आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला ग्रंथ, ज्यात त्याने ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या कक्षांचा उल्लेख केला होता, तो प्रसिद्ध केला नव्हता.
कोपर्निकसनंतर गेलिलियो गेलिलेई हे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आले. गेलिलोयोने नुकत्याच शोध लागलेल्या दुर्बिणीचा वापर केला आणि त्याला गुरूभोवती फिरत असलेल्या गुरूच्या चंद्रांचा म्हणजे, त्याच्या उपग्रहांचा शोध लावला. हा शोध आणि तसेच त्याने घेतलेली इतर निरीक्षणे कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताला बळ देत होती, पण तरी ही या सिद्धांतात कुठेतरी कमतरता होती. सूर्यकेंद्रित विश्वाच्या सिद्धांतात ग्रहांचे वक्री जाणे हे सहज सिद्ध होत होते, पण नभपटलावर त्यांच्या जागांचे केलेले भाकीत अचूक येत नव्हते.
योहांन्स केप्लर हा गेलिलियोचा समकालीन आणि एक निष्णात गणितज्ञ. त्याने कोपर्निकसच्या सिद्धांतात एक बदल केला. ग्रहांच्या कक्षा या वतुर्ळाकार नसून, लंब वतुर्ळाकार आहेत, हे त्याने दाखविले. याबद्दल आपण पुढच्या भागात बोलू या. कोपर्निकसच्या सिद्धांतातून ग्रहांच्या स्थितींचे अचूक भाकीत करता येत नसले, तरी ते सोपे आणि सुटसुटीत होते आणि एकंदरीत अनेक शास्त्रज्ञांचा कल उघड किंवा अपरोक्षपणे कोपर्निकसच्या सिद्धांताकडे झुकू लागला होता, शिवाय सूर्यकेंद्रित विश्व हा सिद्धांत ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर काढायला मदत करत होते.
वरील चित्रात सूर्याभोवती पृथ्वी आणि शुक्र यांच्या कक्षा दाखविल्या आहेत. पृथ्वी आणि शुक्र यांना जोडणारी रेष शुक्राच्या कक्षेस स्पर्शिका आहे. म्हणजे पृथ्वी-शुक्र-सूर्य हा कटकोन किंवा ९० अंशाचा आहे आणि पृथ्वी-शुक्र-सूर्य हा कटकोन त्रिकोण झाला, तसेच शुक्र-पृथ्वी-सूर्य हा कोन अधिकतम आहे. हा कोन निरीक्षणातून मोजता येऊ शकतो.
तर हा अधिकतम कोन ४७ अंशाचा असतो.
तर आता तुम्हीच एक प्रयोग करून बघा. एका कागदावर १० सें.मी.ची रेघ काढा. त्याची दोन टोके म्हणजे अ आणि ब समजू या. आता ब वरून एक लंब वरच्या बाजूला काढा, तर अ वरून ४७ अशांची रेष काढा. ही रेष ब वरून काढलेल्या लंबास क येथे मिळेल. आता क आणि ब हे अंतर मोजा. हे अंतर सुमारे ७ से. मी. असेल, म्हणजेच सूर्य आणि पृथ्वीच्या अंतराच्या ७० टक्के.
अशा प्रकारे खगोलशास्त्रज्ञांना सूर्यमालेतील इतर ग्रहांची अंतरे सूर्य आणि पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत काढण्यातही यश मिळाले. ही अंतरे अशी आहेत- सूर्य ते बुध ३९ टक्के, ङ्घबुध ते शुक्र ७२ टक्के, शुक्र ते पृथ्वी १०० टक्के (अर्थातच), पृथ्वी ते मंगळ १५० टक्के किंवा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या १.५ पट, गुरू ५.२ पट आणि शनी ९.५ पट. आता आपल्याला जर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर मोजता आले, तर आपल्याला सूर्यमालेची व्याप्ती लक्षात येऊ शकेल.
या आकड्यांवरून आणखीन एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे, जसजसे आपण सूर्यापासून दूर जातो, ग्रहांचे अंतरही वाढत जाते, तर असे आहे, आपल्या सूर्यमालेचे चित्र.

(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)

Web Title: Picture sunmatch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई