‘पिक्चर तेरा, आग मेरी, पर जलेगी थिएटर किसी दुसरे के बाप की’, ‘आदिपुरुष’ने वादाला ऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:00 AM2023-06-20T08:00:24+5:302023-06-20T08:00:42+5:30

राजकारणापासून चित्रपटाच्या क्षेत्रात वादाला ऊत आणण्याचे सर्वाधिकार राऊत यांनाच प्राप्त झालेत हेच ओम यांनीही दाखवून दिले.

'Picture Tera, Aag Meri, Par Jalegi Theater Kisi Dusare Ke Baap Ki', 'Adipurush' stirs up controversy | ‘पिक्चर तेरा, आग मेरी, पर जलेगी थिएटर किसी दुसरे के बाप की’, ‘आदिपुरुष’ने वादाला ऊत

‘पिक्चर तेरा, आग मेरी, पर जलेगी थिएटर किसी दुसरे के बाप की’, ‘आदिपुरुष’ने वादाला ऊत

googlenewsNext

चिरंजीव असल्याचे वरदान लाभलेल्या हनुमानाला ट्विटरच्या चिमणीद्वारे इहलोकीच्या मल्टीप्लेक्समध्ये आपल्याकरिता एक आसन राखीव असल्याची खुशखबर मिळाल्यानंतर दक्षिण मुंबईतील एका मल्टीप्लेक्समधील आडवेळी असलेल्या चित्रपटाच्या खेळाकरिता एक अतिधिप्पाड, बलदंड व्यक्ती पोहोचली. त्या व्यक्तीला पाहताच व्यवस्थापक त्याच्या नियोजित आसनापाशी घेऊन गेला. अंधारात ते चित्रपटगृहातील तुरळक प्रेक्षकांच्या लक्षात आले नाही. ‘आदिपुरुष’ नामे चित्रपटाचा खेळ सुरू होताच अल्पावधीत अन्य प्रेक्षक कपाळावर हात मारून घेत असताना ‘ती’ असाधारण व्यक्ती जमिनीवर शेपटाचे फटकारे मारून नाराजी प्रकट करू लागली.

‘आदिपुरुष’ चित्रपट पाहून आलेल्यांकडून सध्या तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर उभे राहत असल्याने तमाम रामभक्त रामलल्लाच्या दर्शनाकरिता आतूर असताना काही शेकडो कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या ‘आदिपुरुष’कडून प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. किमान २५ ते ३० वर्षांपूर्वी जेव्हा रामानंद सागर यांनी ‘रामायण’ ही दूरदर्शन मालिका निर्मिली, तेव्हा देश अक्षरश: राम भक्तीत बुडून गेला होता. मालिकेच्या काळात रस्ते ओस पडत होते. प्रभू रामचंद्रांचे दर्शन होताच लोक टीव्हीला हार-फुले अर्पण करत होते. रामानंद यांच्या त्या ‘रामायण’ची जादू अजून भारतीय समाजमनावर आहे. त्यामुळे तरुण मराठी दिग्दर्शक ओम राऊत निर्माण करत असलेल्या ‘आदिपुरुष’बाबत उत्सुकता होती. पण हा चित्रपट हे मोठ्ठे ‘ओम फस्स’ झाले आहे.

सर्वात मोठा गंभीर आक्षेप हा चित्रपटातील संवादांबाबत आहे. मनोज मुंताशिर हे चित्रपटाचे लेखक आहेत. ‘आदिपुरुष’चे संवाद लिहिताना त्यांनी पायात चप्पल घातली नव्हती म्हणे. मात्र ‘मिर्झापूर’, ‘पाताललोक’ वगैरे वेबसीरिजमध्ये शोभतील असे ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की...,’ असे टपोरी संवाद ऐकून काही दर्शकांनी पायताण हातात घेतले आहे. आता संवाद बदलण्याची तयारी मुंताशिर यांनी दाखविली आहे. दिग्दर्शक या नात्याने राऊत यांनी हे संवाद स्वीकारले कसे, हा प्रश्न निर्माण होतो. समजा ‘तानाजी’ (की तान्हाजी) या चित्रपटाची निर्मिती करताना उदयभानपासून अनेक पात्रांच्या निर्मितीत सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याने वादग्रस्त ठरलेल्या राऊत यांना संवादात काही खटकले नसेल तर सेन्सॉर बोर्डाने अफूची गोळी चघळत ‘आदिपुरुष’ला प्रमाणपत्र दिले का? हाच प्रश्न निर्माण होतो. ‘अवतार’सारख्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या हॉलिवूडपटातील व्हीएफएक्स तंत्राचा वापर करण्याचा पूर्वानुभव गाठीशी असलेल्या प्रसाद सुतार यांनी ‘आदिपुरुष’मध्ये त्याच तंत्राचा वापर करून स्पेशल इफेक्ट्स दिले आहेत. या इफेक्ट्सकरिता प्रत्येक सेकंदाला भरमसाठ खर्च येतो.

‘बाहुबली’फेम दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यासारखी स्टारकास्ट व व्हीएफएक्स इफेक्ट असा दुग्धशर्करा योग जमवूनही ‘आदिपुरुष’ हा त्यामधील संवाद व चित्रपटाच्या कथेचा फोकस यामुळे फसला आहे. चित्रपटाबाबत बोंबाबोंब सुरू असली तरी अवघ्या दोन-तीन दिवसात चित्रपटाने १४० कोटींचा गल्ला जमा केल्याचा दावा निर्माते करत आहेत. त्यामुळे ‘बदनाम होंगे तो भी नाम होगा’ हा फंडा चित्रपटाच्या प्रमोशनकरिता वापरला तर नाही ना? अशी शंका घ्यायला वाव आहे. श्रीराम चरित्राशी खेळ करणे हे आगीशी खेळ करण्यापेक्षा वेगळे नाही. हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाच्या विरोधात निदर्शने, आंदोलने सुरू केली आहेत. निषेधाचा हा वणवा भडकला तर ‘पिक्चर तेरा, आग मेरी, पर जलेगी थिएटर किसी दुसरे के बाप की’ अशी अवस्था होऊ शकते. चित्रपटाच्या निर्मितीवर जर काही शेकडो कोटी खर्च केले असतील तर ते कमावण्याकरिता किमान दोन आठवडे तरी चित्रपट चालावा लागेल.

अर्थात सॅटेलाइट, ग्लोबल राईट्सपासून अगदी चित्रपटाची गाणी व स्टोरी याचे राईट्स अगोदरच विकून खर्च वसूल केला असेल तर मग दर्शकांनी कितीही नाकं मुरडली व पाय आपटले तरी निर्मात्यांना तोशीष लागणार नाही. प्रभास हा दक्षिणेकडील लोकप्रिय कलाकार असून, सध्या सुरू असलेला आरडाओरडा हिंदी चित्रपट पाहून सुरू आहे. तमिळ, तेलगू चित्रपटाच्या दर्शकांची मानसिकता वेगळी आहे. रजनीकांतच्या एका थपडेने दहा-पंधरा जण हवेत उडतात. तेथे कदाचित हा चित्रपट हिट होऊ शकतो. राजकारणापासून चित्रपटाच्या क्षेत्रात वादाला ऊत आणण्याचे सर्वाधिकार राऊत यांनाच प्राप्त झालेत हेच ओम यांनीही दाखवून दिले.

Web Title: 'Picture Tera, Aag Meri, Par Jalegi Theater Kisi Dusare Ke Baap Ki', 'Adipurush' stirs up controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.