सहकारातील तेवत राहणारा दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:53 AM2017-11-02T03:53:46+5:302017-11-02T03:54:03+5:30

 Pillar | सहकारातील तेवत राहणारा दीपस्तंभ

सहकारातील तेवत राहणारा दीपस्तंभ

Next

- वसंत भोसले

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा प्रारंभ आज होत आहे. यानिमित्ताने...

महाराष्ट्राच्या विकासात सहकार चळवळीला महत्त्वाचे स्थान आहे. देशाने १९९१ मध्ये स्वीकारलेल्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणापर्यंत तरी सहकार हेच ग्रामीण विकासाचे समर्थ माध्यम आहे, असे आपण मानत आलो होतो. भारतातीेल विशेषत: महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकºयांसाठी सहकार चळवळीतून उभ्या राहिलेल्या संस्थांचा खूप मोठा आधार आहे. त्याचा विस्तार आणि मजबुतीकरण होणे अत्यंत गरजेचे असताना महाराष्ट्राने सहकाराकडे दुर्लक्ष केले. अशा वातावरणातही कोल्हापूर जिल्ह्यात सहा दशके सहकारात काम करणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी स्थापन केलेल्या हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ‘रौप्यमहोत्सव’ आज साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकार चळवळीकडे पाहिले तर आवाडे यांचे सहकारी संस्था उभ्या करून त्या उत्तम चालविण्याचे कार्य कौतुक करावे तेवढे थोडेच असे आहे.
महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेले इचलकरंजी हे शहर त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र राहिले. वस्त्रोद्योगाला सहकारातून उभारणी देण्याचे मोलाचे कार्यही ते सलग चाळीस वर्षे करीत आहेत. एकापाठोपाठ एक अशा अनेक सूतगिरण्या त्यांनी उभ्या केल्या. केवळ महिलांसाठी आणि महिलांनी चालविलेली इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणी त्यांनी उभी केली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा यांनी त्यांना केवळ महिला धोरणावर बोलू नका, तर सहकारातही त्यासाठी काम करा, असे आवाहन केले होते, ते त्यांनी स्वीकारले. केवळ पंधरा दिवसांत महिला सूतगिरणीचा प्रस्ताव तयार करून सादर केला. तेवढ्याच तत्परतेने स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी मंजुरी दिली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहकारी संस्था उभ्या करून चालविण्याचा आदर्श कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडून घ्यायला हवा.
अशाच पद्धतीने त्यांनी वस्त्रोद्योग, बँकिंगमध्ये काम केल्यानंतर १९९२ मध्ये जवाहर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. केवळ सात महिन्यांत साखर कारखाना उभारताना दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत जाजम अंथरून हुपरीच्या माळरानावर ते बसून असायचे. केवळ साडेबाराशे टन गाळप क्षमता असलेल्या या साखर कारखान्याचा पंचवीस वर्षांत वेगाने विस्तार केला. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीतील पंचवीस वर्षांचा साखर कारखाना हा कालावधी फारच कमी आहे. मात्र, याच कारखान्याने पहिला सहवीज प्रकल्प उभा केला. कारखान्याचा विस्तार करीत आज दररोजची गाळप क्षमता बारा हजार टनांपर्यंत वाढविली आहे. आज हा कारखाना महाराष्ट्रातील सर्वाधिक उसाचे गाळप करणारा ठरला आहे. अत्यंत आर्थिक शिस्तीने चालविताना पंचवीस वर्षांत एकोणीस राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. यातच आवाडे यांच्या कामाची पोचपावती आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील सुमारे १५० गावांतील शेतकºयांचे जीवन समृद्ध करणारा हा रौप्यमहोत्सवी सहकारी साखर कारखाना आहे. सहकार चळवळीत अनेक चढ-उतार येत असताना, तसेच सहकारी साखर कारखानदारीचे वेगाने खासगीकरण होत असताना जवाहर कारखाना दिव्यासारखा तेवतो आहे. ८६ वर्षांच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कार्याचा हा गौरवच म्हटले पाहिजे.

Web Title:  Pillar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.