पीतरौ रक्षति स पुत्र:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:25 AM2017-12-01T00:25:50+5:302017-12-01T00:26:02+5:30
आजकाल एकच मुलगा, एकच मुलगी, दोन मुली, एक मुलगा व एक मुलगी असे काहीसे चित्र समाजात आढळून येते, तेव्हा निवृत्तीनंतर म्हातारपणी कसे होईल याची काळजी करताना बरेच लोक दिसतात.
- प्रा. डॉ. संदीप ताटेवार
आजकाल एकच मुलगा, एकच मुलगी, दोन मुली, एक मुलगा व एक मुलगी असे काहीसे चित्र समाजात आढळून येते, तेव्हा निवृत्तीनंतर म्हातारपणी कसे होईल याची काळजी करताना बरेच लोक दिसतात. काहींना तर अपत्यच नसतात. माझ्या माहितीतील काकू सध्या ८५ वर्षाची आहे. तिला पाच मुली व दोन मुले आहेत.
४० वर्षापूर्वी काकूकडे लक्ष्मीची भरभरून कृपा होती. मुलामुलींचे लग्न थाटामाटात झाले. दोन मुले अती श्रीमंतीमुळे काही व्यवसाय न करताच घरी बसले. काकांचे निधन झाले. आज परिस्थिती संपूर्ण बदलली. काकूजवळचे होते नव्हते ते मुला व मुलींनी आपसामध्ये वाटून घेतले व काकू लंकेची पार्वती झाली.
आता मुलांनी काकूला घराबाहेर काढले. काकू रस्त्यावर आली. लाजेखातर दूरच्या नातेवाईकाने ठेवून घेतले. जावई अब्जोपती पण एकही मुलगी न्यायला तयार नाही. दोन्ही मुलांनी काकूसाठी घराचे दरवाजे कायम बंद केले. याविपरीत, माझा सध्या ५५ वर्षे वयाचा मित्र अमेरिकेत स्थायिक होता. म्हाताºया आईसाठी संपूर्ण परिवारासहित अमेरिकेतून सगळे सोडून भारतात आला. आता म्हाताºया आईची सेवा करतो. गांधारीला शंभर कौरव व कुंतीला पाच पांडव. मुलगा असावा की मुलगी, किती मुले किती मुली असाव्या, श्रीमंत जावई की गरीब जावई, मुलगा आणि सून शिकलेली की अशिक्षित असावी, कोण देईल म्हातारपणी काठीला आधार? कोणते महत्त्वाचे घटक ! काय असावा निकष! कसे असावे संस्कार? अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना शिकलेले आॅप्टीमायझेशनचे तंत्र लावून पाहिले पण व्यर्थ ! सगळे गणिताचे सूत्र लावले मात्र उत्तर काही सापडले नाही पण चाणक्य सूत्र म्हणते,
दुर्गते: पीतरौ रक्षति स पुत्र:
म्हणजेच मनाला शोक देणारे आणि हृदयाला व्यथा देणारे अनेक पुत्र असूनही काय लाभ? कुळाला आधार देणारा व वाईट परिस्थितीत सुद्धा आईवडिलांचे रक्षण व पोषण करणारा एकच सुपुत्र असला तरी पुरेसे आहे. या एकाच सुपुत्रामुळे परिवार आनंदी व सुखी होतो.