मेट्रो गाड्यांच्या बांधकामावरील रस्त्यावर ‘आज का दुख, कल का सुख’ सांगणारे फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:08 AM2018-09-08T03:08:18+5:302018-09-08T03:08:37+5:30
आपला देश व समाज सहनशील आहे. तो चिडत नाही, रागवत नाही. आहे ते सहन करतो. आपला शेतकरीच पाहा ना. तो त्याला लुबाडणाऱ्याला मारत नाही. स्वत: मरतो. त्याग व सहनशीलतेचे असे आदर्श आपल्याला जगात अन्यत्र सापडायचे नाहीत.
शहरी मालवाहतूक एक हजारांनी तर आंतरराष्टÑीय वाहतूक दोन ते तीन हजारांनी महाग होणे, शाळांच्या बसभाड्यात १२ ते १५ टक्क्यांनी वाढ होणे आणि पेट्रोलच्या किमती लीटरमागे १०० रुपयांच्या दिशेने जाताना दिसणे, हे देशात ‘बुरे दिन’ आल्याचे लक्षण नसून, ते देश श्रीमंत होत असल्याचे चिन्ह आहे. डिझेलमधील दरवाढीमुळे भाज्या ६० रुपयांवर पोहोचल्या असतील, तर तेही दारिद्र्यरेषेच्या काठावरचा माणूस भाज्या खाऊ लागला असल्याचे वा त्याला त्या परवडणाºया झाल्याचे सांगणारे लक्षण आहे. रुपयाचा भाव आंतरराष्टÑीय बाजारात घसरत आहे. एके काळी ५८ रुपयांचा अमेरिकी डॉलर आता ७२ रुपयांना मिळू लागला आहे. भारतीय अर्थव्यवस्था गडगडल्याचे हे लक्षण नसून, जगाची अर्थव्यवस्था चुकीच्या मार्गाने जात असल्याचे सांगणारे प्रकरण आहे. नेमक्या याच काळात महाराष्टÑातील ४५ हजार शिक्षकांनी ऐन शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर रस्त्यावर येऊन नियमित पगार व नोकरीची शाश्वती मागणे, हे त्या शिक्षकांना सरकारसमोर असलेल्या अडचणी अद्याप समजत नाहीत, हे सांगणारे आहे. खरे तर आज जे आहेत तेच अच्छे दिन आहेत. त्यात जे बुराई पाहतात, ते देशाचे दुश्मन व सरकारचे शत्रू आहेत. देश पुढे न्यायचा व त्याला प्रगतीची वाट दाखवायची तर समाजाला अशी कळ सोसावीच लागणार. त्याचमुळे ‘आज का दुख, कल का सुख’ असे सांगणारे फलक मेट्रो गाड्यांच्या बांधकामावरील रस्त्यावर लागले आहेत. ते आपल्याला एकूणच जीवनाविषयीचे मार्गदर्शन करणारे आहेत. सबब धीर धरा. दम बाळगा. आहे त्याच दिवसांना ‘अच्छे दिन’ माना आणि जमेल तेवढे मजेत राहा. तसाही आपल्याला ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ हा प्रत्यक्ष भगवंताचाच सल्ला आहे. तो उच्चारण्याचे उत्तरदायित्व नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षावर आता आले आहे, एवढाच काय तो फरक. तसेही ‘बालादपि सुभाषितं ग्राह्यम्’ असे आपण ऐकतच आलो आहोत, शिवाय जी काय थोडीशी अडचण आहे, ती निर्माण करणारे गुन्हेगार आपल्या महान नीति आयोगाने आता शोधले आहेत. देशाच्या आर्थिक अडचणींना सरकारचे धोरण जबाबदार नसून, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनच कारणीभूत आहेत, असे या आयोगाचे म्हणणे आहे. आता विजय मल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी आणि त्या चोकसीसारखे त्यांनाही देशात आणून जाब विचारला जाईल. मोदींसाठी प्रयत्न सुरू आहेत. मल्ल्यासाठी अँटिग्वा सरकारचे दरवाजे झिजविणे सुरू आहे. रघुराम राजन अमेरिकेत प्राध्यापक आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे बाकी कुणी आले नाहीत, तरी राजन यांना आणले जाणार आणि मग पेट्रोल स्वस्त होणार, डिझेल उतरणार, रुपयाचा भाव वाढणार आणि भाज्याही स्वस्त होणार. त्या ४५ हजार शिक्षकांनीही तोवर वाट पाहायला हरकत नाही. तसे सारे जगच आता आर्थिक संकटातून जात आहे. भारतालाही त्याच मार्गाने जावे लागत आहे, पण काळ बदलेल व तो बदलेपर्यंतच आपल्याला दम धरायचा आहे. तसेही ते रामदेवबाबा आणि श्री श्री म्हणतातच, भारताला एक दिवस विश्वगुरूचे स्थान प्राप्त होणार आहे. त्यांच्या या आशावादावर आपलाही विश्वास असला पाहिजे, नाहीतर आपण अश्रद्धपणाएवढेच देशविरोधाचेही आरोपी ठरू. भाजपाचा तो संबित पात्रा असे ठपके लोकांवर उमटवायला कधीचाच सज्जही आहे. सबब देशासाठी कळ सोसा आणि मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवा. ते संघाच्या शिस्तीत वाढले असल्याने कधी खोटे बोलत नाहीत आणि तसे बोलण्याची वेळ आलीच, तर त्याची जबाबदारी ते अमित शहा किंवा अन्य
सहकाºयांवर सोपवितात. प्रश्न सरकारचा नाही. ते समाधानी आहे. त्यातले मंत्री आनंदात आहेत. त्यांची हेलिकॉप्टर्स पेट्रोल वा डिझेलसाठी उडायची थांबत नाहीत आणि त्यांची आश्वासनेही कमी होताना दिसत नाहीत. आपल्यासाठी तोच आता आशेचा किरण आहे. तो कधीतरी जास्तीचा प्रकाशमान होईल. त्याची वाट पाहू आणि महागड्या भाज्या खाऊ.