सवयीचा गुलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 09:25 AM2018-07-06T09:25:27+5:302018-07-06T09:26:17+5:30
माणूस सवयीचा गुलाम असतो, असे म्हणतात, ते प्लॅस्टिक बंदीच्या कठोर अंमलबजावणीनंतर खरे वाटायला लागले आहे.
- मिलिंद कुलकर्णी
माणूस सवयीचा गुलाम असतो, असे म्हणतात, ते प्लॅस्टिक बंदीच्या कठोर अंमलबजावणीनंतर खरे वाटायला लागले आहे. प्लॅस्टिकचा अतिवापर होऊ लागल्यानंतर आपण बाजारात पिशवी न्यायलाच विसरलो. भाजी, दूध, किराणा सामान, औषधी सगळे काही आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घ्यायला लागलो. एवढंच काय अगदी उकळता चहासुध्दा प्लॅस्टिकच्या पिशवीमधून नेऊ लागलो. लग्नसोहळ्यात तर हद्द झाली. वाट्या, पेले जसे प्लॅस्टिकचे सर्रास वापरात आले; त्याप्रमाणे कागदाच्या डिशने ताट, पत्रावळी आणि केळीच्या पानांची जागा केव्हा घेतली, हे आम्हाला कळलेच नाही.
प्लॅस्टिकने आमचे जीवन पूर्ण व्यापले होते, याची अनुभूती आता आम्हाला होऊ लागली आहे. परवा मुंबईत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले असताना त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांच्या हाती असलेले गुलाबाचे फूल टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेले दिसले. तर सप्तश्रृंगी गडावरील ट्रॉलीच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित असताना त्या कार्यक्रमात पाण्यासाठी प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याने प्रसारमाध्यमात ही घटना ठळकपणे चर्चिली गेली. सार्वजनिक कार्यक्रमात प्लॅस्टिकचा वापर होत असेल तर काळजी घेण्याची नवीन जबाबदारी आयोजकांवर येऊन ठेपली आहे.
मायक्रॉन, प्लॅस्टिक पिशव्यांची जाडी हे शब्द आता अंगवळणी पडू लागले आहे. विड्याचे पान खाणारा आता प्लॅस्टिकपेक्षा कागदात पान गुंडाळून घेऊ लागला आहे. भाजीबाजारात गेलेली व्यक्ती पिशवी नसल्याने एक तर दुकानात जाऊन कापडी पिशवीचा भुर्दंड सोसते किंवा भोपळा, फुलकोबी अशा फळभाज्या हातात घेऊन वाहनापर्यंत येते.
मराठी माणूस तसा हरहुन्नरी. रस्त्यावरील खरेदी त्याला अतिप्रिय. वाहनावरुन न उतरता खरेदीचा अट्टाहास तर अचाट म्हणायला हवा. आता पावसाळ्यात भुईमुगाच्या शेंगा, मक्याचे कणीस, जांभळे, हातग्याची फुले, चिवळची भाजी असा रानमेवा रस्त्यावर विक्रीसाठी येतो. आणि रानमेवा खपतोदेखील पटकन. रस्त्याने जाताना कडेला बसलेले हे विक्रेते पाहून कोणालाही खरेदीचा मोह होतो. पण खरेदीदार आणि विक्रेता अशा दोघांकडे प्लॅस्टिकची पिशवी नसल्याने खरेदीचा बेत रहित होतो. उत्साहावर पाणी फिरते. विक्रेतेही नाराज होतात. एकीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खर्च वाचल्याचा आनंद विक्रेत्याला असला तरी एकूण विक्रीवर परिणाम होत असल्याने तेही नाखूश आहेत. परंतु पाच हजार रुपये दंडापेक्षा व्यवसाय कमी झालेला परवडला, असे म्हणत समाधान मानून घेतो.
प्लॅस्टिक पिशव्यांची सवय जशी अंगवळणी पडली तसेच टीव्ही आणि मोबाईलचे झाले आहे. घरात गेल्या गेल्या अनेकांना टीव्ही सुरु करण्याची सवय असते. पहिल्यांदा हाती रिमोट घेतला जातो. कुटुंबियांशी संवाद नाही, चौकशी नाही, लगेच टीव्हीला चिकटतात. मग जेवण, विश्रांती सगळे काही टीव्ही समोर चालते. पाहुणे आले तरी टीव्ही काही बंद होत नाही. जाहिरातींच्या ब्रेकमध्ये गप्पा होतात. जाहिराती संपल्या की मन आणि कान पुन्हा टीव्हीकडे...पाहुणे बिचारे हतबल. तीच गत मोबाईलची झाली आहे. नवरा-बायकोचा संवाददेखील चॅटिंगच्या माध्यमातून व्हायची वेळ फार दूर नाही. एवढे सगळे मोबाईलच्या आहारी गेले आहे. पाहुणे आले की, ते यजमानांची चौकशी करण्याऐवजी छोट्या पिनचा चार्जर आहे काय?, वायफायचा पासवर्ड काय? असे प्रश्न विचारताना दिसतात. माणूस सवयीचा किती गुलाम झाला आहे, याची ही उदाहरणे आहेत.