प्लॅस्टिकचा भस्मासूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:28 AM2019-05-22T05:28:35+5:302019-05-22T05:29:22+5:30
पृथ्वीची जडणघडण होताना जे तिच्या उदरी गाढले गेले, ते औद्योगिक क्रांतीनंतर खनिजे आणि तेलाच्या रूपाने बाहेर काढले जात आहे. साधनांचा उपभोग घेतल्यानंतर कचऱ्याची शून्य हानी होईल, अशा प्रकारे विल्हेवाट लावण्याची शाश्वती नाही.
गेल्या दोन आठवड्यांत मानवाच्या भविष्याविषयी मनाला घोर चिंता वाटावी, अशा तीन बातम्या जगातील तीन निरनिराळ्या ठिकाणांहून आल्या. या बातम्या पाहिल्या आणि सुमारे २५ वर्षांपूर्वी भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे थोर कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात दिलेल्या एका व्याख्यानाची आठवण झाली. डॉ. स्वामीनाथन यांनी त्या वेळी दिलेला इशारा किती अचूक व द्रष्टेपणाचा होता, याची प्रकर्षाने जाणीव झाली. माणसाने वैज्ञानिक प्रगती करत अधिकाधिक ऐषारामी आयुष्य जगण्याने, भावी काळात कचऱयाची विल्हेवाट ही जगापुढील सर्वात मोठी व बिकट समस्या ठरेल, असे डॉ. स्वामिनाथन म्हणाले होते.
सध्याच्या पद्धतींनी कचऱयाची विल्हेवाट लागत नाही, तर त्याचे फक्त रूपांतर होते. असा हा रूपांतरित कचरा पृथ्वीच्या पृष्ठभागावर व वातावरणात साठत आहे. सुरुवातीला उल्लेख केलेल्या तीन बातम्या या कचऱयापैकी सर्वाधिक हानिकारक अशी प्लॅस्टिक कचऱयासंबंधीच्या आहेत. पहिली बातमी ‘मरियाना ट्रेंच’ म्हणून ओळखल्या जाणाºया प्रशांत महासागरातील सर्वात खोल दरीसंबंधीची आहे. सागर तळातील ही दरी एव्हरेस्ट शिखराच्या उंचीहूनही अधिक म्हणजे ३५,८५३ फूट खोल आहे. निवृत्त नौदल अधिकारी असलेले व्हिक्टर व्हेस्कोवो हे पाणबुडीतून तेथे पोहोचलेले पहिले मानव ठरले. त्यांना तेथे जलचरांच्या चार नव्या प्रजाती दिसल्या, पण त्यासोबतच तेथे प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कँडीची आवरणे आढळली. नैसर्गिक विघटनाने नष्ट होऊ न शकणारे प्लॅस्टिक पृथ्वीवरच्या सर्वात खोल ठिकाणीही पोहोचल्याचा तो अपशकुन होता.
शहरांमध्ये फिरणाºया भटक्या गायी-गुरांच्या पोटातून अनेक किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या निघाल्याचेही वरचेवर वाचनात येते. अशाच प्रकारे खोल सागरात राहणारे व्हेल मासे, अन्य जलचर, तसेच मच्छीमारांच्या जाळ्यात अडकणाऱया माशांच्या पोटातही या आधी प्लॅस्टिक सापडले आहे. दुसरी अपशकुनी बातमी ऑस्ट्रेलियातील तास्मानिया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी दिली आहे. एका सर्वेक्षणात या वैज्ञानिकांना हिंदी महासागरातील कोकस (किलिंग) या अतिदुर्गम छोट्याशा बेटाच्या किनाऱ्यांवर २३८ टन प्लॅस्टिकचा कचरा आढळला. या कचºयात प्लॅस्टिकच्या वस्तूंचे ४२ कोटी तुकडे होते. त्यात १० लाखांहून अधिक पादत्राणे, ३.७० लाख टुथब्रश आणि आणखी कित्येक लाख बाटल्यांची बुचे होती. या आधी प्रशांत महासागरातील हेंडरसन या निर्जन बेटावरही असाच १७ टन प्लॅस्टिकचा कचरा साठल्याचे स्पष्ट झाले होते. हा कचरा म्हणजे, वस्तू एकदा वापरून फेकून देण्याच्या पाश्चात्यांच्या मुजोर जीवनशैलीचा परिणाम आहे. तिसरी बातमी एव्हरेस्ट शिखराची आहे. गिर्यारोहण मोहिमांमुळे एव्हरेस्टवर साठणारा कचरा ही नेपाळ सरकारला डोकेदुखी झाली आहे. या कचºयातही प्लॅस्टिक आहेच.
गेल्या एप्रिलपासून विशेष मोहीम राबवून एव्हरेस्टवरील ३० टन कचरा खाली आणण्यात आला, तरी अजूनही अंदाजे तेवढाच कचरा शिल्लक आहे. जॉन ह्यात या वैज्ञानिकाने सन १८६९ मध्ये अनेक सिंथेटिक पॉलिमरपैकी एक असलेल्या प्लॅस्टिकचा (सेलेयुलॉईड) शोध लावला. या शोधामागचा हेतू मोठा उदात्त होता. त्या काळी बिलियर्ड््स हा खेळ खूप लोकप्रिय झाला. त्यासाठी वापरल्या जाणाºया काठ्या हस्तिदंती असायच्या. हे हस्तिदंत मिळविण्यासाठी हजारो हत्तींची कत्तल व्हायची. ह्यात यांच्या शोधामुळे हत्तींना जीवदान मिळाले, पण कालांतराने वस्तूंचे वेष्ठण, साठवणूक आणि वाहतुकीसाठीचा स्वस्त आणि टिकाऊ पर्याय म्हणून प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला आणि जणू बाटलीतील भस्मासूर बाहेर आला. सर्व चराचर सृष्टी व्यापूनही दशांगुळे उरणाऱ्या परमेश्वराप्रमाणे या प्लॅस्टिकनेही अवघी पृथ्वी व्यापली आहे, हेच या तीन बातम्यांवरून स्पष्ट होते. या प्लास्टिकमुळे मुंबई महानगर एकदा पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे. महाराष्ट्रातील प्लास्टिकबंदी कशी उघडपणे झुगारली जात आहे, याचा प्रत्यय दररोज येत आहे. या भस्मासुराने डोक्यावर हात ठेवून आपल्याला भस्म करण्याआधीच त्याचा कठोर निग्रहाने पायबंद करावा लागेल.