पृथ्वीपासून आकाशापर्यंत सगळीकडेच हलकल्लोळ!

By विजय दर्डा | Published: June 5, 2023 07:35 AM2023-06-05T07:35:10+5:302023-06-05T07:35:42+5:30

निसर्गाचे मानवाशिवाय उत्तम चालेल. आपणच निसर्गावाचून क्षणभरही जगणार नाही! नुसता 'पर्यावरण दिवस' साजरा करून जबाबदारी संपत नाही!

plastic problems everywhere from the earth to the sky | पृथ्वीपासून आकाशापर्यंत सगळीकडेच हलकल्लोळ!

पृथ्वीपासून आकाशापर्यंत सगळीकडेच हलकल्लोळ!

googlenewsNext

- डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

पर्यावरण दिनाच्या स्वरूपात जगाने पर्यावरणाबद्दल प्रथमच अधिकृतपणे एकत्र येऊन चिंता व्यक्त केली. त्याच्या कितीतरी आधी पर्यावरणाला अत्यंत वाईट प्रकारे नष्ट करणाऱ्या राक्षसाचा जन्म झाला होता. तसे तर पर्यावरण नष्ट करणारे अनेक राक्षस आहेत; परंतु मी विशेष करून प्लास्टिकचा मुद्दा मांडतो आहे. कारण यंदाच्या पर्यावरण दिनाचा विषय प्लास्टिक प्रदूषण आणि निदान' हा आहे.

जगात १९७३ सालापासून पर्यावरण दिन साजरा होऊ लागला, परंतु प्लास्टिकचा शोध विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच लागलेला होता. त्यावेळी कोणाच्याही मनात असा विचार आला नसेल की एक दिवस हा शोध आपल्यासाठी काळ ठरेल. १९५० मध्ये पॉलिथिनच्या पिशव्या तयार व्हायला सुरुवात झाली, तेव्हा या प्रश्नाने जास्त गंभीर स्वरूप धारण केले. पहिल्यांदा याचा उपयोग उद्योगांसाठी होऊ लागला, परंतु मोठ्या वेगाने या प्लास्टिकने घराघरात मुक्काम ठोकला.

मला माझे लहानपण आठवते, जेव्हा सगळे लोक घरातून निघताना जवळ एक पिशवी ठेवायचे. त्यावेळी बाजारात प्लास्टिकची पिशवी नव्हती. आज काय परिस्थिती आहे हे काही लपून राहिलेले नाही. काहीही विकत घेतले तर लोकांना पॉलिथिनची पिशवी सोबत लागते. म्हणायला सरकारने त्यावर बंदी आणली, परंतु कटू सत्य हेच आहे की पॉलिथिन तयार होते आणि मोठ्या प्रमाणावर उपयोगातही आणले जाते. पॉलिथिन पिशव्यांमुळे आमची भूमी खराब होत आहे, जलस्रोत नष्ट होत आहेत. या पिशव्यांमुळे नाले बंद होतात. या पिशव्या पोटात गेल्याने पशू-पक्ष्यांपासून समुद्री जीवांपर्यंत अनेक प्राणी नष्ट होत आहेत.

तर प्रश्न असा आहे की यावर उपाय काय? यासाठी मी आपल्यासमोर एक उदाहरण ठेवू इच्छितो. साधारणतः अडीच दशकांपूर्वी जेव्हा लडाखच्या पहाडी प्रदेशात पॉलिथिनच्या पिशव्या हवेत उडायला लागल्या आणि नाले बंद झाले, तेव्हा लेहमधील स्त्रियांनी असा निश्चय केला की, पॉलिथिनच्या पिशव्यांचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत आम्ही करणार नाही. या निर्णयाने एकप्रकारे जनआंदोलनाचे रूप घेतले आणि लेहचा संपूर्ण परिसर पॉलिथिनच्या पिशव्यांपासून मुक्त झाला. जर एखादा पर्यटक प्लास्टिकची पिशवी घेऊन आला आणि त्याने ती कुठे फेकली तर स्त्रिया त्या पिशव्या गोळा करून हद्दीबाहेर पाठवून देतात. आता तर तेथे अधिकृतपणे पॉलिथिनचे उत्पादन आणि उपयोग पूर्णपणे बंद झाला आहे.

लेहप्रमाणे इतर ठिकाणीसुद्धा असे प्रयत्न झाले तर बदल व्हायला कितीसा वेळ लागेल, याचा जरा विचार करा. केवळ कायदा केल्याने काही होणार नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्याला आपले वागणे बदलावे लागेल. या पिशव्या आपण कुठेही फेकून देतो. खरे तर आपण आपल्यासाठी विषाची पेरणी करतो आहोत. घराबाहेर पडताना आपण कापडाच्या १-२ पिशव्या बरोबर घेऊन बाहेर पडलो तर पॉलिथिनच्या या घातक विषापासून पुष्कळ प्रमाणात मुक्ती मिळवता येईल. गरज आहे ती दृढनिश्चयाची.

आपल्या सर्वांना हे मान्य करावे लागेल की, पर्यावरण नष्ट करण्याचा सगळा दोष मनुष्य नावाच्या जीवाचा आहे. बाकी सगळे जीव पर्यावरणाच्या सृजनात गुंतलेले असतात. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, जर काही वर्षांसाठी पृथ्वीतलावरून माणसे बाहेर काढली तर काही वर्षांतच पृथ्वी आपल्या मूळ स्वरूपात येईल. परंतु, झाडझाडोरा बाहेर काढला तर माणूस एक दिवसही जगू शकणार नाही.

एक आकडेवारी आपल्याला आश्चर्याचा धक्का देईल. १२ हजार वर्षांपूर्वी जेव्हा माणसाने शेती करायला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत जगभरातील निम्म्यापेक्षा जास्त झाडे त्याने नष्ट केली आहेत. आपण झाडे कमी लावतो, मात्र जंगले वेगाने नष्ट करतो. जंगलातील जीवांच्या प्रजाती वेगाने संपत चालल्या आहेत. निसर्गाच्या रचनेतच एका जीवाचा दुसऱ्याशी संबंध आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. जीव नष्ट होत असतील, तर त्याचा परिणाम आपल्यावरही होत असतो.

आपल्या पर्यावरणाला नष्ट करणाऱ्या आणखी एका कारणाची चर्चा मी नक्की करू इच्छितो. अलीकडेच मी रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या लढाईची काही छायाचित्रे पाहत होतो, काही व्हिडीओ पाहिले. बॉम्बस्फोटानंतर उठलेल्या काळ्या धुराने माझ्या मनात एक प्रश्न उभा केला, जग दरवर्षी किती दारूगोळा हवेत सोडत असते? माझ्याकडे काही अधिकृत आकडेवारी नाही, परंतु हे तर आपणही मान्य कराल की दारूगोळ्याचा प्रत्येक कण त्या हवेला प्रदूषित करत असतो जो आपल्याला जगण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे.

काळाचा हिशेब मांडला तर इसवी सनपूर्व ३०० वर्षांपूर्वी चीनमध्ये दारूगोळ्याचा शोध लागला. चीनने पहिल्यांदा ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सला दारूगोळा विकला. आज दारूगोळा संपूर्ण जगभर हाहाकार माजवत आहे. दारूगोळ्याच्या संपर्कात येतो तो मारला जातो; जो येत नाही त्याला मारण्यासाठी त्याच्या फुप्फुसांपर्यंत हा दारूगोळा विष पोहोचवतो. आपली इच्छा असो वा नसो, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन आणि गंधक क्षणाक्षणाला आपला जीव घेत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीजवळच्या बाल्टिक समुद्रात जवळपास ३ लाख टन इतका दारूगोळा बुडवला गेला. त्यामुळे या भागातला सगळा समुद्र दूषित झाला हे आपल्याला ठाऊक आहे काय?

भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांनी युद्धाचे दुष्परिणाम ओळखले होते; म्हणूनच त्यांनी अहिंसेचा धडा दिला. आपण जर त्यांच्या रस्त्याने गेलो, तर आपल्याला तोफेत वापरल्या जाणाऱ्या दारुगोळ्याची गरजच पडणार नाही. दुर्दैवाने आजचे सत्य हे आहे की, आम्ही जमीन आणि समुद्राला नष्ट करत चालले आहोत. आकाशालाही हानी पोहोचवत आहोत. सुपरसॉनिक विमानातून निघणारे नायट्रिक ऑक्साइड ओझोनच्या थरावर परिणाम करते. नुकतीच एक बातमी आली आहे की, चीन जमिनीखाली १० किलोमीटर भुयार करतो आहे. ११ किलोमीटरचे भुयार रशियाने आधीच केले आहे. तंत्रज्ञानाची ही भूक न जाणो आपल्याला कुठवर घेऊन जाईल?

खरे तर पर्यावरणाप्रति जागृती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. हा विषय प्रत्येक शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे. कारण मुले हीच आपली सर्वात मोठी आशा आहे. याचे एक महत्त्वाचे उदाहरण मी देतो. माझे नातू आर्यमन आणि शिवान यांनी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 'लिटिल प्लॅनेट फाउंडेशन' स्थापन केले आहे. त्या फाउंडेशनशी अधिकाधिक मुले जोडली जात आहेत. काही दिवसांपूर्वी मी आर्यमन आणि शिवान यांचा मधमाश्यांवरचा लेख वाचला. तो वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या मधमाश्या फळे आणि भाज्यांच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात, कोट्यवधी रुपयांचा मध आपल्याला मोफत पुरवतात, त्याच मधमाश्या वेगाने नष्ट होत आहेत.

आज आर्यमन आणि शिवान या प्रकारची जागरूकता निर्माण करताहेत, कारण त्यांना त्यांच्या शाळांमध्ये तसे शिक्षण मिळाले आहे. सरकारी शाळांपासून खासगी शाळांपर्यंत असे शिक्षण मिळाले तर चित्र बदलू शकेल.

माणसांचं असं वागणं पाहून मला अनेकदा भीती वाटते की, एखाद्या दिवशी मानव जातीचा अंत तर होणार नाही ! निसर्गाचे आपल्याशिवाय उत्तम चालेल; पण आपण निसर्गाशिवाय जगू शकणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे!!

 

Web Title: plastic problems everywhere from the earth to the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.